मालेगाव महापौरपदी कॉंग्रेसचे शेख रशीद

0
मालेगाव | दि. १४ प्रतिनिधी- संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या मालेगाव महानगरपालिकेच्या महापौरपदी कॉंग्रेसचे माजी आ. शेख रशीद तर उपमहापौरपदी शिवसेनेचे सखाराम घोडके यांनी मताधिक्य घेत विजय संपादन केला. शेख रशीद यांनी ४१ मते घेत राष्ट्रवादी-जनता दल आघाडीचे नबी अहमद यांचा ७ मतांनी पराभव केला. तर उपमहापौर घोडके यांनी आघाडीचे मन्सुर अहमद यांचा १४ मतांनी पराभव करीत दणदणीत यश संपादन केले.

महापौर-उपमहापौर निवडणुकीत एमआयएमने सहभाग न नोंदविता तटस्थ राहण्याची भुमिका बजावली. मात्र महापौरपदासाठी मतदान करणार्‍या भाजपा नगरसेवक उपमहापौरपदाच्या निवडणुकीत मात्र सेनेचा उमेदवार असल्याने तटस्थ राहिले. मात्र भाजपचे दोन सदस्य सभागृहात गैरहजर राहिल्याने तो चर्चेचा विषय बनला होता.

महापौरपदी कॉंग्रेसचे माजी आ. शेख रशीद यांची तर सेनेचेसखाराम घोडके हे उपमहापौरपदी दणदणीत मतांनी निवडून आल्याचे वृत्त सभागृहाबाहेर येताच कॉंग्रेस कार्यकर्ते व शिवसैनिकांनी फटाक्यांची प्रचंड आतषबाजी करत एकच जल्लोष साजरा केला. मनपा निर्मितीनंतर प्रथमच शिवसेना सदस्याची उपमहापौरपदी वर्णी लागल्याने शिवसैनिकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता.

आज सकाळी ११ वाजता मनपा सभागृहात जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या अध्यक्षतेखाली महापौर-उपमहापौर पदाची निवडणूक घेण्यात आली. माजी महापौर ताहेरा शेख व बुलंद एकबाल यांनी माघार घेतल्याने महापौरपदासाठी कॉंग्रेसचे शेख रशीद व आघाडीचे नबी अहमद यांच्यात सरळ लढत झाली. शेख रशीद यांना ४१ तर नबी अहमद यांना ३४ मते मिळाली.

७ मते अधिक असल्याने शेख रशीद महापौरपदी निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी-जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी जाहिर केले. यानंतर उपमहापौरपदाची निवडणूक संपन्न झाली. भाजपचे सुनिल गायकवाड यांनी माघार घेतल्याने सेनेचे सखाराम घोडके व आघाडीचे मन्सुर अन्सारी यांच्यात सरळ लढत झाली. घोडके यांना ४१ तर अन्सारी यांना २७ मते मिळाली. १४ मते अधिक असल्याने घोडके यांना विजयी घोषीत करण्यात आले.

नवनिर्वाचित महापौर शेख रशीद व उपमहापौर सखाराम घोडके यांचा जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., मनपा आयुक्त संगीता धायगुडे, नगरसचिव राजेश धसे, सहाय्यक आयुक्त विलास गोसावी आदींसह मनपा अधिकारी व नगरसेवकांनी सत्कार करीत अभिनंदन केले. यानंतर महापौर शेख रशीद यांची कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी तर उपमहापौर घोडके यांची शिवसैनिकांनी उघड्या जीपवर भव्य मिरवणूक काढत विजयाचा एकच जल्लोष केला. अप्पर पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार, उपअधिक्षक अजित हगवणे यांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

 

LEAVE A REPLY

*