.. आणि काँग्रेसच्या तिरंग्यासोबत डौलाने फडकला सेनेचा भगवा

0

मालेगाव (प्रतिनिधी) ता. १४ : मालेगाव महापालिकेवर आज काँग्रेचा तिरंगा आणि सेनेचा भगवा ध्वज एकत्र डौलाने फडकताना दिसत होते. निमित्त होते महापौर-उपमहापौर निवडणूकीचे.

या निवडणूकीत त्रिशंकू स्थिती असल्याने शिवसेना आणि काँग्रेस असा अपारंपरिक फॉम्युर्ला रचण्यात आला. त्यामुळे महापौरपदी काँग्रेसचे रशिद शेख, तर उपमहापौरपदी शिवसेनेचे सखाराम घोडके विजयी झाले.

विशेष म्हणजे माजी आमदार महापौरपदी विराजमान होण्याची दिवंगत निहाल अहमद यांची परंपरा शेख रशिद यांनी या निमित्ताने सुरू ठेवली.

नुकत्याच झालेल्या निवडणूकीत काँग्रेस 28, राष्ट्रवादी 20, शिवसेना 13, भाजप 9, एमआयएम 7, जनता दल 6 व अपक्ष 1 असे 84 सदस्य विजयी झाले होते. सर्वाधिक जागा संपादन करणार्‍या काँग्रेसतर्फे सत्ता हस्तगत करण्यासाठी व्युहरचना आखण्यात आली होती.

महापौरपदाचे उमेदवार माजी आ. शेख रशीद व आ. आसिफ शेख यांनी सेनेचे ग्रामविकासमंत्री दादाजी भुसे यांच्या समवेत दोन बैठका घेत सहकार्याचे साकडे घातले होते. तटस्थ राहण्याची भुमिका घेतलेल्या एमआयएमने आपले तुळशीपत्र काँग्रेसच्या पारड्यात टाकल्यामुळे सेनेतर्फे काँग्रेसला समर्थन देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता.

त्यानंतर महापौरपदी शेख रशीद तर उपमहापौरपदी सेनेचे सखाराम घोडके यांचे नाव निश्चित केले गेले. राष्ट्रवादी आघाडीतर्फे सेनेचे समर्थन मिळविण्याचा माजी आ. मौलाना मुफ्ती यांनी कसोशीने प्रयत्न केला. मात्र एमआयएमच्या ताठर भुमिकेमुळे आघाडीचे हे प्रयत्न अयशस्वी ठरले. त्यामुळे काँग्रेसचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला होता.

काँग्रेसतर्फे ताहेरा शेख तर आघाडीतर्फे बुलंद एकबाल, सेनेकडून निलेश आहेर व एमआयएमचे डॉ. खालीद परवेज या गटनेत्यांतर्फे नगरसेवकांना व्हीप बजावण्यात आले होते. गटनेत्यांतर्फे आदेशात नमूद करण्यात आलेल्या उमेदवारांनाच मतदान करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या आदेशाचे उल्लंघन करणार्‍या नगरसेवकाचे सदस्यत्व रद्द करण्याची कारवाई केली जाईल, असा इशारा या व्हीपमध्ये बजावण्यात आला होता.

दरम्यान, आघाडीतर्फे सत्तेसाठी प्रयत्न सुरूच असल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसतर्फे सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून अनेक नगरसेवकांना सुरक्षित पर्यटनस्थळी हलविण्यात आले होते.

काल रात्रीतून पर्यटनास गेलेले हे सर्व सदस्य शहराजवळ डेरेदाखल झाले. त्यांना कार्यकर्त्यांच्या विशेष संरक्षणात या सदस्यांना सभागृहात आणले गेले.

LEAVE A REPLY

*