Type to search

Featured सार्वमत

स्वीकृतचा विचार करताना विधानसभेची गणिते जुळविणार

Share

महापालिकेत स्वीकृत सदस्य निवडीसाठी हालचाली वाढल्या

अहमदनगर (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपली आणि महापालिकेतील राजकारण तापू लागले आहे. स्वीकृत नगरसेवक नियुक्तीची महत्त्वाची प्रक्रिया तातडीने मार्गी लागावी, यासाठी हालचाली वाढल्या असून, आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन या नियुक्त्या होण्याची शक्यता आहे. महापालिकेत शिवसेनेचे सर्वाधिक बळ असल्याने त्यांचे दोन, राष्ट्रवादीचेही दोन आणि भाजपचा एक सदस्य स्वीकृत म्हणून नियुक्त होणार आहे. यासाठी नाव सुचविण्याचे व ते अंतिम करण्याचे मोठे आव्हान राजकीय नेत्यांसमोर आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना सहा महिन्यांनी विधानसभा निवडणुकीला सामोरे जायचे आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांना नाराजी वाढू नये, याची जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. शिवसेनेकडून शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अक्षय कातोरे आणि हर्षवर्धन कोतकर यांची नावे चर्चेत आहेत.

यातील सातपुते, फुलसौंदर आणि कातोरे हे तिघेही महापालिका निवडणुकीत पराभूत झालेले आहेत. त्यांना पुन्हा संधी द्यायची का, असा प्रश्‍न नेतृत्त्वासमोर आहे. हर्षवर्धन कोतकर केडगाव परिसरातील असून, त्यांना महापालिका निवडणुकीत उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यावेळी त्यांना स्वीकृतचा शब्द दिल्याची चर्चा आहे. छिंदम प्रकरणापासून शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्यावर पद्मशाली समाजाची मोठी नाराजी आहे. ही नाराजी दूर करण्याचे मोठे आव्हान राठोड यांच्यासमोर आहे. कारण शहरात मोठे मतदान या समाजाचे आहे.

स्वीकृतच्या माध्यमातून ते ही नाराजी दूर करतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीमध्ये देखील हे पद मिळविण्यासाठी मोठी स्पर्धा आहे. मात्र ज्येष्ठ नेते आ. अरुण जगताप आणि आ. संग्राम जगताप जो निर्णय घेतील, तो कार्यकर्त्यांना पाळावा लागणार आहे. या पक्षातून शहर जिल्हाध्यक्ष पदावरून पायउतार झालेले प्रा. माणिक विधाते यांचे नाव पूर्वी आघाडीवर होते.

मात्र महापालिकेतील घडामोडीमुळे त्यांचे पद पक्षाने काढून घेतले. त्यांच्याबरोबर नगरसेवकांनाही निलंबित केले होते. मात्र नगरसेवकांवरील कारवाई मागे घेण्यात आली. त्यामुळे प्रा. विधाते यांच्यावरील रागही शांत झाला असेल, असे मानले जाते. आ. जगताप पितापुत्रांच्या अत्यंत जवळचे ते मानले जातात. तसेच महापालिका निवडणुकीत त्यांनी पक्षासाठी बरेच प्रयत्न केले. त्यामुळे त्यांना संधी मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरे नाव निवडताना विधानसभेची गणिते जुळविण्यात येतील, असे बोलले जाते. त्यामुळे सर्वाधिक मतदान असलेल्या समाजाला प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे.

कदाचित हे नाव पक्षाबाहेरील असल्याचेही बोलले जाते. भाजपमध्ये मोठी चुरस आहे. एकच स्वीकृत सदस्य जाणार असल्याने अनेकांनी फिल्डिंग लावलेली आहे. गांधी समर्थक आणि गांधी विरोधक असे या निवडीला स्वरूप येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा वाद मिटवून कोणाला संधी द्यायची, याचा निर्णय घेताना वाद पक्षश्रेष्ठींपर्यंत जाण्याची शक्यता आहे. भाजपमध्ये यासाठी शहर सरचिटणीस किशोर बोरा, पराभूत उमेदवार किशोर डागवाले हे गांधी समर्थक तर स्वतः अ‍ॅड. अभय आगरकर या गांधी विरोधी नेत्याचे नाव चर्चेत आहे.

विखे यांच्या भूमिकेकडे लक्ष
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत निवडून आलेले डॉ. सुजय विखे सध्या तरी पक्षांतर्गत राजकारणात पडणार की नाहीत, याबाबत स्पष्टता नाही. मात्र त्यांची साथ आपल्याला मिळेल, असे दिलीप गांधी विरोधकांना वाटते. त्यामुळेच त्यांनीही वरिष्ठांकडे शब्द टाकावा, असा प्रयत्न होत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!