Global Hunger Index : “परत आपला एक दाढीवाला बाबा येऊन...”; मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

Global Hunger Index : “परत आपला एक दाढीवाला बाबा येऊन...”; मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

मुंबई | Mumbai

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आस्ताद काळे सोशल मीडियावर कमालीचा सक्रीय आहे. समाजात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडींवर तो उघडपणे भाष्य करत असतो. यावेळीदेखील त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यावेळी त्याने अप्रत्यक्षरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

नुकतंच जागतिक भूक निर्देशांक (Global Hunger Index ) अहवाल जाहीर करण्यात आला आहे. यात भारताची स्थिती आणखी खराब झाली असून, तो १२१ देशांत १०७ व्या स्थानावर घसरला आहे. गेल्या वर्षी तो १०१ व्या स्थानी होता. पाकिस्तान (९९), बांगलादेश (८४), नेपाळ (८१) व श्रीलंका (६४) या शेजारी देशांची स्थिती भारताहून चांगली आहे. यावरून अभिनेता आस्ताद काळे याने अप्रत्यक्षरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

आस्ताद काळेने म्हटलं की, "Global Hunger Index 2022मधे जे दिसलंय, तेसुद्धा विरोधी पक्षांनी/शत्रू देशांनी/विरोधी मीडियानी बनवून रचून सांगितलंय का?

आणि ते जे दिसलंय, ते खरं असेल(आहेच खरं, पण तरी) तर संबंधित सरकारी यंत्रणा या भिकार कारभाराची जबाबदारी घेणार आहे, काही विधायक हालचाली करणार आहे? की..

परत आपला एक दाढीवाला बाबा येऊन चमत्कारांच्या अद्भुत, अनाकलनीय कथा सांगून, टाळिया-बिळ्या मिळवून, त्या उपाशांच्या तोंडाला थुका लावून, मग आशावादाच्या चार झुळुकांनी त्यांची तोंडं वाळवून, शेवटी त्या तोंडांना “बघा आम्ही कसं तुमचं भलं केलं” या आभासाची पानं पुसणारे?"

दरम्यान भारतानं जागतिक भूक निर्देशांक अहवाल २०२२ फेटाळला आहे. या अहवालात भारताचं स्थान १२१ देशांमधे १०७ व्या क्रमांकावर आहे. हा निर्देशांक चुकीच्या मोजपट्ट्यांवर आधारित असून, पद्धतीशास्त्राच्या गंभीर त्रुटी त्यात असल्याचं केंद्रीय महिला आणि बाल कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे.

भारत आपल्या जनतेच्या अन्न सुरक्षा आणि पोषण विषयक गरजांची पूर्तता करत नसल्याचं दाखवून भारताची प्रतिमा मलिन करण्याचे प्रयत्न सातत्यानं सुरु आहे. हेच पुन्हा एकदा दिसून आलंय, असं मंत्रालयानं म्हटलं आहे. हा अहवाल वास्तवापासून दूर गेेलेल्या तर आहेच पण विषेशत: कोविड काळात अन्न सुरक्षेसाठी सरकानं केलेल्या प्रयत्नांकडे जाणून बूजून डोळेझाक करणारा आहे, अशी टीकाही मंत्रालयानं केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com