स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मालेगावला शंभर खाटांचे महिला रूग्णालयास मान्यता

0

मालेगाव । दि. 15 प्रतिनिधी
विशेष बाब म्हणून ग्रामीण रूग्णालयात महिला व मुलांसाठी शंभर खाटांचे स्वतंत्र रूग्णालयास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी मान्यता देत स्वातंत्र्यदिनाच्या पुर्वसंध्येस शहर व तालुक्यातील महिलांना अनमोल भेट दिली असल्याची माहिती ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी दिली.

मालेगाव येथे दोनशे खाटांचे सामान्य रूग्णालय सध्या कार्यान्वित आहे. शहर-तालुक्यासह पंचक्रोशीतून मोठ्या प्रमाणात रूग्ण येथे येत असतात. महिला रूग्णांची संख्या अधिक असल्याने आरोग्य सुविधा त्वरेने उपलब्ध होण्यासाठी महिलांसाठी स्वतंत्र रूग्णालयाची आवश्यकता होती.

ग्रामीण रूग्णालयात सदर रूग्णालय कार्यान्वित करावे यासाठी शासनस्तरावर आपला पाठपुरावा सुरू होता, असे स्पष्ट करत ना. भुसे पुढे म्हणाले गत अनेक वर्षापासून याप्रश्नी तत्कालीन आरोग्यमंत्री तसेच लक्षवेधी व तारांकित प्रश्नाव्दारे आपण शासनाचे लक्ष वेधले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत साकडे घातले होते तर आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या समवेत 14 जानेवारी 2015 व 9 मे 2017 रोजी महिला रूग्णालयासंदर्भात स्वतंत्र बैठका देखील घेण्यात येवून या रूग्णालयास तातडीने मंजुरी मिळावी यास्तव प्रयत्न केले गेले होते.

राज्य शासनाने या मागणीची गंभीरतेने दखल घेत शंभर खाटांचे महिला व मुलांचे रूग्णालय स्थापन करण्यास मान्यता दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी तातडीने घेतलेल्या या निर्णयाबद्दल आपण त्यांचे विशेष आभार मानले असल्याचे स्पष्ट करत ना. भुसे पुढे म्हणाले, बंद अवस्थेत असलेल्या ग्रामीण रूग्णालयाच्या ठिकाणी सदर शंभर खाटांचे रूग्णालय स्थापन करण्यात येणार असून या रूग्णालयाची दुरूस्ती करण्यात येवून ते कार्यान्वित केले जाईल. तसेच आवश्यक ती पदे निर्मिती व निधी शासनाकडून स्वतंत्रपणे उपलब्ध होणार असल्याचे ना. भुसे यांनी सांगितले.

ग्रामीण रूग्णालयाची दुरूस्तीसह ते अत्याधुनिक साधन सुविधांनी सुसज्ज करण्यासाठी किमान दोन ते अडीच कोटींच्या निधीची आवश्यकता राहणार आहे. हा निधी लवकरात लवकर मिळावा यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे ना. भुसे यांनी सांगितले.

ग्रामीण रूग्णालयात शंभर खाटांचे महिला व मुलांसाठी स्वतंत्र रूग्णालय राज्य शासनाने मंजूर केल्याबद्दल शिवसेनेच्या महिला पदाधिकार्‍यांनी एकच जल्लोष करीत ना. भुसे यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

*