Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकमालेगाव : करोनाचा फैलाव रोखण्यासाठी अधिकारी, सेवकांसह रुग्णांना शहराबाहेर जाण्यास बंदी

मालेगाव : करोनाचा फैलाव रोखण्यासाठी अधिकारी, सेवकांसह रुग्णांना शहराबाहेर जाण्यास बंदी

मालेगाव | प्रतिनिधी

शहरात दररोज वाढत असलेला करोनाचा प्रादुर्भाव व बाधित रुग्णांची संख्या 126 वर जाऊन पोचल्याने प्रशासनासह जनतेच्या चिंतेत भर पडली आहे. विषाणूचे संक्रमण ग्रामीण भागासह इतर तालुक्यांमध्ये फैलावू नये यामुळे शहरात कार्यरत विविध विभागांच्या अधिकारी व सेवकांना तसेच रुग्णांना शहराबाहेर जाण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. याबाबतचे आदेश प्रांत विजयानंद शर्मा यांनी आज काढले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा इशारा प्रांत शर्मा यांनी दिला आहे.

- Advertisement -

शहरात विविध विभागांमध्ये कार्यरत अनेक अधिकारी सेवक कर्तव्य बजावण्यासाठी दररोज ग्रामीण भागात इतर तालुक्यातून ये-जा करीत आहेत. शहरात करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता अधिकारी सेवकांच्या माध्यमातून ग्रामीण भागात करोनाचा फैलाव होण्याचे नाकारता येऊ शकत नाही. त्यामुळे अधिकारी सेवकांनी शहराबाहेर जाऊ नये असा आदेश प्रांत शर्मा यांनी आज काढला आहे. आदेशाचे काटेकोर पालन न करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला.

रुग्णांना शहर सोडण्यास बंदी

करोना व्यतिरिक्त इतर आजाराचे रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांना देखील शहराबाहेर ग्रामीण भागात अथवा इतर तालुक्यात जाण्यास प्रांत शर्मा यांनी एका आदेशाद्वारे बंदी घातली आहे. विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी ही खबरदारी घेतली जात आहे.

यासोबतच ज्या रुग्णांवर शहरात उपचार होणे शक्य नाही त्याच इतर तालुक्यात अथवा जिल्ह्यात उपचारासाठी हलवण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासाठी सामान्य रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांची परवानगी घेणे आवश्यक असणार आहे.

या रुग्णास अधिकृत वाहतूक पास शहराबाहेर उपचाराकरिता जाण्यास दिला जाईल. रुग्ण अथवा त्याच्या नातेवाईकांनी या पास शिवाय शहराबाहेर जाण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल असा इशारा प्रांत शर्मा यांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या