मालेगावात सराईत मोबाईल चोर गजाआड; ५४ मोबाईल हस्तगत

0

नाशिक | मालेगावात अनेक दिवसांपासून मोबाईल दुकान फोडून मोबाईल लंपास केल्याच्या घटना घडल्या होत्या. गुन्ह्याचा तपास नाशिक ग्रामीण पोलीस करत होती. काल (दि.१५) मालेगाव शहरातील खड्डाजिन परिसरात गस्त घातल असतांना  गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत दोघांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून जवळपास ५४ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे.

अधिक माहिती अशी की, गेल्या आठवड्यात नयापुरा येथील रहिवासी शेख फैजान निसार अहमद यांचे भंगार बाजार परिसरातील जावेद टुल्स मोबाईल शॉप फोडुन मोबाईल लंपास केल्याची घटना घडली होती. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात मालेगाव शहर पोलीस ठाण्यात 43/2018 भादवि कलम 454, 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानुसार मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मोहमद मेहमुद अब्दुल रषिद अन्सारी, (वय 19, राकमालपुरा,
मालेगाव) यास शिताफीने ताब्यात घेतले. त्यानंतर त्यास पोलिसी खाक्या दाखवताच त्याने सॅमसंग, एम.आय, लिनोव्हो, ब्लॅकबेरी, कार्बन, मायक्रोमॅक्स, इंटेक्स अशा विविधकंपन्यांचे एकुण 54 मोबाईल हॅण्डसेट हस्तगत करण्यात आले आहेत. त्याचा भाऊ मुस्तफा अब्दुल रषिद अन्सारी उर्फ मुस्तफा चोरवा, राकमालपुरा याच्या शोधात पोलीस असून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

वाढलेल्या चोरीच्या घटनांमुळे ग्रामीण पोलिसांनी चोरट्यांचा मागोवा घेत शिताफीने तपासकार्य सुरु केले होते. नाशिक ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्षक  संजय दराडे, अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक  करपे यांच्या पथकाने कारवाई केली.

LEAVE A REPLY

*