
मुंबई | Mumbai
बिग बॉस 16 चा (Bigg Boss) फिनाले अखेर पार पडला आणि यंदाच्या सिझनला त्याचा विजेता मिळाला. पुण्याच्या झोपडपट्टीतून पुढे येत रॅपर म्हणून नाव कमावलेल्या एम सी स्टॅननं (MC Stan) बिग बॉस 16 च्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आणि अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला. पण हा एमसी स्टॅन आहे तरी कोण? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
पुणेकर असलेल्या एमसी स्टॅनचं (Bigg Boss 16) खरं नाव अल्ताफ शेख (Altaf Shaikh) असं आहे. त्याला बालपणीच संगीताची गोडी लागली. त्याने लोकप्रिय रॅपर रफ्तारसोबतही गाणं गायलं आहे. पण 'वाता' या गाण्यामुळे तो तरुणांमध्ये लोकप्रिय झाला. या गाण्याला युट्यूबवर २१ मिलियन व्हू्यूज मिळाले आहेत.
२३ वर्षीय एमसी स्टॅन कोट्यवधींचा मालक आहे. गाणी, युट्यूब आणि कॉन्सर्टच्या माध्यमातून तो दर महिन्याला लाखो रुपये कमावतो. एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या एमसीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. कुटुंबियांनीदेखील त्याला त्याच्या गाण्यांमुळे टोमणे मारले आहेत. पण तरीही त्याने त्याची आवड जोपासली. आज त्याची गाणी लोकप्रिय झाली असून तो सध्या एक प्रसिद्ध रॅपर आहे.
एमसी स्टॅन लहानपणापासूनच तो गरिबीत वाढला. स्टॅनने त्याच्या करिअरची सुरुवात कव्वाली गायक म्हणून केली होती. बरीच वर्ष तो कव्वाली गायन करायचा. वयाच्या 12 व्या वर्षापासून तो गायन क्षेत्रात आहे. कव्वाली गाता गाता त्याचं लक्ष रॅपकडे गेलं. हा काही तरी वेगळा प्रकार आहे. त्यात वेगळ काही करता येईल असं त्याला वाटू लागलं. त्यामुळे रॅपकडे आकर्षित होऊन त्याने कव्वाली गायन बंद करून तो रॅपर बनला.
एकेकाळी स्टॅनला रस्त्यावर झोपावं लागलं आहे. लहानपणापासून त्याच्या वाट्याला संघर्ष आला. गरीबीत आयुष्य गेलं. त्याचं शिक्षणात मन रमत नव्हतं. त्याचा कल गाण्याकडे होता. त्यामुळे घरच्यांकडून त्याला नेहमी बोलणं खावं लागायचं. ‘समझ मेरी बात को’ हे गाणं गाऊन त्याने करीअरची सुरुवात केली. या गाण्यातून त्याने डिव्हाईन आणि एमीवे आदी गायकांवर टीका केली होती. त्यामुळे स्टॅन ट्रोलही झाला होता. त्यानंतर त्याचं ‘अस्तगफिरुल्लाह’ हे गाणं आलं.
त्यातून त्याने त्याच्या संघर्षाची कहानी सांगितली होती. या गाण्यामुळे त्याच्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोण बदलला. त्याने असंख्य रॅप साँग म्हटली आहेत. मात्र, ‘वाटा’ या गाण्याने त्याचं नशीब बदललं. बिग बॉसच्या घरात स्टॅन अतिशय शांत होता. सुरुवातीच्या आठवड्यात तर त्याने कोणाशीही मैत्री केली नव्हती.
तो एकटा दिसायचा. त्याचे आणि शिव ठाकरेचे भांडण झाले होते. मात्र नंतर हळूहळू त्याची शिव आणि अब्दू रोझिक साजीद खान, गोरी नागोरी यांच्याशी चांगली मैत्री झाली. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी बिग बॉसच्या घरात आयोजित कॉन्सर्टमध्ये स्टॅनने परफॉर्म केले आणि चाहत्यांची मने जिंकून घेतली होती.