मुंबई | Mumbai

अभिनेत्री कंगना रणौत आपली बहीण रंगोलीसह वांद्रे पोलीस ठाण्यात हजर झाली आहे. देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अखेर बॉलिवूडची अभिनेत्री कंगना रणौत (kangana ranaut) आणि तिची बहीण रंगोली चंदेल (rangoli chandel) या दोघी आपला जबाब नोंदवायला वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये (Bandra police station) हजर झाल्या आहेत.

सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजात तेढ निर्माण करणे, द्वेष पसरविणे यामुळे कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी चौकशीसाठी तिला ३ ते ४ वेळा नोटीसही बजावण्यात आली होती. मात्र, त्याकडे कंगनाने दुर्लक्ष केलं होतं. अखेर आज स्वत: कंगना पोलीस स्टेशनमध्ये हजर झाली आहे.

आपल्या विरोधातील गुन्हा रद्द करावा या मागणीसाठी कंगनाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तिने वांद्रे न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिलं होतं. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने कंगना व रंगोली या दोघींना अटकेपासून संरक्षण देत आज वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये जबाब नोंदविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, कंगना आज पोलीस स्टेशनमध्ये हजर झाली.

देशद्रोह, सामाजिक तेढ निर्माण करणे आणि धार्मिक भावना भडकावणे अशा स्वरुपाचे गुन्हे वांद्रे पोलिसांनी कंगना विरोधात दाखल केले आहेत. कंगना आणि तिची बहिण रंगोली या दोघांनी अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यू नंतर मोठ्या प्रमाणात ट्वीट केले होते. यापैकी एका ट्विटवर आक्षेप घेत साहिल नावाच्या एका व्यक्तीने वांद्रे न्यायालयात कंगना आणि तिच्या बहिणीविरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी होवून न्यायालयाने कंगना विरोधात राजद्रोह, सामाजिक तेढ निर्माण करणे आणि धार्मिक भावना भडकावणे या कलमांखाली गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले होते.