‘मिशन इंद्रधनुष्य’ यशस्वी करा; मालेगावला अभियानाच्या शुभारंभप्रसंगी राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.सावंत यांचे आवाहन

0
मालेगांव । घरात संपन्नता हवी तर घरातील सर्व सदस्य निरोगी हवे. लहान बालके व गर्भवती महिलांसाठी मिशन इंद्रधनुष्य अभियान केंद्र व राज्य शासनातर्फे सुरु करण्यात आले आहे.

या महत्वकांक्षी अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभचा बहुमान मालेगावला मिळत आहे. हे निश्चितच अभिनंदनीय असुन मालेगावकरांनी शंभर टक्के उद्दिष्ट पुर्ण करत हे अभियान यशस्वी करावे असे प्रतिपादन राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.दिपक सावंत यांनी केले.

मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात राज्यस्तरीय मिशन इंद्रधनुष्य लसीकरण अभियानाचा शुभारंभ तसेच नर्सिंग कॉलेज इमारत लोकार्पण व महिला व मुलांचे रुग्णालय इमारतीचे नुतनीकरण कामाचा शुभारंभ राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.दिपक सावंत यांच्याहस्ते करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे होते.

तर प्रमुख पाहुणे म्हणून आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदिप व्यास, संचालक संजीव कुमार, सतीष पवार, डॉ.अर्चना पाटील, जि.प.अध्यक्षा शितल सांगळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी दिपककुमार मिना,जि.प.आरोग्य सभापती यतीन पगार, महापौर शेख रशीद, उपमहापौर सखाराम घोडके, माजी आ.मौलाना मुफ्ती मो.इस्माईल, मौलाना अब्दुल बारी, स्थायी समिती सभापती सलीम अन्वर, मनपा उपायुक्त अंबादास गरकल, सुशिल वाघचौरे, सुरेश जगदाळे उपस्थित होते.

यावेळी आरोग्य मंत्री सावंत म्हणाले की, गोरगरीब व कामगारांचे प्राबल्य असलेल्या शहर व तालुक्यात मिशन इंद्रधनुष्य या अभियानाचा शुभारंभ व्हावा तसेच महिला व मुलांचे शंभर खाटांचे रुग्णालय कार्यान्वियत करावे असा आग्रह सातत्याने दादा भुसे यांनी धरला होता. महिला व मुलांना उपचाराची सोय होण्यासह ते रोगमुक्त रहावे ही भावना भुसे यांची होती.हे आरोग्य मंत्री म्हणुन नव्हे तर डॉक्टर म्हणुन आपल्या लक्षात आल्याने त्यांची मागणी आपण मान्य केली असे सावंत स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले राज्यस्तरीय मिशन इंद्रधनुष अभियानाचा येथे होत असलेला शुभारंभ मालेगावकरांचा लौकीक वाढविणारा ठरला आहे. त्यामुळे लसीकरणाचे उद्दिष्ट मालेगावकरांनी पुर्ण करावे अशी विनंती आपण करतो.येत्या सहा महिन्यात जिल्हा दर्जाची ब्लड बँक मालेगावी कार्यान्वित केली जाईल.

रक्ताअभावी एकाही गर्भवती महिलेचा मृत्यू आपण होवु देणार नाही.त्यामुळे येत्या काळात निश्चितच आरोग्यसंदर्भातील प्रलंबित प्रश्नांची सोडवणुक झालेली दिसेल असे आश्वासन सावंत यांनी दिले.ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे म्हणाले की,मिशन इंद्रधनुष या राज्यस्तरीय अभियानाच्या शुभारंभासाठी मालेगावची निवड केल्याबद्दल आरोग्य विभागाचे आपण जनतेच्या वतीने आभार मानतो.महिला व मुलांचे रुग्णालयासाठी अडीच कोटीचा निधी देण्यात आला,आता वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांची नियुक्ती आरोग्यमंत्र्यांनी करावी असे सांगीतले.

आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदिपकुमार व्यास यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.प्रारंभी दिपप्रज्वलन तसेच लहान बालकांना लसींचे डोस पाजत मिशन इंद्रधनुष या अभियानाचा शुभारंभ आरोग्यमंत्री डॉ.सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी लसीकरणासाठी विशेष परिश्रम घेणार्‍या वैद्यकीय अधिकारी व आरोग्य सेविकांचा ना.सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास महिला व बालकल्याण सभापती आशा आहिरे, अरुण लींगायत, मनोहर बच्छाव, कृउबा उपसभापती सुनिल देवरे, गटनेते निलेश आहेर, विजय पोफळे, संजय दुसाने, रामा मिस्तरी, विनोद वाघ, जयप्रकाश बच्छाव, डॉ.दिलीप भावसार, उदय राहुरे, पं.स.सदस्य भगवान मालपुरे, कृष्णा ठाकरे, भिकनआबा शेळके, ड.ज्योती भोसले, जिजाताई बच्छाव, कल्पना वाघ, राजाराम जाधव, पप्पु पवार, पुष्पा गंगावणे, राजेश गंगावणे, आरोग्य अधिकारी डॉ.किशोर डांगे, डॉ. भिमराव त्रिभुवन, भारत बेद, कैलास पवार आदिंसह विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी जिल्हा वैद्यकीय अधिक्षक सुरेश वाघचौरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

*