“घाई घाईने RIP लिहिण्याच्या या जगात...”; पडद्यावर 'सिंधुताई' साकारणाऱ्या तेजस्विनीची पोस्ट चर्चेत

“घाई घाईने RIP लिहिण्याच्या या जगात...”; पडद्यावर 'सिंधुताई' साकारणाऱ्या तेजस्विनीची पोस्ट चर्चेत

मुंबई | Mumbai

अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणार्‍या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधूताई सपकाळ यांचे पुण्यात हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्या ७३ वर्षांच्या होत्या. आज रात्री ८ वाजून १० मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.

सिंधूताईंच्या निधनानंतर संपूर्ण देशावर शोककळा पसरली असून अनेकांनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून आदरांजली वाहिली आहे. यामध्येच अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिची पोस्ट चर्चेत आली आहे. २०१० मध्ये सिंधुताईंच्या जीवनावर आधारलेला ‘मी सिंधुताई सपकाळ’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यामध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांनी सिंधुताईंची भूमिका साकारली आहे. सिंधुताईंच्या निधनानंतर तेजस्विनी पंडितनेही एक पोस्ट लिहीत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

“घाई घाईने RIP लिहिण्याच्या या जगात...”; पडद्यावर 'सिंधुताई' साकारणाऱ्या तेजस्विनीची पोस्ट चर्चेत
Visual Story : 'अनाथांची माय' सिंधुताई सपकाळ यांच्या आयुष्याची अशी होती संघर्षमय कहाणी!

तेजस्विनी पंडितची पोस्ट-

अनेक लोकांनी विचारलं तू अजून कसं काही लिहलं नाहीस....पोस्ट नाही केलं? पटकन जज करतो ना आपण त्यांच्या सोशल मीडियावरुन माणसाला? पण कुटुंबातल्या माणसांना घरातलं कुणी गेल्यावर सोशल मीडियावर पोस्ट करण्याची मनःस्थिति आणि वेळ खरंच असतो? माझीही काहीशी अशीच अवस्था झाली.

रात्री ममता ताईच्या फोनवरुन बातमी कन्फर्म झाल्यावर काही क्षण पायातली ताकदच गेली. थक्क झाले होते. खूप वेळ फोन वाजत होता. प्रतिक्रियेसाठी. काही जड छातीने उचलले, काही नाही उचलता आले.... कारण ती वेळ खरंच नाजूक होती. माई आणि मी रोज संपर्कात होतो का तर नाही.... पण तुमच्या आयुष्यात एखादी अशी व्यक्ती येऊन जाते, की तुमचं आयुष्यच बदलून जातं आणि ह्यात त्यांचा हातभार आहे ह्याचं त्यांना भान ही नसतं. चित्रपटानंतर काही वेळा त्यांना भेटण्याचा योग आला....कधीच कुणाला नावाने हाक न मारता "बाळा" म्हणणार्‍या माईंना माझं नाव मात्र पाठ होतं. हातात हात घेऊन माझी पाठ थोपटायच्या. मला चित्रपट बघून कायम म्हणायच्या "मी हे आयुष्य जगले आहे पण तू मला जिवंत केलंस! "अभिनेत्री" म्हणून, एक तेजस्विनी पंडित आहे बरंका इथे अशी ओळख मला मी सिंधुताई सपकाळ ह्या चित्रपटाने दिली. अनेक आंतराष्ट्रीय, राष्ट्रीय पुरस्कार आम्ही पटकावले. अभिमान वाटतो की ज्या कलाक्षेत्रात मी काम करते , त्यातून माईंचं हे महान कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा खारी चा का असेना पण मला वाटा उचलता आला. आणि एक व्यक्ति म्हणून त्यांचा तो अविस्मरणीय प्रवास मी स्क्रीनवर जगू शकले त्यातून बरेच काही शिकू शकले ह्याचा आनंद आहे. परकाया प्रवेश म्हणतात ना तेच! कळत नकळत खूप काही दिलं तुम्ही मला माई. महाराष्ट्र तुमच्या जाण्याने पोरका झाला...! पण माझ्यासाठी तुम्ही जिवंतच असाल. आणि तुमच्यावर आधारित असलेला चित्रपट तुमच्या लढवय्या वृत्तीची, तुमच्या संघर्षाची ग्वाही, प्रेरणा माझ्या रूपी देत राहील.

लोकहो एक विनंती.... घाई घाई ने RIP लिहिण्याच्या ह्या जगात त्यांचंही एक कुटुंब आहे (आणि ते खूप मोठं आहे) ते अत्यंत अवघड परिस्थितीतून जात आहे ह्याचा आपल्याला विसर पडण्याची शक्यता आहे... त्यांना वेळ द्या. Let them atleast have some time to mourn on a family members death.

तब्येत बरी नसल्यामुळे उद्या त्यांच्या अंत्यदर्शनासाठी जाता येणार नाही पण ईश्वर चरणी प्रार्थना- माईंच्या आत्म्यास शांती लाभो. आणि ममता ताई, दीपक दादा, ममता बाल सदन च्या कुटुंबाला ह्या अवघड परिस्थितीशी लढण्याची ताकद देवो.

ओम शांती.

माई....

- तुमचीच चिंधी, सिंधुताई आणि माई

दरम्यान सिंधुताई सपकाळ यांच्यावर पुण्यातील गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरु होते. काही दिवसांपूर्वीच सिंधुताई यांच्यावर गॅलेक्सी रुग्णालयातच हर्नियाचे ऑपरेशन करण्यात आले. त्यानंतर सिंधुताई यांना पुन्हा एकदा गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात होते. सिंधुताई सपकाळ यांच्यावर उद्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com