१९ लाखांचे स्पिरिटे जप्त; दोघांना अटक

0
मालेगाव | दि. १९ प्रतिनिधी- सांगली जिल्ह्यातील मानगंगा साखर कारखान्यातील स्पिरिटेची विनापरवाना अवैध वाहतूक करणारा ट्रक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने साक्री-नाशिक रोडवर ताहाराबाद येथे पकडून १९ लाख रुपये किंमतीचे ८ हजार लिटर स्पिरिटे ट्रकसह जप्त केले आहे. याप्रकरणी साखर कारखान्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येवून दोघांना अटक करण्यात आली आहे.

या कारवाईची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकातील दुय्यम निरीक्षक दिगंबर शेवाळे यांनी दिली. मद्यनिर्मितीसाठी आवश्यक स्पिरिटची ट्रकमधून विनापरवाना वाहतूक केली जात असल्याची माहिती भरारी पथकास मिळाली होती.

आयुक्त डॉ. अश्‍विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक दिगंबर शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली नारायण गुंजाळ, धनंजय भदरगे, रवींद्र झाडे, जितेंद्र गोगावले, शेलार यांनी नाशिक-साक्री मार्गावर सापळा लावला होता. आज मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास ताहाराबाद चौकात ट्रक क्र. एम.एच.२६-एच-५९६७ भरधाव वेगात आला असता संशयावरून तो पथकाने अडवित तपासणी केली असता ट्रकमध्ये २५० लिटर क्षमतेचे स्पिरिटने भरलेले ३२ बॅरल आढळून आले.

या स्पिरिट वाहतुकीबाबत कुठलाही परवाना नसल्याने चालक संजय जळबाजी काळे (४०, रा. पसरणी, ता. नांदेड) व व्यंकटेश शिवराम शिंदे (धनेगाव, ता. नांदेड) या दोघांना ट्रकसह ताब्यात घेण्यात आले. या बॅरलमध्ये १९ लाख ५ हजार रुपये किंमतीचे स्पिरिटे विनापरवाना नेले जात होते.

काळे व शिंदे यांची सखोल चौकशी करण्यात आली असता त्यांनी दिलेल्या माहितीवरून मानगंगा साखर कारखान्याच्या आसवनी घटकास भेट देण्यासाठी पथक पाठविण्यात आले असता त्याठिकाणी रजिष्टरमध्ये साठ्यापेक्षा सुमारे २० हजार लिटर स्पिरिटे जास्त आढळून आले.

तसेच कारखान्याच्या मळीच्या साठ्यात सुमारे ७६८ मे.टन साठा जास्त आढळून आला आहे. या प्रकरणी सखोल चौकशी केली जात असून कारखान्यासह डिस्टीलरी विभागप्रमुख उदयसिंग देशमुख, मध्यस्थी इसम प्रशांत (रा. मुंबई) यांच्यासह काळे व शिंदेविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे निरीक्षक शेवाळे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*