
बॉलीवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे त्यांच्या वेगवेगळ्या स्टाईलसाठी ओळखले जातात. वयाची ८० वर्षे पूर्ण केल्यानंतरही अमिताभ यांचा उत्साह हा नवोदित कलाकारांना लाजवणारा आहे. बिग बी हे सोशल मीडियावर देखील व्हायरल होत असतात. आता त्यांचा व्हायरल झालेला व्हिडिओ हा नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतो आहे.
अमिताभ यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोमध्ये ते एका व्यक्तीच्या मागे बाईकवर बसलेले दिसत आहेत. हा फोटो पोस्ट करत अमिताभ यांनी लिहिलं आहे की, 'ही बाईक राईड घडवून आणणाऱ्याचे आभार. मी खरं तर तुला ओळखत नाही. परंतु तू मला माझ्या कामाच्या ठिकाणी अगदी वेळेत पोहोचवले. ते सुद्धा मुंबईचा ट्रॅफिकमधून... टोपी, पिवळा टीशर्ट घातलेल्या मित्रा मनापासून धन्यवाद...'
मुंबईतील ट्रॅफिकमुळे अमिताभ यांना सेटवर पोहोचण्यासाठी आलिशान गाडी सोडून बाईकचा आधार घ्यावा लागल्याचं या फोटोवरून स्पष्ट होत आहे. अमिताभ यांचा बाईक राईडचा हा फोटो पाहिल्यावर नेटकऱ्यांनी त्यांचं भरभरून कौतुक केलं आहे. अनेकांनी कॉमेन्टमधून त्यांच्या प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या आहेत.
हा फोटो पाहून बीग बींची नात नव्या नवेली हिला देखील कॉमेन्ट करण्याचा मोह आवरलेला नाही. तिनं कमेन्टमध्ये हसण्याचा आणि हार्ट इमोजी शेअर केला आहे. तर काही नेटकऱ्यांनी बिग बींचे नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे. एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की, 'तुम्ही ग्रेटच आहात सर, तुमचा वक्तशीरपणा आम्हाला नेहमीच प्रेरणा देत राहील. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा.'
अमिताभ बच्चन त्यांच्या आगामी ‘प्रोजेक्ट के’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या बहुचर्चित चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासह प्रभास आणि दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत दिसतील. १२ जानेवारी २०२४ रोजी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.