स्थायी व महिला समिती सदस्य निवडीवरून गोंधळ

0

नीता घुले यांचा समिती सदस्यत्वाचा राजीनामा

अहमदनगर (प्रतिनिधी) – महापालिकेत रिक्त झालेल्या स्थायी समिती व महिला बालकल्याण समिती सदस्य नियुक्तीच्या महासभेची सुरुवात गोंधळापासून झाली. काँग्रेस गटनेत्याचे पत्र नसल्याने त्यांच्या जागा रिक्त ठेवत अन्य पक्षांच्या सदस्य नियुक्तीची घोषणा महापौर सुरेखा कदम यांनी सभागृहात केली. त्यानंतरही राष्ट्रवादी व भाजपच्या सदस्यांनी निषेध करीत पुन्हा कल्ला सुरू केला. भाजपच्या खासदार दिलीप गांधी यांच्या गटाचे गटनेते सुवेंद्र गांधी यांचे पत्र विचारात न घेता महापौर कदम यांनी आगरकर गटाचे महापालिकेतील गटनेते दत्ता कावरे यांच्या पत्रानुसार भाजप सदस्याची नियुक्ती सभागृहात केली.
महापालिकेत स्थायी समितीच्या रिक्त झालेल्या आठ व महिला बालकल्याण समितीच्या सोळा सदस्य निवडीसाठी बुधवारी (दि. 21) महापौर सुरेखा कदम यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी एक वाजता विशेष महासभा सुरू झाली. सभागृहात केवळ चार माईक उपलब्ध होते. राष्ट्रवादी आघाडीचे नगरसेवक तथा माजी सभागृह नेता कुमारसिंह वाकळे, स्वप्निल शिंदे, संपत बारस्कर यांनी प्रशासनाला धारेवर धरले. माईक काढून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असून महापालिकेत सत्ताधार्‍यांची हिटलरशाही असल्याचा आरोप स्वप्निल शिंदे यांनी केला.
सभागृहात आमचे प्रश्‍न मांडण्याचा अधिकार असताना सत्ताधार्‍यांनी माईक काढून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोपी कुमारसिंह वाकळे यांनी केला. त्यानंतर सत्ताधारी सेनेचे सभागृह नेता अनिल शिंदे, स्थायी समितीचे सभापती सचिन जाधव यांनी विरोधकांच्या सुरात सूर मिळवित माईक उपलब्ध न करणार्‍या ठेकेदारावर कारवाईची मागणी केली. त्यावर समाधान न झाल्याने शिंदे, ठेकेदाराचा ठेका आताच्याआत्ता रद्द करा अशी मागणी करत वाकळे यांनी सभागृहाचे काम होऊ न देण्याची भूमिका मांडली. त्यामुळे सभागृहात एकाच गोंधळ सुरू झाला.
त्यातच महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती नसीम शेख यांनी प्रभागातील कचरा उचलला जात नसल्याचा निषेध म्हणून सभागृहात जमिनीवर बसून आंदोलन सुरू केले. आयुक्तांना निवेदन दिल्यानंतर अन् महापौरांनी कार्यवाहीचे आश्‍वासन दिल्यानंतर शेख यांचे आंदोलन संपले. सभा सुरू झाल्यानंतर पहिला अर्धा तास सभागृहात फक्त गोंधळ सुरू होता.
महापौर कदम यांनी सभेला सुरुवात करत गटनेत्यांना स्थायी समिती सदस्यांची नावे बंद पाकिटात देण्याची सूचना केली. सेनेचे गटनेते संजय शेंडगे प्रथम व्यासपीठावर जात त्यांनी महापौरांकडे बंद पाकिट सुपूर्द केले. त्यानंतर राष्ट्रवादीचे संपत बारस्कर, भाजपचे सुवेंद्र गांधी, काँग्रेसच्या सविता कराळे, मनसेच्या सुवर्णा जाधव, वीणा बोज्जा, भाजपचे आगरकर गटाचे दत्ता कावरे, राष्ट्रवादीचे समदखान, काँग्रेसचे मुदस्सर शेख यांनीही सदस्यांची नावे असलेली बंद पाकिटे महापौर कदम यांना दिली. चार गटनेत्यांना नावे देण्याची सूचना केल्यानंतरही व्यासपीठावर प्रत्यक्षात नऊ नगरसेवकांनी सदस्यांची नावे असलेली पाकिटे महापौरांना देत गटनेते पदाची खिचडी झाल्याचे सभागृहात दाखवून दिले. आलेल्या पाकिटांची छाननी करत महापौर कदम यांनी नियुक्ती करत असलेल्या स्थायी समिती व महिला बालकल्याण समिती सदस्यांच्या नावाची घोषणा महासभेत केली.
घोषणा होताच नियमानुसार कामकाज केले नाही असे सांगत राष्ट्रवादी या प्रक्रियेचा निषेध करत असल्याची घोषणा नगरसेवक संजय घुले यांनी केली. सुवेंद्र गांधी यांचे पत्र विचारात न घेतल्याने भाजपही या प्रक्रियेचा निषेध करत असल्याची घोषणा उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी केली. सभेचा शेवट असा निषेधाने झाला.
दरम्यान महिला बालकल्याण समितीच्या सदस्यपदी नीता अविनाश घुले यांची निवड झाली होती. पण त्यांनीही या पदाचा राजीनामा दिला आहे.

ठेकेदाराचा ठेका रद्द
महापालिकेच्या सभागृहात माईक व्यवस्था करण्याचा ठेका खासगी ठेकेदाराला दिला आहे. ठेकेदाराने माईक न बसविण्यामागे सत्ताधारी असल्याचा आरोप कुमारसिंह वाकळे, स्वप्निल शिंदे यांनी केला. मात्र तसे नाही. विशेष सभेला चारच माईक देतो असे सांगून विद्युत विभागप्रमुख सावळे यांनी सत्ताधार्‍यांची बाजू सेफ करण्याचा प्रयत्न केला. त्यावरून सुरू असलेला गोंधळ वाढल्याने आयुक्तांनी त्याला म्हणणे मांडण्याची संधी देऊ मग कारवाई करू असे सांगितले. मात्र गोंधळ वाढल्याने अखेर महापौर कदम यांनी ठेकेदाराचा ठेका रद्द करत असल्याची घोषणा केली.

महापौर पोलीस प्रशासनावर संतापल्या
सभा सुरू होताच महापौर कदम यांनी प्रेक्षक गॅलरीतील प्रेक्षकांना बाहेर काढण्याचे आदेश पोलिसांना दिले. सभा सुरू होऊन अर्धा तास झाला तरी प्रेक्षक गॅलरीत बसून होते. त्यामुळे महापौर पोलीस प्रशासनावर संतापल्या. त्यानंतर सेनेचे अनिल शिंदे, सचिन जाधव यांनी प्रेक्षकांना आजच्या दिवस बसू देण्याची विनंती महापौरांना केली. मात्र सेनेच्या महिला सदस्यांनी त्यास हरकत घेतली. त्यामुळे महापौरांनी प्रेक्षकांना बाहेर काढण्याची सूचना पोलिसांना केली. त्यानंतर पोलिसांनी प्रेक्षकांना गॅलरीतून बाहेर काढले.

गांधी गटाची स्वतंत्र चूल
महासभेत भाजपच्या गांधी गटाच्या नगरसेवकांनी सभागृहात स्वतंत्रपणे बसणे पसंत केले. उपमहापौर श्रीपाद छिंदम, सुवेंद्र गांधी, महेश तवले, बाबासाहेब वाकळे, मनीषा बारस्कर, नंदा कुलकर्णी, मालन ढोणे या गांधी गटाच्या नगरसेवकांनी एका बाजूला बसत एकीचे दर्शन घडविले. दत्ता कावरे, उषा नलावडे हे आगरकर गटाचे नगरसेवक स्वतंत्र बसले होते.

आगरकर गटाची सरशी अन् सेनेचा समतोलाचा प्रयत्न
भाजपातही गटनेते पदावरून खासदार गटाचे सुवेंद्र गांधी व आगरकर गटाचे दत्ता कावरे यांच्यात वाद सुरू आहे. सुवेंद्र गांधी यांनी पत्र दिल्यानंतर कावरे यांनीही महापौरांना पत्र दिले. पण महापौरांनी गांधी यांचे पत्र बाजूला ठेवत कावरे यांच्या पत्रानुसार सदस्यांची नियुक्ती केली. मात्र सेनेच्या कोट्यातून भाजपच्या बाबासाहेब वाकळे यांना स्थायी समितीवर संधी देत सत्ताधारी सेनेने आगरकर-गांधी गटात समतोल साधण्याचा प्रयत्न केला.

राष्ट्रवादीच्या तिघींचे समिती सदस्यत्वाचे राजीनामे
महिला व बालकल्याण समिती सदस्य म्हणून राष्ट्रवादीकडून नीता घुले, ख्वाजाबी कुरेशी, इंदरकौर गंभीर यांच्या नावाचे समदखान यांनी पत्र दिले. मात्र ते गटनेते नसून संपत बारस्कर हे आमचे गटनेते असल्याचे सांगत या तिन्ही सदस्यांनी महिला बालकल्याण समिती सदस्यपदाचे राजीनामे दिले आहेत.

महिला बालकल्याण समिती महिला बालकल्याण समिती शिवसेना – सारिका भुतकर, सुनीता मुदगल, प्रतिभा भांगरे, छाया तिवारी, आशा बडे भाजप – मनीषा बारसकर, मालन ढोणे राष्ट्रवादी – ख्वाजाबी कुरेशी, नीता घुले, (राजीनामा) इंदरकौर गंभीर, कलावती शेळके, मंगला गुंदेचा मनसे – वीणा बोज्जा,   काँग्रेस – जागा रिक्त

स्थायी समिती
शिवसेना – संजय शेंडगे, अनिता राठोड, बाबासाहेब वाकळे
भाजप – उषा नलावडे, दत्ता कावरे
राष्ट्रवादी – समद खान
मनस े- सुवर्णा जाधव काँग्रेस – जागा रिक्त

समदखान पोलीस बंदोबस्तात
राष्ट्रवादीचे गटनेते समदखान फौजदारी प्रकरणात तुरुंगात आहेत. कोर्टाची परवानगी घेऊन ते महासभेसाठी महापालिकेत आले होते. समदखान यांच्या मागेपुढे पोलीस होते. सभा संपल्यानंतर पोलिसांनी त्यांना पुन्हा तुरुंगाकडे रवाना केले.

मनीषा बारस्कर यांचा नगरसेवकपदाचा राजीनामा
सेनेच्या नगरसेविका मनीषा बारस्कर यांना स्थायी समिती सदस्य होण्याची तीव्र इच्छा होती. मात्र पक्षाने गटनेते संजय शेंडगे, अनिता राठोड यांना सदस्याची संधी दिली. शिवाय सेनेच्या कोट्यातून भाजपचे बाबासाहेब वाकळे यांना संधी दिली. त्यामुळे मनीषा बारस्कर यांना संधी मिळाली नाही. पक्षीय कारभारावर नाराजी व्यक्त करत त्यांनी सभेतच महापौर कदम यांच्याकडे नगरसेवक पदाचा राजीनामा दिला. हा राजीनामा कार्यवाहीसाठी आयुक्तांकडे पाठविण्याची मागणी त्यांनी केली. 

LEAVE A REPLY

*