‘मेक इन नाशिक’मध्ये मनपाचाही स्टॉल

0
नाशिक | दि. २४ प्रतिनिधी- ‘मेक इन नाशिक’ प्रदर्शन मुंबई येथे ३० व ३१ मे रोजी होणार आहे. वरळीतील नेहरू प्लानिटोरियम येथे होणार्‍या या उपक्रमात महापालिकाही सहभागी होणार आहे. महापालिकेचा स्टॉल या ठिकाणी राहणार असून त्याद्वारे उद्योजकांना नाशिकमधील गुंतवणुकीसाठी आवाहन करण्यात येणार आहे.

‘मेक इन नाशिक’मध्ये नाशिकमधील बहुतांशी उद्योजक सहभागी होणार असून मुंबईसह राज्यातील अनेक संस्थांना नाशिकमधील गुंतवणुकीसाठी आवाहन करण्यात येणार आहे. याशिवाय नाशिकमधील उद्योगांची माहिती राष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्याचा मानस आहे.

वाईन इंडस्ट्रीजपासून नाशिकमधील सर्वच लहान-मोठ्या उद्योगांचे स्टॉल्स या ठिकाणी राहणार आहेत. महापालिकेचाही या ठिकाणी स्टॉल राहणार असून त्याद्वारे महापालिकेचे पाणी नियोजन, स्मार्ट सिटी योजना, खतप्रकल्प, चिल्ड्रन पार्क, उद्याने, रस्ते, विद्युत सुविधा, वाहतूक नियोजन, रिंग रोड, उड्डाणपूल, धार्मिक स्थळे, कृषी पर्यटन, भौतिक सुविधा, करप्रणाली आदी सर्वच गोष्टींची माहिती पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून देण्यात येईल.

यासाठी महापालिकेतून कर्मचारी पाठवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दोन दिवस सुरू राहणार्‍या या प्रदर्शनात उद्योजकांनी नाशिकमध्ये गुंतवणूक का करावी, नाशिकमधील सोयीसुविधा, महापालिकेचे काम उद्योजकांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे.

दृकश्राव्य माध्यमातून नाशिकची माहिती पोहोचवली जाईल. उद्योजकांना देण्यात येणार्‍या सुविधा, एकूणच महापालिकेची कार्यपद्धती याबाबतही सर्व माहिती या स्टॉलच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

*