उद्योगविश्‍व विस्तारासाठी मुंबईत ‘मेक इन नाशिक’

0
मुंबई | दि २६ अनिकेत जोशी – नासिकचे उत्तम हवामान, स्वस्त मनुष्यबळाची उपलब्धता आणि चांगले औद्योगिक वातावरण हे पाहता नासिकमध्ये आणखी मोठे उद्योग यावेत यासाठी मेक इन नासिक या विशेष कार्यक्रमाचे आयोजन मुंबईत करण्यात येत आहे. मेक इन इंडिया वा मेक इन महाराष्ट्राच्या धर्तीवर जिल्हा स्तरावर होणारा पहिलाच कार्यक्रम ‘मेक इन नासिक’ हा उपक्रम चर्चासत्र व प्रदर्शनाच्या रूपाने घेण्यात येत असल्याची घोषणा निमा संघटनेचे अध्यक्ष एच एस बॅनर्जी यांनी केली.

मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, येत्या ३० व ३१ मे रोजी मुंबईत वरळी येथील नेहरु सेंटरमध्ये होणार्‍या या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस हे करतील. या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सुरेश प्रभु व अनंत गीते हे उपस्थित असतील. याप्रसंगी खा. गोडसे म्हणाले, नासिक हे महामार्गाने मुंबई व पुण्याशी उत्तमरीत्या जोडले गेले आहे. इथे दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर येणार आहे.

कनेक्टीविटी उत्तम असल्यामुळेच आणखी एका नवीन महामार्गाची काय गरज असा नासिककरांचा सवाल आहे व त्यामुळेच समृद्धी महामार्गाला शिवसेनेचा विरोध आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. नासिकमध्ये ‘मेक इन नासिक’च्या माध्यमातून नासिक येथे नवीन पाच हजार कोटी रुपयांचे उद्योग येतील असा विश्वास गोडसेंनी व्यक्त केला.

नासिक, पाटणा व वाराणसी येथे आयटी हब व्हावेत असा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे असे सांगून खा गोडसे म्हणाले की आमच्याकडे आयटीसाठी तयार झालेली इमारत गेली १२ वर्षे तशीच पडून आहे. तिचा वापर करावा अशी आमची सरकारला सूचना आहे.

त्या इमारतीचा वापर सुरु केला तरी अनेक मोठ्या कंपन्या तिथे लगेच येतील असेही ते म्हणाले. पत्रकार परिषदेसाठी क्रेडाईचे अनिल जाधव, निमाचे पदाधिकारी ब्राह्मणकर, प्रदीप पेशकर, श्रीधर व्यवहारे आदि उपस्थित होते.

मोठा खर्च  गरजेचा  आहे का?

खा. गोडसे म्हणाले, जुन्या महामार्गापासून अनेक ठिकाणी शून्य ते अर्धा किलोमीटर इतक्या जवळ नवा समृद्दी महामार्ग प्रस्तावित केला आहे, तो का असे आमचे म्हणणे आहे. इगतपुरी ते पाथ्रा या जुन्या मार्गाने १०५ किलोमीटरचा महामार्ग आहे, त्याऐवजी नवा समृद्धी महामार्ग हेच अंतर ९७ कि मी इतके म्हणजे केवळ पाच सात कि मी इतके कमी कऱणार आहे. त्यासाठी इतका मोठा खर्च गरजेचा आहे का हा सवाल आहे. 

LEAVE A REPLY

*