Sunday, April 28, 2024
Homeमनोरंजननवीन पर्वात देऊ जुन्या आठवणींना उजाळा

नवीन पर्वात देऊ जुन्या आठवणींना उजाळा

नाशिक | Nashik

सारेगमप लिटिल चॅम्प्समध्ये सगळ्यात ‘रॉकींग परफॉर्मन्स’ लातूरच्या रोहित राऊतचा असायचा.

- Advertisement -

प्रेक्षकही रोहितला ‘रॉक स्टार’ म्हणून ओळखायला लागले. रोहितने संगीत क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली असून आता पुन्हा एकदा लिटिल चॅम्प्सच्या नव्या पर्वात रोहित ज्यूरीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

१२ वर्षांनी पुन्हा एकदा सारेगमप लिटिल चॅम्प्स’चं नवीन पर्व सुरु होणार आहे. त्याविषयी काय सांगशील?

– १२ वर्षांनी पुन्हा एकदा लिटिल चॅम्प्स प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे या गोष्टीचा मला खूप आनंद आहे. खूप कमालीचं टॅलेंट या पर्वात सहभागी होणार आहे. १ दशकानंतर हे पर्व प्रेक्षकांच्या भेटीस येतंय त्यामुळे स्पर्धेतील आणि स्पर्धकांमधील फरक प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल.

आम्ही या नव्या पर्वासाठी खूप जास्त उत्सुक आहोत आणि आम्ही तितकीच धमाल देखील करतोय. प्रेक्षकांना देखील हे पर्व बघताना तितकीच मजा येईल.

सारेगमप या कार्यक्रमाने तुम्हा ५ हि पंचरत्नांना संगीत क्षेत्रात मोठा ब्रेक दिला, त्याच मंचावर पुन्हा एकदा परत येताना कसं वाटतंय?

– या कार्यक्रमामुळे आम्हाला अफाट लोकप्रियता मिळाली. जगाच्या कान्याकोपऱ्यातून आम्हाला प्रेक्षकांचं प्रेम मिळालं त्यामुळे या मंचावर एका वेगळ्या भूमिकेतून परत येताना खूप जास्त आनंद होतोय.

सारेगमपमुळे आम्ही पंचरत्न म्हणून नावारूपाला आलो, १२ वर्षानंतर देखील आमची मैत्री तितकीच घट्ट आहे, आम्ही एकत्र काम देखील केलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा एकत्र या मंचावर येऊन आम्ही खूप धमाल करतोय आणि जुन्या आठवणींना उजाळा देतोय.

१२ वर्षांनंतर तुम्ही पाच जण एकत्र येणार आहात, त्याबद्दल काय सांगशील?

– टीव्हीवर जरी आम्ही १२ वर्षानंतर एकत्र येणार असलो तरी या १२ वर्षात आम्ही एकत्र खूप काम केलंय, खूप इव्हेंट्स एकत्र केले आहेत त्यामुळे आम्ही ५ जण एकत्र असलो कि खूप छान वाटतं.

लिटिल चॅम्प्स हा कार्यक्रम आम्हा ५ ही जणांच्या खूप जवळचा आहे. या कार्यक्रमाचा अनेक आठवणी आम्हाला आनंद देऊन जातात. आणि आता परत त्याच आठवणींना उजाळा देत आम्ही नवीन पर्वातून प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज आहोत.

यावेळी स्पर्धक म्हणून नाही तर ज्युरीची भूमिका निभावताना प्रेक्षक तुम्हाला पाहतील. त्यासाठी काही खास तयारी केली आहे का?

– एक स्पर्धक म्हणून आम्ही केलेल्या तयारीपेक्षा आता निभावत असलेल्या ज्यूरीच्या भूमिकेसाठी आम्ही सर्वजण खूप जास्त तयारी करतोय. कारण आता आमची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे या १२ वर्षात आलेली आणि त्याधीची गाणी, आम्ही स्पर्धेत सादर केलेली गाणी यासर्वांचा आम्ही सखोल अभ्यास करतोय.

आताचे लिटिल चॅम्प्स खूप कमालीचे आहेत त्यामुळे त्यांच्या सादरीकरणानंतर आम्ही त्यांचे मोठे ताई आणि दादा म्हणून त्यांना मार्गदर्शन करणार आहोत. त्यांची कुठे चूक झाली तर त्यांना न दुखावता त्यांना ती समजवून सांगायची जबाबदारी देखील आमच्यावर आहे. हे सगळे लिटिल चॅम्प्स खूप अभ्यास करून आले आहेत त्यामुळे आम्ही देखील तितकीच जोमाने तयारी करतोय.

सारेगमपच्या मंचांमुळे तुझ्यात काय बदल झाला?

– लातूरमधून आलेल्या मुलाला इतका मोठा मंच मिळाला, स्वतःच गाणं प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाली त्यामुळे माझ्यात फक्त गायक म्हणूनच नाही तर माणूस म्हणून पण खूप बदल झाला.

या कार्यक्रमाने आम्हाला लोकप्रियताच नाही दिली तर लोकप्रियता मिळाल्यावर तुमची तयारी झालेली प्रतिमा जास्त काळ कशी टिकवून ठेवायची, स्वतःला माणूस म्हणून सिद्ध कसं करायचं हे शिकवलं आणि मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो कि त्यावेळी आम्हाला या सर्व गोष्टी शिकायला मिळाल्या. मी मंचाचा खूप ऋणी आहे कारण आज मी जो काही आहे तो या मंचामुळे आहे.

प्रेक्षकांना काय आवाहन कराल?

– मला ही खात्री आहे कि प्रेक्षकांनी आमच्या पर्वावर जितकं प्रेम केलं तितकंच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त प्रेम प्रेक्षक या नवीन पर्वावर करतील कारण खूप टॅलेंटेड लिटिल चॅम्प्स आम्ही प्रेक्षकांसाठी निवडले आहेत जे तुमच्यासाठी तुमच्या आवडीची गाणी सादर करून तुमचं मनोरंजन करणार आहेत.

या पर्वातील मुलं ही खूप टॅलेंटेड आहेत, खूप स्मार्ट आहेत, त्यांचा अभ्यास खूप सखोल आहे, त्यांना माहिती आहे कि त्यांना काय आणि कसं सादर करायचा आहे त्यामुळे आम्हाला पण या कार्यक्रमाचा हिस्सा होऊन खूप छान वाटतंय.

- Advertisment -

ताज्या बातम्या