Friday, April 26, 2024
Homeमनोरंजनबॉलिवूड हादरले! सुशांत सिंह राजपूतसोबत काम केलेल्या अभिनेत्याची आत्महत्या

बॉलिवूड हादरले! सुशांत सिंह राजपूतसोबत काम केलेल्या अभिनेत्याची आत्महत्या

मुंबई l Mumbai

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूतून बॉलिवूड सावरत असतांना बॉलिवूडमधल्या आणखी एका अभिनेत्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. द अनटोल्ड स्टोरी या सिनेमात सुशांत सिंग राजपूतसोबत

- Advertisement -

झळकलेला अभिनेता संदीप नाहर याने मंगळवारी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुंबईत गोरेगावमधील राहत्या घरात संदीपचा मृतदेह आढळला. आत्महत्येपूर्वी संदीपने फेसबुकवर एक व्हिडिओ आणि सुसाइड नोट शेअर केली.

संदीप नाहर याने सुशांत सिंह राजपूत याच्या अभिनयामुळे लोकप्रिय झालेल्या धोनी सिनेमात तसेच अक्षय कुमारच्या केसरी सिनेमात भूमिका साकारल्या होत्या. ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या सिनेमात संदीप नाहर याने धोनीपेक्षा वयाने मोठा असलेला आणि खेळाच्या सामानाचे दुकान चालवणारा व्यावसायिक ही भूमिका साकारली होती. सिनेमात तो धोनीच्या खेळाचा चाहता दाखवला आहे. तर ‘केसरी’ सिनेमात संदीप नाहर याने एका जवानाची भूमिका साकारली होती. कौटुंबिक आणि आर्थिक कारणांमुळे त्रस्त झालेल्या संदीप नाहर याने टोकाचे पाऊल उचलत असल्याचे जाहीर करुन नंतर आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

काय म्हटलंय फेसबुक पोस्टमध्ये?

मी आयुष्यात खूप सुख-दुख पाहिले. समोर येणाऱ्या प्रत्येक समस्येचा सामना केला. मात्र, सध्या मी ज्या परिस्थितीतून जात आहे, मला ते सहन होत नाही. आत्महत्या करणे योग्य नाही, हे मलाही ठाऊक आहे. पण माझी पत्नी कांचन शर्मा आणि तिच्या वडिलांनी मला कधीच संमजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. मला जगायचे होते. परंतु, जिथे सेल्फ रेस्पेक्ट नाही, तिथे जगून काय फायदा! माझी पत्नी खूप रागिष्ट आहे. तिच्या आणि माझ्या पर्सनॅलिटीमध्ये खूप फरक आहे. दररोज क्लेश सहन करण्याची शक्ती आता माझ्यात नाही. माझ्या आयुष्यात मी अनेक अडचणी पाहिल्या. मी कित्येक वर्षांपासून मुंबईत आहे. मी वाईट वेळही पाहिली पण कधीच खचलो नाही. स्ट्रगल करत होतो, पण समाधानी होतो. आज मी खूप काही मिळवले आहे. पण मला लग्नानंतर समाधान नाही. माझे गेल्या दोन वर्षात संपूर्ण आयुष्य बदलून गेले आहे. या गोष्टी मी कोणालाच सांगू शकत नाही. मी खूप आधीच आत्महत्या केली असते. पण मी स्वत:ला वेळ देण्याचे ठरवले. सर्वकाही ठिक होईल, स्वतःला प्रोत्साहीत केले. पण दररोज क्लेश, त्यामध्ये मी अडकलो आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी आत्महत्याशिवाय दुसरा कोणताच मार्ग नाही. आता मला हे पाऊल आनंदाने उचलावे लागेल, असे संदीपने पोस्टमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, आत्महत्येपूर्वी संदीपने पत्नी आणि सासूच्या स्वभावदोषाकडे बोट दाखवलं होतं. त्यानंतर सुशांतचे चाहते सोशल मीडियावर आक्रमक झाले आहेत. #SSRiansFightBack हा हॅशटॅग ट्रेण्ड करत सुशांतसोबत संदीपलाही न्याय देण्याची मागणी चाहत्यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या