Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

विद्यार्थ्यांचे करोनाशी युद्ध; ५ लाख मास्क केले तयार

Share

नाशिक | प्रतिनिधी

करोनाशी लढण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या ६० हजार स्वयंसेवकांनी सुमारे ५० लाख मास्क; तसेच हजारो लिटर सॅनिटायझर निर्मितीचे कार्य सुरू केले आहे. या स्वयंसेवकांनी एवढ्यावरच न थांबता प्रत्येकी दहा कुटुंबे दत्तक घेण्याची प्रकिया सुरू केली आहे. त्यामुळे आम्ही करोनाला हरवणार हा एकच घ्यास घेऊन हे विद्यार्थी नाशिक, पुणे व नगर  जिल्ह्यात कार्यरत आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयातील एनएसएसचे स्वयंसेवक सध्या मास्क बनविण्याच्या कामात व्यग्र आहेत. आतापर्यंत ४७ हजार ८०० विद्यार्थ्यांनी ५ लाखांपेक्षा अधिक मास्क तयार केले आहेत. करोना विरोधातील लढाईत विद्यार्थ्यांचा सहभाग असावा, त्यांनी सामाजिक कार्यात सहभाग घ्यावा यासाठी एनएसएससोबतच एनसीसी, विद्यार्थी विकास मंडळ आणि क्रीडा विभागाच्या माध्यमातून साधारणतः ५० लाख मास्क तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.

विद्यार्थ्यांनी घरी उपलब्ध असलेल्या कापडाच्या मदतीने मास्क बनवायला सुरुवात केली असून, कोणी मशिनवर तर कोणी हाताने मास्क तयार करत आहेत. मास्क कसे तयार करावे, याबाबतचे व्हिडिओ स्वयंसेवकांना पाठविण्यात आले आहेत. त्याआधारे हे स्वयंसेवक मास्क बनवत आहेत. काही स्वयंसेवकांनी ते तयार करीत असलेल्या मास्कचे व्हिडिओ काढून सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये पुणे, नाशिक व नगर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आहे.

बुधवारपर्यंत २३५ महाविद्यालयातील ४७ हजार ८०० विद्यार्थ्यांनी ५ लाखांपेक्षा अधिक मास्क तयार केले असून, त्यांचे आपापल्या भागात वाटपही सुरू आहे. पुणे विद्यापीठाने महाविद्यालयांना सॅनिटायझर बनविण्याचे आवाहन केले होते. सॅनिटायझर तयार करण्याचे व्हिडिओदेखील तयार करून, ते महाविद्यालयांना पाठविण्यात आले आहेत. त्यात १४७ महाविद्यालयांनी सहभाग घेऊन ४ हजार लिटरपेक्षा जास्त सॅनिटायझर तयार केले आहे. त्याचे वाटप महापालिका, नगर परिषद, ग्रामपंचायत यांना केले जात आहे.

यासोबतच रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने, सिनेट सदस्य बागेश्री मंठाळकर यांच्या संकल्पनेतून रक्त संकलन करण्यासाठी मोहिमेची सुरुवात झाली असून, त्यासाठी साधारण २० हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, उपकुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, एनएसएसचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. संजय चाकणे, प्रसेनजीत फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली एनएसएस स्वयंसेवक मदतकार्यात सहभागी झाले आहेत.


मास्क तयार करणाऱ्या महाविद्यालयांना अनुदान

एनएसएसच्या माध्यमातून विद्यार्थी करोनाला रोखण्यासाठी काम करत आहेत. पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यात ही चळवळ निर्माण झाली आहे. गरजू नागरिकांना मदत करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने त्यांच्या घराजवळील दहा कुटुंबे दत्तक घेऊन त्यांना मदत करावी, असे आवाहन केले आहे, त्यातही मोठा सहभाग आहे. विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांनी मास्क तयार करावेत यासाठी विद्यापीठ अनुदान देणार आहे. त्यासाठी ऑनलाइन प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!