Type to search

Featured सार्वमत

महापालिकेचा अर्थसंकल्प मंजूर, मात्र तरतुदी गुलदस्त्यात

Share

नगरसेवक स्वेच्छा निधीत दोन लाखांनी वाढ चर्चेदरम्यान राजकीय कुरघोड्या

अहमदनगर (प्रतिनिधी) – सुमारे सात तास चर्चा झाल्यानंतर महापालिकेचा अर्थसंकल्प महासभेत मंजूर करण्यात आला. यामध्ये महापौर बाबासाहेब वाकळे यांनी विविध योजनांचा संकल्प केला असला, तरी अर्थसंकल्पातील तरतुदी समोर येण्यास बराच अवधी लागण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पीय सभेत गटारी, कुत्रे, खड्डे आदी चर्चेवर जवळपास पाच तास घालविण्यात आले.

विविध मुद्द्यांवर चर्चा करताना ‘आमच्या काळात आणि तुमच्या काळात’ असे सांगत शिवसेना आण राष्ट्रवादी एकमेकांवर राजकीय कुरघोड्या करण्याची संधी सोडत नव्हते. स्थायी समितीने मंगळवारी महासभेकडे 780 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यावर अभ्यासासाठी एक दिवस देऊन काल ही सभा तहकूब करण्यात आली. बुधवारी दुपारी एक वाजता ही सभा सुरू झाली. सभा सुरू होताच, अर्थसंकल्प वगळता इतर विषयंवरच चर्चा सुरू झाली. संध्याकाळी पाचनंतर अर्थसंकल्पावरील चर्चेला हात घालण्यात आला. यामध्ये सदस्यांनी संकलित कर वसुलीचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे प्रशासनावर ताशेरे ओढले. वसुलीसाठी संबंधितांना उद्दिष्ट ठरवून द्यावे व ते पूर्ण न झाल्यास संबंधितांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. महापौर बाबासाहेब वाकळे यांनीही त्यास सहमती दर्शविली. या विषयावर अनिल शिंदे, गणेश भोसले, शीला चव्हाण, संपत बारस्कर आदींनी सहभाग घेतला. 223 कोटी मागणी असताना केवळ 20 कोटी वसूल झाल्याचे समोर आल्याने सदस्य संतप्त झाले होते. अनेक मालमत्तांवर कर आकारणी होत नसल्याकडेही यावेळी बोट दाखविण्यात आले. वसुली विभागाचे अधिकारी, कर्मचारी परस्पर संबंधितांशी आर्थिक व्यवहार करत असल्याने त्यांना कर आकारणी केली जात नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

वृक्षरोप खरेदीसाठी स्वतंत्र तरतूद करतानाच वृक्ष अधिकारी यु. जी. म्हसे यांच्या कारभारावर सर्वच सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आतापर्यंत लावलेल्या झाडांची अवस्था काय आहे, याचे उत्तर म्हसे देऊ शकले नाहीत. तसेच म्हसे यांच्याकडे कारभार असलेल्या मोकाट कुत्रांच्या बंदोबस्ताबाबतही त्यांच्याकडून योग्य कार्यवाही न झाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यासाठी तसेच पिसाळलेल्या कुत्र्यांना मारण्यासाठी नव्याने स्वतंत्र संस्था नियुक्त करण्यात येणार असल्याचे आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी यावेळी सांगितले. माळीवाड्यातील कचरा रॅम्प हलविण्यावरून माजी महापौर सुरेखा कदम यांनी आक्रमक भूमिका घेतली. दोन महिन्यांची मुदत यासाठी त्यांना देण्यात आली.

तसे न झाल्यास तेथील शालेय विद्यार्थ्यांसह महापालिकेत आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. हा रॅम्प नालेगाव परिसरात हलविण्यात येणार आहे. मात्र त्यासही त्या भागातील शिवसेनेच्याच नगरसेवकांनी विरोध दर्शविला. स्थायी समितीने नगरसेवक स्वेच्छा निधी आणि वॉर्ड विकास निधी यासाठी प्रत्येक नगरसेवकांसाठी 12 लाखांची तरतूद केली होती. त्यात प्रत्येकी दोन लाखांची वाढ करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. सीना नदीचे सुशोभीकरण, राष्ट्रसंत आनंदऋषी महाराज समाधिस्थळ, विशाल गणेश मंदिर यासह शहरातील इतर धार्मिक आणि ऐतिहासिक वास्तूंच्या सुशोभीकरणासाठी स्वतंत्र निधी मिळविणे, नगरकरांना माफक दरात एमआरआय स्कॅन सुविधा देण्यासाठी नवीपेठ येथील महापालिकेच्या रुग्णालयात मशीन बसविणे, बाळासाहेब देशपांडे रुग्णालयासाठी त्याच इमारतीशेजारी नवीन इमारत बांधणे, गंजबाजार, गाडगीळ पटांगण, महालक्ष्मी उद्यान, सावेडी जॉगिंग ट्रॅक येथे महिलांसाठी स्वच्छतागृह बांधणे, शहरात महापौर चषक केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करणे, स्वतःची घरे नसलेल्या महापालिकेच्या वर्ग तीन व चार श्रेणीतील कर्मचार्‍यांसाठी घरकूल योजना राबविणे आदी मानस महापौर वाकळे यांनी व्यक्त केला.

मला अनुभव नाही…
विद्युत विभागाचा कार्यभार कनिष्ठ अभियंता कल्याण बल्लाळ यांच्याकडे आहे. शहरातील विद्युत विभागाच्या कारभारावरून सदस्यांनी संतप्त भावना व्यक्त करत बल्लाळ यांच्यावर प्रश्‍नांची सरबत्ती केली. यावेळी बल्लाळ यांनी ‘मला विद्युत विभागाचा अनुभव नाही. त्यासाठी दुसरा अधिकारी पाहा’ असे सांगत हात वर केले. यामुळे सदस्य संतप्त झाले.

शास्तीमाफी नाही
नगरकरांचा विशेषतः थकीत कर असलेल्यांचा जिव्हाळ्याचा विषय असलेल्या शास्तीमाफीला आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी स्पष्टपणे नकार दिला. शास्ती माफी करूनही त्याला योग्य तो प्रतिसाद मिळत नसल्याने आता जप्ती व इतर कठोर कारवाई करून वसुली वाढविण्यात येईल, असे सांगितले. मात्र सदस्यांनी शास्ती माफीसाठी आग्रह धरल्याने महापौर बाबासाहेब वाकळे यांनी सध्यातरी शास्ती माफी नाही, असे सांगत दिवाळीनंतर याबाबत विचार केला जाईल, असे सांगितल्याने सदस्य शांत झाले. 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!