संजय दत्तच्या आजाराबाबत मान्यता दत्तचा आणखी एक खुलासा
मनोरंजन

संजय दत्तच्या आजाराबाबत मान्यता दत्तचा आणखी एक खुलासा

अभिनेता संजय दत्त सध्या कॅन्सरशी झुंज देत आहे

Ramsing Pardeshi

मुंबई - Mumbai

अभिनेता संजय दत्त Sanjay Dutt सध्या कॅन्सरशी झुंज देत आहे. या प्रसंगी असंख्य चाहत्यांनी त्याच्यासाठी प्रार्थना करण्यासही सुरुवात केली आहे. यातच आता संजूबाबाच्या पत्नीनं अत्यंत महत्त्वाची माहिती देत त्याच्या उपचारांसाठी पुढं नेमकी कशी पावलं उचलली जाणार आहेत याबाबतचा खुलासा केला.

मंगळवारी मान्यतानं एक पत्रक प्रसिद्ध करत याबाबतची माहिती दिली. ज्यामध्ये संजय त्याच्या आजारासाठीचे सर्व प्राथमिक उपचार मुंबईतच करणार असल्याचं तिनं सांगितलं. ’आम्ही त्याचे (संजय दत्तचे) प्राथमिक उपचार मुंबईतच करणार आहोत. पुढील बेत हे कोविड १९ बाबतची एकंदर परिस्थिती पाहून आखण्यात येतील. सध्याच्या घडीला कोकिलाबेन रुग्णालयातील सर्वोत्तम डॉक्टर संजूची काळजी घेत आहेत, त्याच्यावर उपचार करत आहेत’, असं मान्यता या पत्रकातून म्हणाली.

संजय दत्तच्या आजाराबाबत, कर्करोग ज्या टप्प्यात आहे त्याबाबत तर्कवितर्क लावणं थांबवा आणि डॉक्टरांना त्यांचं काम करु द्या, अशी विनंतीही तिनं सर्वांना केली. शिवाय संजूबाबाच्या तब्येतीबाबतची सर्व माहिती वेळोवेळी आपण देत राहू याची हमीही दिली.

संजय दत्त हा खर्‍या अर्थानं आपल्या कुटुंबाचा आत्मा असल्याचं म्हणत या प्रसंगी कुटुंबाला मोठा हादरा बसल्याची बाब तिनं नाकारली नाही. आव्हानाच्या या प्रसंगी चाहत्यांच्या प्रार्थना, सदिच्छा आणि देवाचा आशीर्वाद यांच्या बळावर या संकटातून आपण विजेत्याप्रमाणं जिंकून बाहेर पडू असा विश्वास तिनं व्यक्त केला.

काही दिवसांपूर्वीच संजय दत्तला फुफ्फुसाच्या कॅन्सरची लागण झाल्याचं निदान झालं होतं. ज्यानंतर त्यानंच सोशल मीडिया पोस्ट लिहित आपण येत्या काळात कामापासून आणि कलाविश्वातून विश्रांती घेत असल्याचं जाहीर केलं जात होतं.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com