Friday, April 26, 2024
Homeमनोरंजनकरोनामुळे बॉलीवूडचे सुमारे ८ हजार कोटींचे नुकसान

करोनामुळे बॉलीवूडचे सुमारे ८ हजार कोटींचे नुकसान

दिल्ली l Delhi

करोनाचा बॉलिवूडला जोरदार फटका बसला. मार्च महिन्यात झालेल्या लॉकडाऊनमुळे फिल्म इंडस्ट्री ठप्प झाली होती. चित्रपटांचे शूटिंग पूर्णपणे थांबवावे लागले. स्टार्स आपापल्या घरात कैद झाले आणि कामावर परतण्यासाठी ही महामारी संपण्याची प्रतीक्षा करु लागले. पण

- Advertisement -

आता अनेक स्टार्स सेटवर परतू लागले आहेत. बऱ्याच मोठ्या स्टार्सनी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. मात्र सुमारे अडीच अब्ज डॉलरच्या हिंदी सिनेसृष्टीला २०२० या एका वर्षात प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागले. अनेक कलाकारांचे मृत्यू आणि काही जणांच्या आत्महत्या तसेच आठ हजार कोटी रुपयांचे नुकसान यामुळे बॉलिवूड हादरले आहे.

जवळपास सात महिने देशातली थिएटर बंद होती. थिएटर आणि मल्टिप्लेक्स पुन्हा सुरू झाली तरी अद्याप प्रेक्षकांची पावले मोठ्या पडदयाकडे वळलेली नाही. जास्त प्रेक्षक येत नसल्यामुळे सिनेमांना ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केले जात आहे. मोठ्या पडद्याअभावी बॉलिवूडला आठ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले. तिकीट विक्रीतून होणारे उत्पन्न घटल्यामुळे बॉलिवूडची आर्थिक कोंडी झाली. पीव्हीआर सारख्या बलाढ्य मल्टिप्लेक्स कंपनीला २०१९ मध्ये ४८ कोटींचा नफा आणि २०२० मध्ये १८४ कोटींचा तोटा झाला.

निर्मात्यांचे नुकसान होऊ लागल्यामुळे अनेक मोठ्या कलाकारांनी सिनेमासाठी मोठी रक्कम मागणे थांबवले आहे. त्यांनी परिस्थिती बघून स्वतःसाठी मागत असलेले पैसे कमी करायला सुरुवात केली आहे. लसीकरणातून करोनावर नियंत्रण मिळवणे शक्य झाले तर पुढील वर्षभरात परिस्थिती हळू हळू सावरेल, अशी आशा बॉलिवूडच्या अनुभवींना वाटत आहे. नव्या वर्षात संकटातून बाहेर पडू या एकाच आशेवर बॉलिवूड जगत आहे.

मार्च २०२० मध्ये अंग्रेजी मीडियम हा हिंदी सिनेमा देशातील अनेक थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या सिनेमाला अवघे काही दिवस झाले असतानाच करोना संकटामुळे लॉकडाऊन जाहीर झाले. यानंतर बॉलिवूडला अवकळा येण्यास सुरुवात झाली. एकाचवेळी शेकडो थिएटरमध्ये सिनेमा प्रदर्शित करुन अल्पावधीत खर्च वसूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या बॉलिवूडला थिएटर ऐवजी ओटीटी प्लॅटफॉर्मला (Over-the-top media Platform) प्राधान्य देण्याची वेळ आली.

कोरोनामुळे २०२० मध्ये पहिल्यांदाच थिएटरला पर्याय शोधण्याची वेळ मनोरंजनसृष्टीवर आली. नेटफ्लिक्स, अॅमेझॉन आणि डिस्ने+हॉटस्टार या तीन लोकप्रिय अॅपवर (ओटीटी प्लॅटफॉर्म / स्ट्रीमिंग) मोठ्या संख्येने सिनेमांना प्रदर्शित करण्यात आले. या व्यतिरिक्त झी फाइव्ह आणि सोनी लिव्ह या अॅपवरही निवडक सिनेमांना प्रदर्शित करण्यात आले.

करोनामुळे अनेकांच्या उत्पन्नात घट झाली आहे. लॉकडाऊन काळात आर्थिक नुकसान झाल्यामुळे अनेक खासगी आस्थापनांनी कर्मचाऱ्यांची पगार कपात करणे, काही जणांना नोकरीवरुन काढणे, खर्चात कपात करणे, भरती थांबवणे असे उपाय करुन स्वतःला सावरण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. या बिकट परिस्थितीत आर्थिक अडचणी सोडवणे तसेच दैनंदिन गरजा भागवणे नागरिकांसाठी अत्यावश्यक झाले आहे. यामुळे सिनेमा बघण्याला मिळणारे महत्त्व कमी झाले आहे. परिस्थिती सुधारेपर्यंत सिनेमासाठी थिएटर वा मल्टिप्लेक्सकडे नागरिकांची पावले वळणार नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या