Bimal Roy Birth Anniversary: मनोरंजनातुन समाजप्रबोधन करणारे 'बिमल रॉय'

Bimal Roy Birth Anniversary: मनोरंजनातुन समाजप्रबोधन करणारे 'बिमल रॉय'

आज १२ जुलै. मनोरंजनातुन समाजप्रबोधन करणारे 'बिमल रॉय' यांचा जन्मदिवस. हिंदी चित्रपटसृष्टीत त्या काळात कधी शेतकऱ्यांची व्यथा, रहस्यमय, विरह, समाजव्यवस्था आदी विषय त्यांनी आपल्या चित्रपटातून हाताळले आणि आपली वेगळी छाप त्यांनी निर्माण केली. ते खास करून चित्रपटामध्ये सौंदर्याचा वापर करून घेणार दिग्दर्शक म्हणून ओळखले जात. त्यांच्या चित्रपटातील प्रत्येक फ्रेम ही कलात्मक असायची.

बिमल रॉय यांच्या चित्रपटात संवेदनशील नातेसंबंध आणि समाजातील उपेक्षित वर्गांचे चित्रण असायचे. बिमल रॉय यांनी एक तरुण फिल्ममेकर म्हणून त्याकाळी अनेकांना प्रेरणा दिली. गुलजार यांना बिमल रॉय यांनी त्यांच्या "बंदिनी' या चित्रपटासाठी त्यांना संधी दिली आणि त्यांनी लिहिलेले "मोरा गोरा अंग लै ले..' हे नूतन यांच्यावर चित्रित झालेले गाणे सुपरहिट ठरले. बिमल रॉय स्वत:च एक चित्रपटाची शाळा होती असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

बलराज सहानी यांची दो बिघा जमींन बद्दल एक आठवण सांगितली जाते. बलराज सहानी हे त्या काळातले एक उच्चविद्याभूषित होते. कलकत्त्यात ते तेव्हा प्राध्यापकी करत. इंग्लंडवरून शिकून आल्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्त्व हे साहेबी होतं. बिमल रॉय हे चित्रपट बनवत असल्याचं त्यांना कळल्यानंतर ते त्यांना भेटायला गेले व आपल्याला या चित्रपटात भूमिका करायची आहे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.

बिमल रॉय यांचं पात्र हे एका गरीब शेतक-याचं, एका रिक्षावाल्याचं होतं. बलराज सहानी यांना सुटाबुटात पाहून बिमल रॉय यांनी त्यांना ही भूमिका देण्याचं नाकारलं. बलराज सहानी यांनाही आपली चूक कळून आली. त्यानंतर या भूमिकेसाठीच्या पोषाखात त्यांनी वावरून त्या भूमिकेचा अभ्यास केला. इतकंच नव्हे तर आपल्या बायका-मुलांना घेऊन त्यांनी कलकत्त्यात काही काळ रिक्षा ओढण्याचाही सराव केला. या सा-या गोष्टीचा अभ्यास करून मग ते पुन्हा बिमल रॉय यांना भेटायला गेले. त्यांना त्या लुकमध्ये पाहिल्यावर मग बिमल रॉय यांनी त्यांना ही भूमिका देऊ केली.

कलाकाराच्या प्रभावापुढे न झुकणारे असे ते दिग्दर्शक व आपल्या दिग्दर्शकाच्या समाधानासाठी प्रचंड कष्ट घेणारे ते कलाकार आता सापडणं मुश्कीलच. बिमल रॉय हे त्या काळातले एकमेव असे दिग्दर्शक होते ज्यांच्या घरी दिलीप कुमार स्वत: कथा ऐकायला येत असे. एरवी सर्वच दिग्दर्शकांना दिलीप कुमार आपल्या घरी बोलावत अस्त. बिमल रॉय यांनी मात्र कधीही फोन केला तर ते लागलीच त्यांच्या घरी येत असत. दिलीप कुमार यांच्या अभिनय कारकिर्दीतली सर्वात प्रभावी व्यक्तिरेखा म्हणजे देवदास हा चित्रपट होय असे दिलीप कुमार स्वत:च म्हणत आहे.

भारतीय चित्रपट इतिहासात जे देदीप्यमान तारे चमकून गेले त्यामध्ये निर्माते-दिग्दर्शक बिमल रॉय यांचे स्थान अढळ आहे. रॉय यांच्या चित्रपटांना आजमितीस अनेक वर्षे लोटली तरी त्यातील आशय, कलात्मकता आणि सर्जनशीलता सामान्य रसिकांच्या हृदयाचा ठाव अजूनही घेत असतात. १९११ ते १९६६ या काळातील ‘उदयरे पथे’, ‘दो बीघा जमीन’, ‘परिणीता’, ‘बिराज बहू’, ‘देवदास’, ‘मधुमती’, ‘सुजाता’, ‘बंदिनी’, ‘परख’ आणि ‘बापबेटी’ अशी अनेक चित्ररत्ने रॉय यांच्या श्रेष्ठत्वाची जाणीव करून देतात.

बिमल रॉय यांचे ८ जानेवारी १९६६ कर्करोगाने निधन झाले. त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे अर्धवट राहिलेला सहारा हा चित्रपट पुढे हृषिकेश मुखर्जी यांनी चैताली (१९७५) ह्या नव्या स्वरूपात सादर केला; पण कुंभमेळ्यावर बेतलेली अमृत कुंभेर संधाने ही महान कलाकृती निर्माण करण्याचे त्यांचे स्वप्न अपुरे राहिले.

देशविदेशातल्या महोत्सवातून आजही प्रेक्षकांना अंतर्मुख करणाऱ्या बिमलदांच्या कृष्णधवल चित्रपटांचे पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातर्फे जतन, पुनर्संचयन आणि डिजिटलायझेशन केले जात आहे. बिमलदांनी रूपेरी पडद्यावर सादर केलेल्या विविध कलाकृतींद्वारा भारतीय चित्रपटांचा चेहरामोहरा बदलला आणि प्रेक्षकांच्या सामाजिक जाणिवा आणि अभिरुचीही बदलली. भारतीय चित्रपटांच्या इतिहासात त्यांना मानाचे आणि अग्रणी स्थान आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com