सदाशिव अमरापूरकर : अभिनयाबरोबरच सामाजिक भान जपणारे अभिनेते

फार कमी कलाकार असतात ज्यांच्या जाण्याने चित्रपट सृष्टीत 'खरी' पोकळी निर्माण होते
सदाशिव अमरापूरकर : अभिनयाबरोबरच सामाजिक भान जपणारे अभिनेते

फार कमी कलाकार असतात ज्यांच्या जाण्याने चित्रपट सृष्टीत 'खरी' पोकळी निर्माण होते. त्यापैकी गणेश कुमार नरवाडे उर्फ सदाशिव अमरापूरकर. सदाशिव अमरापुरकर हे मराठी तसेच हिंदी सिनेमातील मोठं नाव. आपल्या अभिनयाने आजही सदाशिव अमरापुरकर प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात भीती निर्माण करणारे सदाशिव अमरापुरकर यांनी साकारलेल्या सगळ्याच भूमिका लोकप्रिय ठरल्या. खलनायकी भूमिका ताकदीने पेलणारे सुप्रसिद्ध अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचा आज जन्मदिवस.

अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांनी मराठी, हिंदी, बंगाली, ओरिया आणि हरयाणवी अशा पाच चित्रपटसृष्टींमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली. पाच भाषांमध्ये मिळून तब्बल ३०० चित्रपटांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्यात. विशेष म्हणजे अभिनयाबरोबरच सामाजिक भानही त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत जपलं. जिथे अन्याय दिसेल तिथे आवाज उठवायचा, असा त्यांचा खाक्या होत्या.

सदाशिव अमरापूरकर यांचा जन्म ११ मे १९५० रोजी अहमदनगर येथे झाला. अमरापूरकर यांना शालेय जीवनापासूनच अभिनयाची आवड होती. शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात नाट्यस्पर्धेतही त्यांनी भाग घेतला होता. ‘हँड्स अप’ हे त्यांचे अविनाश मसुरेकर आणि भक्ती बर्वे यांच्यासमवेतचे पहिले व्यावसायिक नाटक रंगमंचावर आले आणि प्रेक्षकांनी त्यांना डोक्यावर घेतले. या नाटकातल्या यशानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. याच नाटकातली त्यांची भूमिका पाहून दिग्दर्शक आणि निर्माते गोविंद निहलानी यांनी त्यांना ‘अर्धसत्य’ या चित्रपटात ओम पुरी यांच्यासमवेत भूमिका दिली होती. या चित्रपटातली त्यांनी केलेली बेरक्या आणि धूर्त, कटकारस्थानी ‘रामा शेट्टी’ची ही भूमिका प्रचंड गाजली. त्यांच्या समर्थ अभिनयाचे दर्शन प्रेक्षकांना घडले.

१९९१ मध्ये ‘सडक’ या चित्रपटात त्यांनी केलेली तृतीयपंथीयाची भूमिका गाजली होती. याच भूमिकेबद्दल त्यांना ‘फिल्मफेअर’ पुरस्कारही मिळाला होता. रंगभूमीवरच्या नाटकात त्यांना भूमिका करणे विशेष आवडत असले, तरीही चित्रपटाच्या व्यवसायात गर्क झाल्यामुळे, पुढे त्यांना मोजक्याच नाटकांत भूमिका करता आल्या. सदाशिव अमरापूरकर म्हणजे दुष्ट खलनायक असा शिक्का त्यांच्यावर बसला. कारण त्यांच्या भूमिकाच तितक्या ताकदीच्या होत्या. पुराना मंदिर, नासूर, मुद्दत, विरू दादा, जवानी, फरिश्ते या चित्रपटांत त्यांनी केलेल्या भूमिका लोकप्रिय ठरल्या. अभिनेता धर्मेंद्र यांच्याबरोबर त्यांनी हुकूमत या चित्रपटात पहिला खलनायक रंगवला होता.

विविध प्रकारच्या खलनायकाच्या भूमिका रंगवणाऱ्या अमरापूरकर यांनी स्वत:ला त्याच चौकटीत अडकवून मात्र घेतले नाही. उत्तम चरित्र अभिनेता, विनोदी अभिनेता, असा लौकिकही त्यांनी मिळवला. हिंदी, मराठी, हरियाणवी, बंगाली, ओरिया यांसह अन्य भाषांतल्या ३००हून अधिक चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या होत्या. अखेरची काही वर्षे प्रकृती साथ देत नसल्याने, त्यांनी रंगभूमी आणि चित्रपटातल्या भूमिका कमी केल्या होत्या. अमरापूरकरांनी श्याम बेनेगल यांच्या 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' या दूरचित्रवाणी मालिकेत महात्मा फुले यांची भूमिका केली होती.

सदाशिव अमरापुरकरांना शिसपेन्सिलीने चित्रे काढायचा छंद होता. एका जपानी शेती शास्त्रज्ञाचे पुस्तक वाचून त्यांनी शेती करायचे ठरविले. त्यासाठी अमरापूरकरांनी सिंहगडाच्या पायथ्याशी अर्धा एकर शेतजमीन विकत घेतली होती. तेथे त्यांनी शेताच्या कडेला अनेक झाडे लावली. तीन वर्षे पीक जळून गेल्यावरही प्रयत्न न सोडता ते भुईमुगाची नैसर्गिक शेती करत राहिले आणि चौथ्या वर्षी त्यांनी भरघोस उत्पन्न मिळविले.

सदाशिव अमरापुरकर यांचा लोकसंग्रह अफाट होता. पाय शेवटपर्यंत जमिनीवर होते. आपण समाजाचे देणे द्यायचे आहे, हे त्यांनी आपल्या जीवनात कृतिशीलपणे अंमलातही आणले होते. अण्णा हजारे यांच्या लोकपाल आंदोलनाला जाहीर पाठिंबा देणाऱ्या अमरापूरकर यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून म्हणजे अराजकाची चाहूल, अशा शब्दांत सरकारवर टीकेची झोड उठवत, अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अंमलात आणणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली असल्याचे सांगितले होते. एकदा त्यांनी धुळवडीच्या दिवशी पाण्याची नाहक उधळपट्टी करणाऱ्यांच्या विरोधात त्यांनी आवाज उठविला होता. या गुणी आणि सामाजिक भान असलेल्या अभिनेत्याचे फुफ्फुसाच्या विकाराने तीन नोव्हेंबर २०१४ रोजी निधन झाले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com