Wednesday, April 24, 2024
Homeमनोरंजन'आंदोलन की पिझ्झा पार्टी' म्हणणाऱ्या ट्रोलर्सला दिलजीत आणि स्वरा भास्करचे सडेतोड उत्तर

‘आंदोलन की पिझ्झा पार्टी’ म्हणणाऱ्या ट्रोलर्सला दिलजीत आणि स्वरा भास्करचे सडेतोड उत्तर

दिल्ली | Delhi

कृषी कायदे शेतकऱ्यांच्या विरोधात असल्याचं सांगत हरियाणा, पंजाब आणि इतर राज्यांमधील हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर गेल्या कित्येक दिवसांपासून आंदोलन करत आहेत. मात्र सध्या सोशल मीडियावर आंदोलनापेक्षा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेली शाही व्यवस्थेची जोरदार चर्चा असून, त्यावर टीकेची झोडही उठत आहे. आता या टीकाकारांना अभिनेता दिलजीत दोसांज व अभिनेत्री स्वरा भास्करने सडेतोड उत्तर दिले आहे.

- Advertisement -

दिलजीतने ट्रोलर्सला उत्तर देतांना म्हंटले आहे की, ‘शेतकरी विष पित होता तेव्हा त्याची चिंता नव्हती. आता तो पिझ्झा खातोय तर त्याची न्यूज होतेय,’ असे ट्विट दिलजीतने केले. दिलजीतचे हे ट्विट सध्या तुफान व्हायरल होत आहे. शेतकरी आंदोलनाचे समर्थकांनी हे ट्विट रिट्विट करण्याचा धडाका लावला आहे.

तसेच स्वरा भास्करने म्हंटले आहे की, ‘जे शेतकरी गव्हाची शेती करतात ते गव्हापासून तयार झालेला पिझ्झा खाऊ शकत नाही का? त्यांचे पाय मेहनतीचे प्रतिक आहेत. त्यांच्या मेहनतीमुळेच देशातील जमीन सुपीक बनते. यांना देखील पायांचा मसाज करण्याचा अधिकार आहे. शेतक-यांना कायम दरिद्री आणि लाचार परिस्थितीतच पाहायची इच्छा असलेले आहेत तरी कोण?.”

दरम्यान, शेतकरी पिझ्झा, बिर्याणीसह वेगवेगळ्या डेझर्टच्या शाही भोजनाचा आस्वाद घेत असून, त्यांच्यासाठी फूट मसाजर खुर्च्यांसह विविध सेवासुविधांनी सुसज्ज निवास व्यवस्था करण्यात आली आहे. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून अनेक संघटनांनी भरघोस मदत केली असून, शेतकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी त्यांच्या राहण्या-खाण्याची शाही बडदास्त ठेवण्यात आली आहे. पंचतारांकीत हॉटेलात असतील अशा सुविधा इथं आहेत.

सध्या दिल्लीत कडाक्याची थंडी असल्यानं शेतकऱ्यांना गरमागरम रोटी मिळावी याकरता भलमोठं रोटी मेकिंग मशीन बसवण्यात आलं आहे. त्यावर एका तासाला 1500 ते 2000 रोट्या तयार होतात. खालसा एड या आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थेनं तर शेतकऱ्यांसाठी फूट मसाज सेंटरच उभारलं आहे. एका तंबूत 25 फूट मसाजर चेअर्स असून प्रत्येक शेतकऱ्याला दहा मिनिटांचा फूट मसाज दिला जातो. द ट्रिब्युननं (The Tribune) दिलेल्या वृत्तानुसार, सिंघू सीमेवर आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या व्यवस्थेत वैविध्यपूर्ण भोजनाचीही व्यवस्था आहे. बारमी आणि बोपाराई गावातील शेतकऱ्यांच्या भारतीय किसान संघटनेनं चहा, खाणं देण्याची व्यवस्था केली होती, आता तर त्यांनी पिझ्झा लंगर सुरू केला आहे. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचे मनोधैर्य टिकून रहावे यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना समाजातील अनेक स्तरांवरून मदत मिळत असून, त्याचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या मदतीबद्दल आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या वेबसाईटवर दखल घेतली जात असून प्रशंसेसह त्याबाबत माहिती दिली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या