पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन

jalgaon-digital
2 Min Read

मुंबई | Mumbai

रामपूर सहसवान घराण्यातील शास्त्रीय संगीतकार पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचं निधन झालं आहे. आज (रविवार) दुपारी मुंबईत त्यांच्या राहत्या घरी निधन झाले, ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्या स्नूषा नम्रता गुप्ता-खान यांनी याबाबत माहिती दिली.

नम्रता गुप्ता-खान यांनी सांगितलं की, उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांनी आपल्या वांद्रे येथील राहत्या घरी रविवारी दुपारी १२.३७ वाजता अखेरशा श्वास घेतला. सकाळी त्यांची प्रकृती ठीक होती, मात्र दुपारी अचानक त्यांची प्राणज्योत मालवली. दीर्घकाळापासून ते आजारी असल्याने त्यांची सुश्रृषा करण्यासाठी घरी २४ तास नर्सची नियुक्ती करण्यात आली होती. प्रकृती ठीक असताना अचानक मृत्यूची बातमी ऐकून त्यांच्या कुटुंबियांनाही धक्का बसल्याचे नम्रता गुप्ता-खान यांनी सांगितले. उस्ताद खान यांना २०१९ मध्ये ब्रेनस्ट्रोकचा झटका आला होता. त्यामुळे त्यांच्या शरीराची डाव्या बाजूला अर्धांगवायूचा त्रास झाला होता.

उस्ताद गुलाम मुस्तफा खान हे रामपूर-सहसवान घराण्यातील असून १९३१ साली बदायूमध्ये त्यांचा जन्म झाला होता. आपल्या प्रतिभेने, कलेने त्यांनी देश-विदेशात उत्तर प्रदेशचे नाव पोहोचवले. गुलाम मुस्तफा खान यांनी अगदी लहान वयातच गायला सुरुवात केली होती. उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांना १९९१ मध्ये पद्मश्री किताबाने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर २००६ मध्ये पद्मभूषण तर २०१८ मध्ये त्यांना पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर २००३ मध्ये त्यांना भारतीय संगीत क्षेत्रातील दिग्गज पुरस्कार मानल्या जाणाऱ्या संगीत नाटक अॅकॅडमी अॅवॉर्डने सन्मानित करण्यात आलं होतं.

उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांच्यासोबत काम केलेल्या भारतीय संगीत क्षेत्रातील दिग्गज गायिका लता मंगेशकर आणि संगितकार ए. आर. रहमान यांनी त्यांच्या निधनाबद्धल शोक व्यक्त केला असून सोशल मीडियावरुन श्रद्धांजली वाहिली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *