Type to search

Featured सार्वमत

शाळा भरली.. महापालिकेत

Share

आंबेडकर शाळेतील विद्यार्थी पालकांसह महासभेत

अहमदनगर (प्रतिनिधी) – रेल्वेस्टेशन भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक विद्यालयातील आठवी ते दहावीचे वर्ग यंदा महापालिकेने बंद केले आहे. या निर्णयामुळे संतप्त झालेल्या पालकांनी विद्यार्थ्यांसह बजेटच्या महासभेत शिरकाव करत गोंधळ घातला. आज मंगळवारी विद्यार्थ्यांची शाळा जणूकाही महापालिकेतच भरल्याचे चित्र होते.

2010 वर्षात महापालिकेच्या तत्कालीन शिक्षण मंडळाने रेल्वेस्टशनच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयातील वरच्या मजल्यावर 8 वी ते दहावीचे वर्ग सुरू केले. या शाळेत अनेक गरीबांची मुलं शिकली. तत्कालीन आयुक्त कलेक्टर राहुल द्विवेदी यांनी ही शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांचे समायोजन करण्यासाठी जिल्हा परिषदेला पत्रही दिले. पण आजही अनेक विद्यार्थ्यांचे समायोजन झालेले नाही. शिक्षक, पालकांनी नगरसेवक, आयुक्त, आमदार-खासदारांकडे जाऊन कैफियत मांडली. ही शाळा सुरू रहावी यासाठी पाठपुरावा केला, पण काहीच उपयोग झाला नाही.

त्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी विद्यार्थ्यांसह बजेटच्या महासभेत घुसखोरी केली. शेकडो विद्यार्थी अन् महिला,पालकांनी आवर घालणे सुरक्षा रक्षकांच्या हाताबाहेर गेले. त्यामुळे महासभेत ही मुलं, पालक थेट पीठासीन अधिकार्‍यांसमोर पोहचली. नगरसेवक अनिल शिंदे यांनी आयुक्तांनी त्यांच्याशी चर्चा करावी अशी मागणी केली. मात्र आंदोलकांनी बाहेर जावे. प्रातिनिधीक स्वरूपात पाच-सहा आंदोलकांनी चर्चा करावी असा मुद्दा मांडला. मात्र आयुक्तांनी चर्चेस नकार दिला. त्यानंतर महापौर बाबासाहेब वाकळे यांनी ‘कायद्याच्या चौकटीत राहून योग्य निर्णय घ्यावा आणि शाळा सुरू करावी, अशी सूचना प्रशासनाला केली. त्यानंतर आंदोलक बाहेर निघाले अन् बजेटची सभा सुरू झाली.

8 वी ते 10 वीचे वर्ग बंद केल्याने 107 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आयुष्य धोक्यात आले आहे. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रशासनाने तर गुणपत्रिकाही दिल्या नसल्याची माहिती यावेळी समोर आली. याचसोबत मानधनावर ज्ञानदान करणारे शाळेतील मुख्याध्यापक, चार शिक्षक, क्लार्क, लिपीक यांची नोकरीही धोक्यात आली.

‘शाळा बंद’चा निर्णय परस्पर कसा?
शाळा बंद करण्याचा निर्णय हा धोरणात्मक असल्याने तो महासभेत घेणे आवश्यक आहे. प्रशासनाने शाळा बंद करण्याचा निर्णय परस्पर कसा घेतला असा सवाल नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी केला. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनीही आंदोलन पालक-विद्यार्थ्यांच्या पाठीशी असल्याचे सभागृहात जाहीर केले.

भाजप-राष्ट्रवादीकडून शिवसेनेची कोंडी
महापौरांवर थेट वैयक्तिक पातळीवर जाऊन आरोप करणारे शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी माफी मागावी, अशी मागणी करत भाजप-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी शिवसेनेची कोंडी केली. शहराच्या प्रथम नागरीक असलेल्या महापौरांवर असे आरोप करणे चुकीचे असल्याचे स्पष्ट करत बोराटे यांच्या माफीनाम्यासाठी भाजप-राष्ट्रवादीचे नगरसेवक आग्रही राहिले. अगोदर महापौरांनी माफी मागावी, असे प्रत्युत्तर देत बाळासाहेब बोराटे यांनी माफीनाम्यास नकार दिला. हा गोंधळ सभागृहात सुरू होता. गोंधळ वाढल्यामुळे महापौर बाबासाहेब वाकळे यांनीच त्यात हस्तक्षेप करत विषय थांबविला. भाजप-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी शिवसेनेला पकडलेल्या कोंडीतून बाहेर काढण्याकरिता अखेर महापौरच धावून आले.

बजेटची सभा तहकूब

  • स्थायी समितीचे सभापती मुदस्सर शेख यांनी 780 कोटी 55 लाख रुपयांचे बजेट महापौरांकडे महासभेत सादर केले. बजेटच्या अभ्यासासाठी सभा तहकूब करावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली. या नगरसेवकांच्या मागणीचा मान राखत महापौर बाबासाहेब वाकळे यांनी बजेटची सभा तहकूब केली. उद्या (बुधवारी) दुपारी 1 वाजता तहकूब सभा पुढे सुरू होणार आहे.
  • सभेत दिल्लीगेट ते चौपाटी कारंजा रस्ता रुंदीकरणाचा विषय शिवसेना नगरसेवक गणेश कवडे यांनी उपस्थित केला. दिल्लीगेटपासून रुंदीकरणाला सुरुवात न करता रुंदीकरण कलेक्टर कार्यालयापासून सुरू करावे, अशी मागणी केली. दिल्लीगेटपासून हे रुंदीकरण करू दिले जाणार नाही. अशी भूमिका सभागृहात त्यांनी मांडली.
  • सभा तहकूब झाल्यानंतर आ. संग्राम जगताप महापालिकेत पोहोचले. शाळेच्या विषयावर त्यांनी आयुक्तांची भेट घेतली.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!