
मुंबई | Mumbai
बॉलिवूडचा (Bollywood) अभिनेता रणबीर कपूरला (Ranbir Kapoor) ऑनलाइन बेटिंग ॲप प्रकरणी (Online Betting Apps) ईडीने (ED) समन्स बजावले आहे. महादेव ऑनलाइन सट्टेबाजी प्रकरणात अनेक बॉलिवूड कलाकार आणि गायक ईडीच्या रडारवर आहेत. त्यात रणबीर कपूरचा देखील समावेश होता. त्यानंतर आता ईडीकडून रणबीरला बेटिंग ॲपचे प्रमोशन केल्यामुळे हे समन्स पाठवण्यात आले आहे...
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने आज बुधवार (दि.०४ ऑक्टोबर) रोजी हे समन्स अभिनेता रणबीर कपूरला पाठविले असून त्याला ६ ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी (Inquiry) ईडी कार्यालयात (ED Office) हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे संपूर्ण प्रकरण 'महादेव बुक ऑनलाइन लॉटरी'शी आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाशी संबंधित आहे. त्यानंतर आता ईडीने याप्रकरणात रणबीर कपूरला नोटीस पाठवत त्याला चौकशीसाठी बोलवले आहे.
तसेच महादेव बेटिंग अॅपचा (Mahadev Betting App) प्रमोटर सौरभ चंद्राकरच्या (Saurabh Chandrakar) लग्नात आणि सक्सेस पार्टीला कोणाची उपस्थिती होती याचाही तपास ईडीकडून सुरू आहे. रणबीर कपूरशिवाय किमान १५ ते २० सेलिब्रिटी ईडीच्या रडारवर आहेत. यामध्ये टायगर श्रॉफ, सनी लिओन, नेहा कक्कर, आतिफ अस्लम, राहत फतेह अली खान, अली असगर, विशाल ददलानी, एली अवराम, भारती सिंग, भाग्यश्री, क्रिती खरबंदा, नुश्रत भरुच्चा, कृष्णा अभिषेक आणि सुखविंदर सिंग यांचा समावेश होता. यानंतर आता रणबीर कपूरच्या अडचणीत वाढ झाली आहे.
नेमकं प्रकरण काय?
महादेव गेमिंग-बेटिंग हा ऑनलाइन सट्टेबाजी करण्याचा अॅप आहे. या अॅपचा प्रमोटर सौरभ चंद्राकर याचं लग्न फेब्रुवारीमध्ये संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) झाले होते. या लग्नात तब्बल २०० कोटींहून अधिक खर्च करण्यात आला होता. या लग्नाचा व्हिडीओ भारतीय तपास यंत्रणांच्या हाती लागला. त्याच्या लग्नात सहभागी झालेल्या सगळे सेलिब्रिटी तपास यंत्रणांच्या रडारवर आले आहेत.