..तरच ‘मेक इन नाशिक’ शक्य!

0
नाशिकचे नाशिकबाहेर ब्रँडिंग करण्यासाठी मुंबईत आयोजित केलेल्या ‘मेक इन नाशिक’ उपक्रमाची नुकतीच सांगता झाली. १ हजार ८७५ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव, १५ देशांतील दूतावासांनी नाशिकमध्ये दाखवलेला रस, दीड ते दोन हजार उद्योग प्रतिनिधींनी दिलेली भेट आणि मुख्यमंत्र्यांनी नाशिकच्या विकासाची स्पष्ट केलेली कल्पना ही या उपक्रमाची ठळक वैशिष्ट्ये म्हणावी लागतील.

विमान बांधणी, कृषीप्रक्रिया उद्योग, पर्यटन आणि आरोग्य हे महत्त्वाचे उद्योग आहेत. या क्षेत्रांत नाशिकला विकासाच्या फार मोठ्या संधी आहेत. उद्योजकांनी या उद्योगांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी या उपक्रमात व्यक्त केली. भारतात नाशिक धार्मिक पर्यटन, विमान कारखाना, नोटप्रेस, आयुर्वेदाची आरोग्यदायी परंपरा, द्राक्षे आणि कांदा पिकांमुळेच ओळखले जाते. आजही हीच नाशिकची बलस्थाने मानली जातात.

या क्षेत्रांत विकासाला आणि पर्यायाने रोजगारवृद्धीला प्रचंड वाव आहे. ही भूमिका नाशिकमधील काही ज्येष्ठ उद्योजक गेली अनेक वर्षे सातत्याने मांडत आले आहेत. तीच भूमिका मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केली. नाशिकचा बळीराजा देशोधडीला लागत आहे.

नाशवंत शेतमाल पिकवायचा नाही, असा निर्णय शेतकर्‍यांची तरुण पिढी घेऊ लागली आहे. नाशिकमध्ये कृषी उत्पादनांच्या प्रक्रियेचे उद्योग विकसित झाले तर बळीराजाला मोठा आधार मिळू शकेल. नाशिकला हजारो पर्यटक भेट देतात. मात्र पर्यटक येतात, धार्मिक पर्यटन करतात आणि नाशिकच्या पदरात फारसे काहीही न पडता परततात.

पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पर्यटन उद्योग विकसित व्हायला हवा. उद्योगांना लागणारे साहित्य व कच्चामालापैकी किमान ३० टक्के माल देशीच खरेदी करावा, असे बंधन सरकारतर्फे उद्योगांवर घातले गेले आहे. एचएएल कारखान्याला लागणारे साहित्य नाशिकमध्येच निर्माण करण्यासाठी हा निर्णय उपयुक्त ठरू शकतो.

आयुर्वेदाची आणि घराण्यांची समर्थ परंपरा नाशिकला लाभली आहे. केरळप्रमाणे आरोग्य पर्यटन विकासासाठी ते पायाभूत ठरू शकते. नाशिकच्या उद्योगधुरिणांनी दूरदृष्टीने आता तरी उद्योगविकासाची दिशा ठरवणे गरजेचे आहे. त्यासाठी उद्योजक, शासन, प्रशासन, औद्योगिक संघटना आणि राजकारण्यांनी एकत्रित येण्याची, सातत्यपूर्ण प्रयत्नांची व अनावश्यक अडथळे कमी करण्याची गरज आहे.

‘हातचे सोडून पळत्याच्या, उडत्याच्या व आयटी पार्कच्या मागे धावण्याचा’ प्रयत्न नाशिकच्या विकासाला मारक ठरू शकेल का? याचाही साधकबाधक विचार यानिमित्ताने झाला तरच नाशिकचे खर्‍या अर्थाने ‘मेक इन नाशिक’ होईल हे संबंधितांनी लक्षात घेतलेले बरे!

LEAVE A REPLY

*