Tuesday, April 23, 2024
Homeब्लॉगब्लॉग : महेंद्रसिंह धोनी : भारतीय क्रिकेटला पडलेले गोड स्वप्न

ब्लॉग : महेंद्रसिंह धोनी : भारतीय क्रिकेटला पडलेले गोड स्वप्न

– श्याम बसप्पा,

ठाणेदार दौंड जिल्हा, पुणे ९९२२५४६२९५

- Advertisement -

भारताचा माजी कर्णधार, यष्टीरक्षक, कॅप्टन कुल महेंद्रसिंह धोनी याने स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याची घोषणा केली.

त्याची निवृत्ती क्रिकेट रसिकांना चटका लावून गेली. महेंद्रसिंह धोनी हे भारतीय क्रिकेटला पडलेले गोड स्वप्न होत.

जे स्वप्न कधीही मोडू नये असेच क्रिकेट रसिकांना वाटत होते कारण महेंद्रसिंह धोनीचे १६ वर्षाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणजे भारतीय क्रिकेटचा सुवर्णकाळ. या सुवर्णकाळात भारतीय क्रिकेटला जे मिळाले ते त्याआधी कधीही मिळाले नव्हते. एका अर्थी महेंद्रसिंह धोनी हा भारतीय क्रिकेटसाठी परिसच म्हणावा लागेल.

जिथे तो जिथे हात लावेल त्याचे सोने होत गेले. काय नाही दिले त्याने भारताला ? २८ वर्षानंतर एकदिवसीय सामन्यातील विश्वचषक (२०११) टी-२० विश्वचषक (२००७), चॅम्पियन्स ट्रॉफी (२०१९), एकदा नव्हे तर दोनदा आशिया चषक, २००८ मध्ये ऑस्ट्रेलियात खेळली गेलेली सी बी चषक स्पर्धा, आणि कसोटीमध्ये भारताला नंबर १. चेन्नई सुपर किंग या त्याच्या आयपीएल संघाला देखील त्याने तीनदा विजेतेपद मिळवून दिले (२०१०, २०११, २०१८) दोनदा चॅम्पियन्स लीग टी-२० (२०१०, २०१४) अर्थात हे सर्व यश त्याला त्याच्या कुशल नेतृत्वामुळेच मिळाले.

कितीही कठीण प्रसंग आला तरी विचलित न होता शांत डोक्याने त्यावर मात करुन सामना खेचून आणण्याचे कसब त्याच्याकडे होते. एका महान कर्णधाराकडे असलेले सर्व गुण त्याच्याकडे होते. म्हणूनच भारताचा सर्वोत्तम कर्णधार म्हणून त्याची इतिहासात नोंद आहे. त्याची फलंदाजी म्हणजे पर्वणीच. जगातील सर्वोत्तम फिनिशन अशी ओळख असलेल्या महेंद्रसिंह धोनीने भारताला असंख्य जिंकून दिले.

सामना शेवटच्या चेंडूपर्यंत खेचत नेऊन शेवटच्या चेंडूवर षटकार खेचत भारताला विजय मिळवून देण्याच्या त्याच्या स्टाईलमुळे तो क्रिकेट रसिकांच्या गळ्यातील ताईत बनला. २०११ च्या विश्वचषकात श्रीलंकेच्या नुवान कुलशेखराला मारलेला षटकार कोण विसरेल? त्याच्या हेलिकॉप्टर शॉटवर तर अबाल वृद्ध फिदा होते.

यष्टीरक्षणात तर त्याने कमाल केली. यष्टीच्या मागे उभे राहून क्षणार्धात यष्ट्या उधवस्थ करण्याचे त्याचे कसब पाहून भले भले तोंडात बोटे घालत. तो भरताचाच नाही तर जगातला सर्वोत्तम यष्टीरक्षक म्हणून महेंद्रसिंह धोनीची नोंद होते. महेंद्रसिंह धोनी हा कट्टर देशभक्त.

२०११ सालचा विश्वचषक जिंकल्यानंतर त्याने टेरोटोरियल आर्मी जॉईन केली. या आर्मीचा तो मानद लेफ्टनंट कर्नल आहे. गेल्या वर्षी तो प्रादेशिक आर्मी बटालियनमध्ये दाखल झाला. बटालियनमध्ये दाखल होताच वरिष्ठांशी चर्चा करून त्याने काश्मीर गाठले.

तिथे खडतर प्रशिक्षण घेऊन आर्मी ऑफिसर प्रमाणे ६ महिने खडतर सेवा बजावली. या दरम्यान त्याने कुठलीही व्हीआयपी ट्रीटमेंट स्वीकारली नाही.अन्य आर्मी ऑफिसर प्रमाणेच त्याने लष्करातील सेवा बजावली. धोनी हा कमालीचा देशप्रेमी आणि समर्पित व्यक्ती आहे. त्याला लष्करा प्रति कमालीचा अभिमान आणि आदर आहे.

राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मविभूषण पुरस्कार त्याने लष्करी गणवेशातच स्वीकारला. पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध त्याने आपल्या ग्लोजवर नोंदवून दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना खेळला. त्याने निवृत्ती देखील स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच स्वीकारुन भारत मातेला एकप्रकारे अभिवादन केले आहे. देशानेही त्याच्या कर्तृत्वाचा सन्मान राखत त्याला अनेक पुरस्कारांनी गौरवनित केले.

अर्जुन, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड असे अनेक पुरस्कार त्याला मिळाले. आयसीसीनेही त्याला प्लेयर ऑफ दि इयर अवॉर्ड दोनदा देऊन त्याचा गौरव केला. झारखंड मधील छोट्या गावातून आलेला, पोटापाण्यासाठी रेल्वेस्टेशनवर तिकीट कलेक्टर म्हणून काम करणारा एका गरीब घरातील मुलगा ते जगातील करोडो क्रिकेट रसिकांच्या गळ्यातील ताईत हा त्याचा प्रवास जितका विस्मयकारक आहे तितकाच तो प्रेरणादायीही आहे.

महेंद्रसिंह धोनी सारखा खेळाडू युगायुगातून एकदाच जन्माला येतो. त्याची जागा घेऊ शकणारा खेळाडू भारताला मिळणार कधीही मिळणार नाही. त्याच्या निवृतीने भारतीय क्रिकेटमधील धोनी अध्याय संपला असला तरी क्रिकेट रसिकांच्या मनातून धोनी कधीही जाणार नाही. मिस यु माही.. तुला मनापासून शुभेच्छा…

- Advertisment -

ताज्या बातम्या