
मुंबई | Mumbai
ड्रग्ज प्रकरणी NCB ने अटक केल्यानंतर कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचीया यांना अटक केल्यानंतर आज त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं. भारती आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया या दोघांनाही मुंबईच्या किल्ला कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
भारती आणि हर्ष या दोघांनीही जामीनासाठी अर्ज केलेला आहे. आता दोघांच्याही जामीन अर्जावर उद्या (सोमवार) सुनावणी केली जाणार आहे. भारती आणि हर्ष यांच्यासोबतच इतर दोन ड्रग्ज पेडलर्सनाही कोर्टासमोर हजर करण्यात आलं असून दोघांनाही पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, काल NCB च्या मुंबई झोनल युनिटने कॉमेडियन भारती आणि तिचा नवरा हर्ष यांच्या घरी छापा टाकला. यावेळी करण्यात आलेल्या झाडाझडतीत अधिकाऱ्यांना भारतीच्या घरातून गांजा मिळाला. ड्रग पेडलरने दिलेल्या माहितीनंतर NCB ने ही कारवाई केली होती.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाचा तपास सुरु असताना कलाविश्वातील ड्रग्स प्रकरण समोर आलं. या प्रकरणात आतापर्यंत कलाविश्वातील अनेक दिग्गजांची नाव समोर आली आहेत. यात रिया चक्रवर्ती, दीपिका पादुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह, अर्जुन रामपाल त्याची प्रेयसी गॅब्रीएला यांचीदेखील यापूर्वी एनसीबीने चौकशी केली आहे.
याआधी ८ नोव्हेंबर रोजी सकाळी निर्माते फिरोज नाडियाडवाला यांच्या घरावर छापेमारी करण्यात आली होती. यावेळी एनसीबीने 3 मोबाईलसह ड्रग्ज जप्त केले गेले. यानंतर नाडियाडवाला यांच्या पत्नीच्या अटकेची माहिती समोर आली. NCB च्या या कारवाईत फिरोज नाडियाडवाला यांच्या घरात एकूण 717.1 ग्रॅम गांजा, 74.1 ग्रॅम चरस आणि 95.1 ग्रॅम एमडी अमली पदार्थ सापडले होते. याची किंमत ३ लाख ६६ हजार ६१० रुपये आहे. यानंतर NCB च्या अधिकाऱ्यांनी शबाना सईद यांना त्यांच्या गुलमोहर क्रॉस रोडवरील घरातून घरातून अटक केली. तसेच, फिरोज यांची देखील चौकशी करण्यात आली.
तसेच ९ नोव्हेंबर रोजी अर्जुन रामपालच्या घरावर आणि आसपासच्या परिसरावर एनसीबी पथकाने छापा टाकला होता. या धाडीत अर्जुन रामपालच्या घराची तपासणी करण्यात आली. या दरम्यान त्याच्या घरातून अनेक कागदपत्रे आणि वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. तब्बल ७ ते ८ तास हे धाडसत्र सुरू होते. त्यानंतर एनसीबी अधिकाऱ्यांनी अनेक संशयास्पद वस्तू जप्त केल्या. यानंतर त्याला चौकशीसाठी हजर राहण्याबद्दल समन्स बजावण्यात आले होते. अर्जुनसह त्याची मैत्रीण गॅब्रिएला डेमेट्रियड्स हीची देखील चौकशी करण्यात आली होती.