मालेगाव : विवाहानंतर खंडणी न दिल्याने जातपंचायतीकडून कुटुंब बहिष्कृत

पोलिसांत 30 जणांविरोधात गुन्हा

0

नाशिक । दि. 22 प्रतिनिधी

स्वत:च्याच डवरी गोसावी समाजातील मुलाशी लग्न करूनही बेकायदेशीरपणे सामाजिक बहिष्कार टाकल्याने मालेगाव येथील विवाहितेने जातपंचायतीविरोधात एल्गार पुकारला आहे.

वारंवार शारीरिक व मानसिक छळ करून जिवे ठार मारण्याची धमकी जातपंचायतीने दिल्याने या विवाहितेने जातपंचायतीतील तब्बल 30 जणांविरोधात मालेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

बडोदा गुजरात येथील हेमा सागर शिंदे हिच्या घरच्या मंडळींनी तिच्या मनाविरुद्ध लग्न लावून देण्याचा प्रयत्न केला. तिने मालेगावी असलेल्या आपल्या पसंतीच्या सागर शिंदे याच्या सोबत विवाह केला.

ही गोष्ट तिच्या घरच्यांना समजल्याने त्यांनी मालेगाव येथे येऊन हेमाला तसेच तिच्या सासरच्यांना धमकावले. तिला जिवे मारण्याची धमकीही दिली.

इतक्यावरच ही मंडळी थांबली नाही तर त्यांनी दौंड (जिल्हा पुणे) येथे जात तेथील जातपंचायतीसमोर मुलीने मनाविरुद्ध विवाह केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.

त्यानुसार जातपंचायतीने फतवा काढत मुलगी हेमासह तिच्या सासरच्यांना समाजातून बहिष्कृत केले. तसेच त्यांना वारंवार धमकावण्याचा प्रयत्न केला. याशिवाय खंडणी मागत जोवर खंडणीची रक्कम देत नाही तोवर बहिष्कार कायम ठेवणार असे सांगितल्याने शेवटी विवाहितेने आपल्या घरचे गंगाराम सिद्धू शेगर, बाबाजी शेगर, नारायण शेगर, सुभाष शेगर, सागर शेगर, सुरेश शेगर, नीलेश शेगर तसेच स्वयंघोषित पंचमंडळी  भीमराव शिंदे, भीमराव पीराजी चव्हाण, बाबूराव चव्हाण, शंकर बाबर, शिवाजी बाबर, बाबाजी बाबर, बबन शेगर, रामा सावळा शिंदे, सुभाष शेगर, मोहन सावंत, दयानंद बाबर, भाऊराव शिंदे, बाबूराव शिंदे, शिवाजी शिंदे, दादा चव्हाण, अर्जुन धर्मा शिंदे, नाथ चव्हाण, दत्ता शिंदे, नाथा बाबर, चिमाजी शेगर, साहेबा शिंदे, सुदाम शिंदे, प्रकाश सावंत, भगवान चव्हाण अशा  सर्वांविरोधात वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

या तक्रारीबरोबर दिलेल्या निवेदनात विवाहितेने म्हटले आहे, मला माझा जोडीदार निवडण्याचा अधिकार नाही का? स्वत:च्याच जातीतील मुलाशी विवाह केला हा गुन्हा आहे का?

नाथपंथीय डवरी गोसावी समाजातील स्वयंघोषित पंचमंडळींनी स्त्रियांच्या हक्कांची पायमल्ली केली आहे. स्वयंघोषित पंचमंडळी अन्याय अत्याचार करून खंडणीची मागणी करीत आहेत.

बहिष्कारामुळे आमचे जगणे मुश्किल झाले आहे. दरम्यान, जातपंचायतीचा विळखा अद्यापही कायम असून या प्रकरणामुळे पुन्हा जातपंचायतीचा मुद्दा चर्चेत आला आहे.

LEAVE A REPLY

*