
नवी दिल्ली |New Delhi
‘गदर’ फेम अभिनेत्री अमिषा पटेल हिचे बरेच चाहते आहेत. तिची गदर या सिनेमातील सकीना ही भूमिका बरीच गाजली. लवकरच तिचा ‘गदर 2’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. दरम्यान आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमिषा पटेल रांचीच्या दिवाणी न्यायालयाला शरण गेली आहे. यावेळी ती ओढणीने चेहरा लपवताना दिसली.
अभिनेत्री अमिषा पटेलवर २०१८ साली अडीच कोटींच्या फसवणुकीचा आरोप करण्यात आला होता. रांची येथील अजय कुमारने अभिनेत्रो अमिषा पटेल आणि तिचा व्यवसाय भागीदार या दोघांवर चेक बाऊन्स, फसवणूक आणि धमकावल्याचा आरोप केला होता. ‘देसी मॅजिक’ चित्रपट बनवण्याच्या नावाखाली अमिषाने अडीच कोटी रुपये घेतल्याचा दावा त्याने केला. त्यानंतर चित्रपट पूर्ण झाल्यावर ती व्याजावर परत करेल असं अमिशाने सांगितलं होतं. पण तिने पैसे परत केले नाहीत असे आरोपकर्त्याचे म्हणणे आहे.
त्यानंतर फसवणूक झाल्याप्रकरणी अजय दिवाणी याने न्यायालयात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर न्यायालयाकडून अमिषावर अनेकदा समन्स बजावण्यात आले. पण ती कधीच कोर्टात गेली नाही. पण आता वॉरंट जारी झाल्यानंतर ती स्वतः न्यायालयाला शरण गेली. सध्या अमिषाला १० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला.मात्र २१ जून रोजी तीला न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे. जर ती हजर राहली नाही तर तिला अटक होऊ शकते असे न्यायालयाने सांगितले.