Type to search

Featured सार्वमत

महापालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेवर वादाचे काळे ढग

Share

आज सभा : महापौर, अभियंता विरूद्ध शिवसेना संघर्ष होण्याची शक्यता

अहमदनगर (प्रतिनिधी) – महापालिकेच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यासाठी आज मंगळवारी (दि. 25) होणारी सभा अर्थसंकल्पापेक्षा अभियंते आणि शिवसेना यांच्यातील संघर्षानेच जास्त गाजण्याची शक्यता आहे. महापौर बाबासाहेब वाकळे आणि शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्यात स्तर घसरून झालेल्या आरोप-प्रत्यारोपाचेही सावट या सभेवर राहणार आहे.  महापालिकेचा अर्थसंकल्प प्रशासनाने स्थायी समितीसमोर सादर केलेला आहे. स्थायी समितीनेही त्यात एका दिवसात काही नव्याने तरतुदी करून महासभेकडे पाठविण्यात आला. मात्र त्यानंतर लगेच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने अर्थसंकल्प तसाच राहिलेला होता. आचारसंहिता संपून जवळपास महिना होत आला तरीही अर्थसंकल्पीय सभा काढण्यासाठी महापालिकेला मुहूर्त लागत नव्हता. अखेर ही सभा मंगळवारी होत आहे. अर्थसंकल्पाची ही सभा विषेश असल्याने त्यात इतर कोणत्याही विषयांवर चर्चा होऊ शकत नसली, तरी विषयपत्रिका सोडून चर्चा घडवत सभा भरकटवण्याची परंपरा येथील महापालिकेला आहे. मंगळवारी होणार्‍या अर्थसंकल्पीय सभेतही तीच परंपरा कायम राहण्याची शक्यता आहे.

महापालिकेत शिवसेनेला बाजूला ठेऊन भाजप आणि राष्ट्रवादीने एकत्र येत मोट बांधली. त्यामुळे सर्वाधिक नगरसेवक असतानाही शिवसेनेला सत्तेपासून दूर रहावे लागले. शिवसेनेत ही मोठी सल आहे. शिवाय लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप एकत्र आले असले, तरी महापालिकेत या प्रक्रियेला अद्याप सुरूवात झाली नाही. एकूण या दोन पक्षातील वातावरण पाहता हे एकत्रिकरण होईल की नाही, याबाबतही साशंकता आहे. खा. डॉ. सुजय विखे यांनी महापालिकेत शिवसेना-भाजप एकत्र येणार असल्याचे संकेत दिले असले, तरी भाजपच्या अनेक नगरसेवकांची ती मानसिकता नाही. त्यामुळे युतीतील या दोन पक्षातील नगरमधील दुरावा अद्याप कायम आहे. त्यात महापौर वाकळे आणि शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्यात पातळी सोडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप झाल्याचे प्रकरण ताजेच आहे. बोराटे यांनी महापौरांना प्रत्युत्तर देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे प्रमुख नेते व नगरसेवक उपस्थित होते. त्यामुळे बोराटे यांना शिवसेनेचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे उद्याच्या सभेत या घटनेचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

बूट फेक प्रकरणानंतर महापालिकेतील अभियंते आणि शिवसेना यांच्यात संघर्ष उडालेला आहे. या प्रकरणाच्या फिर्यादीत आरोपींच्या यादीत शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांचे नाव आल्याने शिवसेना संतप्त आहे. या प्रकरणाला राजकीय वास असल्याचा आणि त्यास भाजपच्या महापालिकेतील सत्ताधार्‍यांकडूनही अप्रत्यक्ष पाठिंबा मिळाल्याचा शिवसेनेला संशय आहे. अभियंत्यांना अडचणीत आणण्याची एकही संधी शिवसेना सोडत नाही. उद्याच्या सभेत देखील विविध कारणांवरून अभियंत्यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे अर्थसंकल्पापेक्षा वादाची किनार जास्त असलेल्या या सभेकडे शहराचे लक्ष लागले आहे.

वारेमाप खर्चाच्या तरतुदींकडे लक्ष
महापालिकेत सत्ता कोणाहीची असो, दरवर्षी महापौर, उपमहापौर, सभापती यांच्या नावाने विकास निधीच्या शिर्षाखाली कोट्यवधी रूपयांची तरतूद केली जाते. एवढा पैसा महापालिकेकडे नसतो. निधीतील कामे ठेकेदाराकडून करून घेतली जातात, मात्र पैसे नसल्याने त्यांची देयके निघत नाहीत. मात्र या देयकांचा ताण महापालिकेवर वाढतो. त्यामुळे आर्थिक शिस्त येईपर्यंत या तरतुदी करू नयेत, असे प्रशासनाचे मत आहे. मात्र स्थायी समितीने या तरतुदींची शिफारस केली आहे. महासभा काय करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!