Friday, April 26, 2024
Homeनाशिकमालेगाव : दाखल गुन्ह्यातून वाचविण्यासाठीच आ. मौलाना मुफ्तींना ‘होम क्वॉरंटाईन; माजी आ....

मालेगाव : दाखल गुन्ह्यातून वाचविण्यासाठीच आ. मौलाना मुफ्तींना ‘होम क्वॉरंटाईन; माजी आ. शेख रशीद यांचा आरोप

मालेगाव । दि. 2 प्रतिनिधी

सामान्य रूग्णालयात डॉक्टरांसह कर्मचार्‍यांना शिविगाळ, दमबाजी व मारहाण केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात अटक होवू नये व जामीन मिळावा यासाठी अचानक मनपा आरोग्य विभागाने आ. मौलाना मुफ्ती यांना 14 दिवसांसाठी होम क्वॉरंटाईन केले आहे. मनपा वैद्यकिय अधिकारी व पोलीस आ. मौलाना मुफ्ती यांना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे माजी आ. शेख रशीद यांनी केला. ते काँग्रेस संपर्क कार्यालयात आज आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

- Advertisement -

ते म्हणाले,  आ. मौलाना मुफ्ती मो. इस्माईल यांना 14 दिवसांसाठी मनपा आरोग्य विभागाचे वैद्यकिय अधिकार्‍यांतर्फे घेण्यात आलेल्या होम क्वॉरंटाईनच्या निर्णयावर टिका केली. सामान्य रूग्णालयातील डॉक्टर व सेवकांना आ. मौलाना मुफ्ती यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी शिवीगाळ, दमबाजी व मारहाणीचा प्रकार केला होता.

याप्रकरणी दाखल गुन्ह्यात आ. मौलाना मुफ्ती व त्यांच्या इतर तिघा साथीदारांना मदत व्हावी यासाठीच मनपा आरोग्य विभाग व पोलिसांनी होम क्वॉरंटाईन कुंभाड रचले असल्याचा आरोप करत शेख रशीद पुढे म्हणाले, गत दिड महिन्यापासून दिल्ली, मुंबई, बेंगलोर व इंदौर येथे आ. मौलाना मुफ्ती हे ये-जा करत होते.

या काळात त्यांनी विधानसभेत तसेच मंत्रालयात हजेरी लावण्यासह अनेक आमदार व मंत्र्यांची भेट घेतली. तसेच शहरात दोन सभा व पत्रकार परिषदादेखील घेतल्या. स्थानिक स्तरावर शासकीय अधिकार्‍यांच्या भेटीगाठी तसेच मनपात देखील त्यांनी भेट दिली.

या काळात आ. मौलाना मुफ्ती हे हजारो लोकांच्या संपर्कात आले होते. करोना विषाणूचा प्रादुर्भाव सर्वत्र फैलावत असतांना देखील आ. मौलाना मुफ्ती यांनी काळजी घेतली नाही. व प्रशासनाने देखील याकडे दुर्लक्ष केले आहे.

जर सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आ. मौलाना मुफ्ती यांना होम क्वॉरंटाईन केले जात असेल तर मग त्यांच्या संपर्कात आलेल्यांना देखील वैद्यकिय अधिकारी व पोलीस होम क्वॉरंटाईन करणार आहेत कां? असा सवाल माजी आ. शेख रशीद यांनी उपस्थित केला. आ. मौलाना मुफ्ती यांना होम क्वॉरंटाईन करण्यात आल्याच्या वृत्तामुळे मात्र शहरातील जनतेत दहशत व घबराटीचे वातावरण पसरले असल्याचेही ते म्हणाले.

पोलीस ज्यांना फरार म्हणत आहेत ते डॉक्टर व सेवकांना शिवीगाळ व मारहाण गुन्ह्यातील आरोपी आजही मोकाट फिरत आहेत. एक आरोपी तर पोलीस बंदोबस्तात फिरत आहे.

न्यायालय आवारात सुध्दा हे आरोपी फिरतांना आढळून आले असल्याने मारहाण व गुंडागर्दी करणार्‍या पोलीस पाठीशी घालत असल्याचे दिसून येत असल्याची टिका शेख रशीद यांनी केली.

लॉकडाऊन-संचारबंदीचे पालन करा

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच केंद्र व राज्य शासनातर्फे लॉकडाऊनसह संचारबंदी जारी करण्यात आली असल्याने जनतेने घरातच थांबावे. अत्यावश्यक कामांसाठी बाहेर पडतांना एकानेच जावे. पाच ते दहा फुटाचे अंतर दुसर्‍या व्यक्तीमध्ये ठेवावे. विनाकारण शहरात दुचाकीवरून फिरून पोलीस यंत्रणेस त्रास होईल, असे कृत्य जनतेने करू नये, असे आवाहन माजी आ. शेख रशीद यांनी केले.

पोलीस-डॉक्टरांवर दगडफेक करणार्‍यांचा निषेध

करोना विषाणूचा प्रादुर्भाव होवू नये यास्तव मालेगाव शहर-तालुक्यासह संपुर्ण देशात वैद्यकिय अधिकारी, डॉक्टर, सेवक, पोलीस, मनपा अधिकारी-कर्मचारी, स्वच्छता सेवक हे दिवसरात्र परिश्रम घेत आहेत. जनतेचे जीवन वाचविण्यासाठी हे अधिकारी-सेवक स्वत:चे जीव धोक्यात घालून काम करत आहेत. या कार्याबद्दल आपण त्यांचे मनापासून आभार मानत आहोत. तसेच जीव धोक्यात घालून काम करणार्‍या पोलीस, अधिकारी, कर्मचारी तसेच डॉक्टर व परिचारिकांवर दगडफेक करणार्‍यांचा आपण तीव्र शब्दात निषेध करीत असल्याचे माजी आ. शेख रशीद यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या