मालुंजेत तलाठ्यावर वाळूतस्करांचा हल्ला

0
राहुरी (प्रतिनिधी) – रात्रीच्या वेळी प्रवरा नदीपात्रातून वाळू उपशाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या राहुरी तालुक्यातील खुडसरगाव येथील तलाठी सुर्यभान वायखिंडे यांना तीन जणांनी त्यांची दुचाकी अडवून त्यांना जबर मारहाण केली. यात वायखिंडे हे जखमी होऊन बेशुद्ध पडले. त्यांना मारहाण करून तीन वाळूतस्करांनी रात्रीच्या अंधारात धूम ठोकली.
काल रविवारी (दि. 21) राहुरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी तीन जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना झाले आहे. ही घटना शनिवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास राहुरी तालुक्यातील मालुंजा खुर्द येथील प्रवरा नदीपात्रात घडली.
वायखिंडे हे मालुंजे खुर्द शिवारातील प्रवरा नदीपात्रात वाळू तस्करीची माहिती मिळताच तेथे दाखल झाले. त्यांच्यासमवेत तलाठी सुर्यवंशी व कोतवाल गायकवाड होते. ते नदीपात्रात दाखल झाले असता तेथे बेकायदेशीररित्या वाळू उपसा करीत असलेला ढंपर दुसर्‍या मार्गाने पसार झाला. त्यानंतर वायखिंडे हे घरी परतत असताना त्यांच्या दुचाकीला बच्चू उर्फ विश्‍वजित दिवाकर बडाख, राहुल अनिल पवार, एक अनोळखी (सर्व रा. मालुंजे बु., ता. श्रीरामपूर) या तिघांनी पाठीमागून येऊन दुचाकी आडवी लावून मारहाण केली. यात वायखिंडे यांच्या डाव्या डोळ्याला जखम झाली. या मारहाणीत ते बेशुद्ध पडलेले पाहताच हल्लेखोरांनी धूम ठोकली.
दरम्यान, शुद्धीवर आल्यानंतर वायखिंडे यांनी तहसीलदार अनिल दौंडे यांना घटनेची खबर देऊन राहुरी पोलीस ठाण्यात गुरनं. 178/2017 नुसार भादंवि. कलम 353 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण भोसले हे तपास करीत आहेत.

 

LEAVE A REPLY

*