Type to search

ब्लॉग सार्वमत

अहमदनगर महापालिका : विस्तव विझला, धग कायम!

Share

राजकीय, आर्थिक किंवा अन्य कोणतेही कारणाने नगरची महापालिका नेहमीच चर्चेत असते. डिसेंबरमध्ये महापालिकेच्या सार्वजनिक निवडणुका झाल्या आणि त्यानंतर सत्तेसाठी झालेल्या घडामोडींनी राज्यच नव्हे, तर देशभराचे लक्ष वेधून घेतले. भाजपवर आग ओकणारी राष्ट्रवादी आणि बहुजन समाज पक्षाने महापालिकेत मात्र विनाअट भाजपला पाठिंबा देत महापौर, उपमहापौर, महिला व बालकल्याण समिती सभापतिपद ही महत्त्वाची पदे भाजपला बहाल केली. ही निवडणूक भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढले. सर्वाधिक जागा जिंकूनही सर्वपक्षीयांनी शिवसेनेला बाजुला ठेवण्यासाठी आघाडी केली.

लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आणि शिवसेना-भाजप यांच्यातील प्रेमाला पुन्हा उमाळा आला. आता महापालिकेत हे दोन पक्ष पुन्हा एकत्र येणार, अशी चर्चा सुरू झाली. नगरमध्येच नव्हे, तर राज्यात महापालिका आणि जिल्हा परिषदेत या दोन पक्षांनी एकमेकांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी अनैतिक आघाड्या केल्या. त्यामुळे नगरचा निर्णय घेताना राज्यातील या अनैतिक आघाड्यांबाबतही चर्चा होऊ शकेल. मात्र नगरच्या महापालिकेत घडविण्यासाठी मोठी खटाटोप करावी लागणार आहे. दोन्ही पक्ष एकत्र आले असले तरी या पक्षांचे वरिष्ठ नेते एकत्र आले.

स्थानिकांमधील वाद अद्याप कायम आहेत. शिवसेनेला येथे सत्तेत सहभाग द्यायला आता पद शिल्लक राहिलेले नाही. सर्वात मोठा पक्ष म्हणून महापौरपद द्यायचे झाल्यास सध्याच्या महापौरांनी राजीनामा दिला पाहिजे. विशेष म्हणजे ते भाजपने सोडले पाहिजे. जरी सोडले तरी पुन्हा महापौर होणे म्हणजे पुन्हा एकदा घोडेबाजार आला. शिवाय आज भाजपबरोबर असलेला बसप उद्या शिवसेनेसोबत राहीलच, याची खात्री नाही. कारण भाजपसोबत असेल तर किमान पाच वर्षात तिनवेळा तरी स्थायी समिती मिळेल, असे बसपला वाटते.

शिवसेना, भाजप एकत्रित आल्यास ही संधी त्यांना मिळण्याची शक्यता कमी आहे. राष्ट्रवादीही पुन्हा एकदा जोरदार तयारी करू शकते. काँग्रेसचे पाच नगरसेवक असले तरी त्यातील दोघे विखे समर्थक आहेत. त्यामुळे त्यांनाही उघड भूमिका घ्यावी लागेल. सध्या तरी एकमेव रिक्त असलेले विरोधी पक्षनेतेपद नियमाप्रमाणे शिवसेनाला मिळणार असून, त्यात सत्ताधारी भाजपने काही उद्योग करू नयेत, एवढेच अपेक्षित आहे. कारण हे पद राष्ट्रवादीला द्यायचे घाटत आहे. तसे झाल्यास राज्यात एकत्र आलेली शिवसेना-भाजप नगरमध्ये मात्र एकमेकांच्या विरोधात ताव खावूनच असेल.

– सुहास देशपांडे
  9850784184

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!