बच्चन पिता-पुत्र करोना संक्रमित
मनोरंजन

बच्चन पिता-पुत्र करोना संक्रमित

जया बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांचा करोना अहवाल निगेटिव्ह

Sarvmat Digital

मुंबई (MUMBAI): सुपरस्टार अमिताभ बच्चन व त्यांचे पुत्र अभिनेते अभिषेक बच्चन यांना करोना संक्रमण झाले आहे. त्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून त्यांना नानावटी इस्पितळात दाखल केले आहे. जया बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांचा करोना अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती काही वाहिन्यांनी प्रयोगशाळेच्या हवाल्याने दिली आहे.

स्वत: अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटरवरून याबाबतची माहिती शनिवारी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास शेअर केली. हे ट्विट व्हायरल झाले असून अनेकांनी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे. यात अनेक राजकीय नेत्यांपासून सेलिब्रिटींचा समावेश आहे.

नानावटी इस्पितळात दाखल करण्याआधीच त्यांनी घरात स्वत:चे विलगीकरण केले होते. लॉकडाऊनच्या काळात, 25 मार्च पासून ते आपल्या बंगल्यातच होते. काही दिवसांपूर्वी कौन बनेगा करोडपती या मालिकेच्या प्रोमोच्या शुटींगसाठी एक टिम त्यांच्या बंगल्यावर आली होती. तेव्हाच ते परिवारा व्यतिरिक्त अन्य जणांच्या संपर्कात आले होते, अशी माहिती समोर येत आहे.

बच्चन कुटुंबाची करोना रॅपीड टेस्ट शनिवारी सकाळी करण्यात आली होती. त्या टेस्टमध्ये अमिताभ बच्चन यांना संक्रमण झाल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, त्यांच्या कुटुंबियांचा संपूर्ण अहवाल समोर येणे अद्याप बाकी आहे. रात्री 10 वाजेच्या सुमारास त्यांना नानावटी इस्पितळात दाखल करण्यात आले. त्यानंतर रात्री त्यांच्या काही चाचण्या सुरू होत्या. मात्र नानावटीच्या वैद्यकीय सुत्रांच्या हवाल्याने त्यांची तब्येत स्थिर असल्याची माहिती काही वाहिन्यांनी दिली.

बच्चन पिता-पुत्र करोनाच्या संकटातून लवकर बरे व्हावेत यासाठी अनेकांनी प्रार्थना केली आहे. मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर, महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चव्हाण, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह देशातील राजकीय नेते, बॉलिवुड सितारे, साऊथ सिनेमाने स्टार आदींनी त्यांना बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Deshdoot
www.deshdoot.com