मालेगाव महानगरपालिका त्रिशंकू

कॉंग्रेस सर्वात मोठा पक्ष; रा.कॉं.-जनता दल युतीला २६ जागा

0
मालेगाव | दि. २६ हेमंत शुक्ला- सामाजिक व राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणार्‍या मालेगाव महापालिकेच्या तिसर्‍या निवडणूकीत मतदाराने ‘राजा’ची भूमिका वठवत राजकीय अस्थिरतेला कायम ठेवले. या निवडणूकीत सत्ताधारी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस-जनता दल आघाडीला अनुक्रमे २८ व २६ जागा मिळाल्या.
शिवसेनेचे संख्याबळ दोनने वोढून ती १३ वर पोहचली तर गतवेळी कोरी पाटी असलेल्या भाजपला नऊ जागांचे बळ प्राप्त झाले. एमआयएमने सहा जागी विजय मिळवला, तर यावेळी केवळ एक अपक्षाला महापालिकेत जाण्याची संहधी मालेगावकरांनी दिली.
दरम्यान, ४३ चा जादुई आकडा गाठण्यात सर्वच राजकीय पक्षांना अपयश आल्याने सत्ता स्थापन्यासाठी कोण कोणासोबत जाते, याबाबत संपूर्ण राज्यभर औत्सुक्य निर्माण झाले आहे. महानगरपालिका निवडणूकीतील राजकीय प्रभुत्वासाठी सर्वच नेत्यांतर्फे शक्ती पणास लावण्यास आली असली तरी जनतेने मात्र संमिश्र कौल देत निर्णायक बहुमतापासून सर्वच पक्षांना वंचित ठेवले.

माजी आमदार रशीद शेख, माजी महापौर युनुस ईसा, राज्यमंत्री दादाजी भुसे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष अद्वय हिरे, भाजपचे नेते सुनील गायकवाड, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते राजेंद्र भोसले यांनी सक्रीय सहभाग नोंदवत आपापल्या पक्षासाठी मोर्चेबांधणी केली होती.

मात्र, कोणासही सत्ताप्राप्तीचा जादुई आकडा जुळवता न आल्याने कॉंग्रेस व राष्ट्रवादी-जनता दल आघाडीस शिवसेना, भाजप व एमआयएमच्या समर्थनार्थावर अवलंबून रहावे लागणार आहे. शिवाय, मुस्लिमबहुल पूर्व भागात २९ उमेदवार देणार्‍या भाजपचा भ्रमाचा भोपळा फुटला. त्यांना केवळ पश्‍चिमेत नऊ जागांवर समाधान मानावे लागले.
निवडणूकीत नव्या चेहर्‍यांना पसंती देत जनतेने राष्ट्रवादीचे विद्यमान महापौर हाजी मो. इब्राहीम, एमआयएम महानगरप्रमुख माजी महापौर अब्दुल मालिक, माजी उपमहापौर नरेंद्र सोनवणे, गुलाब पगारे, कॉंग्रेस नेते खालीद हाजी, इरफान अली, प्रा. रिजवान खान, शिवसेनेचे जयराज बच्छाव, भारत रायते, तालुकाप्रमुख ऍड. संजय दुसाने या दिग्गज नेत्यांना नाकारले. तसेच पक्षांतरीत, बंडखोर व अपक्ष उमेदवारांना देखील साफ नाकारल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे.
महानगरपालिकेच्या ८४ जागांसाठी गेल्या बुधवारी अभुतपुर्व उत्साहात मतदान झाले. तीव्र तापमानामुळे ६० टक्केच मतदान होवू शकले होते. पक्षीय बंडखोर व अपक्षांमुळे सर्वच राजकीय नेत्यांतर्फे व्यक्त केलेली मतविभागणीची भिती खरी ठरल्याचे निकालावरून दिसून आले. अपक्ष व बंडखोर निवडून आलेले नसले तरी त्यांनी अपेक्षेपेक्षा जास्त मते घेतल्याने शिवसेना, भाजपसह कॉंग्रेस, राष्ट्रवादीस याचा फटका बसला.
आज सकाळी १० वाजता शहरातील सात ठिकाणी अभुतपुर्व कडेकोट बंदोबस्तात मतमोजणीस प्रारंभ झाला. टपाली मतांची मोजणी पुर्ण झाल्यानंतर ईव्हीएम मशिन उघडले गेले. ११ वाजेपासून एकेक प्रभागातील निकाल जाहिर होण्यास प्रारंभ झाल्याने कॉंग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, सेना व एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोषास प्रारंभ केला.

गुलालाची उधळण व फटाक्याच्या आतषबाजीने मतमोजणी केंद्राबाहेरील परिसरासह शहर या जल्लोषाने दणाणून गेले होते. मात्र दोन वाजेनंतर नेत्यांचे आप्तस्वकिय व पक्षाचे बिनीचे शिलेदार पराभूत झाल्याचे स्पष्ट होताच या कार्यकर्त्यांचा उत्साह मावळला जावून निराशेचे सावट पसरले. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, कॉंग्रेस व एमआयएम या पक्षांची ङ्गगड आला पण सिंह गेलाफअशी अवस्था झाल्याने नेत्यांना जबर हादरा बसला आहे.
या निवडणुकीत शिवसेनेचे ऍड. ज्योती भोसले, सौ. कविता बच्छाव, जिजाबाई पवार, प्रतिभा पवार, नारायण शिंदे, सखाराम घोडके, सौ. पुष्पा गंगावणे, राजाराम जाधव, निलेश आहेर, जिजाबाई बच्छाव, आशा अहिरे, जयप्रकाश पाटील, सौ. कल्पना विनोद वाघ हे १३ उमेदवार निवडून आले. तर भाजपतर्फे सुनिल गायकवाड, मदन गायकवाड, संजय काळे, विजय देवरे, छाया शिंदे, तुळसाबाई साबणे, भरत बागुल, सौ. सुवर्णा राजेंद्र शेलार, दीपाली वारूळे हे ९ उमेदवार निवडून आले.
कॉंग्रेसतर्फे माजी आ. शेख रशीद, माजी महापौर ताहेरा शेख यांच्यासह विठ्ठल बर्वे, हमीदाबी शेख जब्बार, मंगलाबाई धर्मा भामरे, रजिया बेगम मजीद, नंदकुमार सावंत, अब्दुल अजीज, नजीर अहमद ईरशाद, जैबुन्निसा नुरूल्ला, कमरून्निसा रिजवान, फकिर मोहंमद शेख, शबाना शेख सलीम, रजियाबी इस्माईल, निहाल अहमद मो. सुलेमान, सलीम अन्वर, जफर अहमद अहमदुल्ला, नुरजहॉ मो. मुस्तफा, सलीमाबी सैय्यद सलीम, फारूक खान फैजुल्लाह, हमीदाबी साहेब अली, इस्त्राईल खान इस्माईल, मो. असलम अन्सारी, रेहानाबानो ताजुद्दीन, किशवारी कुरेशी (बिनविरोध), नईम इब्राहीम पटेल, मो. सुलतान मो. हारूण, रशिदाबी अ. मन्नान हे २८ उमेदवार विजयी झाले आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे स्थायी समिती सभापती एजाज बेग त्यांच्या पत्नी यास्मीन बेग, जाकियाबानो नजरूद्दीन, सायराबानो मोमीन, शेख जाहीद, शेख कलीम शेख दिलावर, असफा मो. अन्सारी, साजेदा अन्सारी, जैबुन्निसा समसुद्दोहा, अफसरून्निसा मोहंमद, नाबी अहमद अहमदुल्ला, अमानतुल्ला अन्सारी, सबिया मो. अन्सारी, मोहंमद सुभान, अतीक अहमद कमाल अहमद, नसरीन अल्ताफ शेख, अय्याज अन्सारी, शफिक अन्सारी, अखतरून्निसा अन्सारी, मो. साजीद अन्सारी हे २० उमेदवार निवडून आले आहेत.
जनता दलातर्फे शहराध्यक्ष बुलंद एकबाल निहाल अहमद, त्यांच्या भगिणी शाने हिंद यांच्यासह तनवीर मो. अन्सारी, शबानाबानो सैय्यद, साजेदाबानो अन्सारी, अब्दुल बाकी हे सहा उमेदवार निवडून आले. एमआयएमतर्फे उपमहापौर हाजी मो. युनूस ईसा त्यांचे पूत्र डॉ. खालीद परवेज, माजीद युनूस ईसा, सादिया लईक हाजी, शेख कुलसूम, मोमीन रजिया शाहीद, रहिमाबानो मो. इस्माईल हे सात उमेदवार निवडून आले.
अपक्ष उमेदवारी करीत असलेले मन्सुर अहमद शब्बीर अहमद हे प्रभाग ३ अ मधून विजयी झाले आहेत.
निवडणूक निर्णय अधिकारी प्रांत अजय मोरे, उपजिल्हाधिकारी जितेंद्र काकुस्ते, रामसिंग सुलाने, प्रांत शरद पवार, प्रकाश थविल, शशिकांत मंगरूळे, प्रांत भिमराज दराडे यांनी निकाल जाहिर करत विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र दिले. मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी रविंद्र जगताप, निरीक्षक मोपलवार, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आदी अधिकारी जातीने मतमोजणी प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते.
निकाल जाहिर होताच उमेदवार समर्थकांतर्फे मोठा जल्लोष केला जात होता. मिरवणुकीस परवानगी नसल्याने अनेक विजयी उमेदवार समर्थकांसह पायीच फटाक्यांची आतषबाजी व गुलाल उधळत आपल्या प्रभागाकडे जात होते. अप्पर पोलीस अधिक्षक राकेश ओला, उपअधिक्षक अजित हगवणे, गजानन राजमाने, अशोक नखाते आदी अधिकारी जातीने मतमोजणी व या जल्लोषावर लक्ष ठेवून होते. निकालानंतर अनुचित प्रकार घडू नये यास्तव सर्वत्र सशस्त्र पोलिसांचा खडा पहारा तैनात करण्यात आल्याने शहराला जणू लष्करी छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.

LEAVE A REPLY

*