महाआघाडी सरकारचे नाबाद शतक

महाआघाडी सरकारचे नाबाद शतक

सरकारच्या भवितव्याची सातत्याने भाकिते विरोधी पक्षाचे नेते गेले तीन महिने करत आहेत. मात्र त्यांची ती भाकिते खोटी ठरवण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार यशस्वी ठरले आहे. वेगवेगळी विचारसरणी असूनही समान विकास कार्यक्रमानुसार सरकार कसे चालवता येते त्याची प्रचिती मुख्यमंत्री ठाकरे यांनी विरोधकांसह देशभरातील राजकीय पक्षांना दिली आहे. शंभर दिवसांचा टप्पा पार करून सरकारची पुढच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.

किशोर आपटे

जास्त दिवस चालणार नाही असे ज्याच्या जन्माच्या क्षणापासून राजकीय भविष्य वर्तवले जात आहे त्या ठाकरे सरकारने 6 मार्चला शंभर दिवस पूर्ण केले. त्याच दिवशी राज्याला भविष्याची नवी दिशा देणारा अर्थसंकल्पही सादर केला. त्यात आमदार निधीत एक कोटीची भरीव वाढ करण्याची घोषणा करून नव्या आमदारांना खूश करण्यात आले. आज सरकार पडणार, पंधरा दिवसांपेक्षा जास्त काळ सरकार टिकणार नाही, अशी भाकिते खोटी ठरवून व सरकारचे शंभर दिवस पूर्ण करून महाविकास आघाडीने भाकितकारांना धक्का दिला आहे. पाहिले शंभर दिवस कुठल्याही सरकारने पूर्ण केले ही काही खूप मोठी उपलब्धी आहे असे म्हणता येणार नाही, पण ज्या स्थितीत हे सरकार स्थापन झाले आणि त्याची ज्या वातावरणात वाटचाल सुरू आहे ती ‘बिकट वाट वहिवाट’ आहे, हे विसरून चालणार नाही.

‘तीन पायांची शर्यत’ म्हणून पूर्णत: टोकाच्या राजकीय भूमिका असलेले हे तीन पक्षांचे सरकार सत्तेत आले तेव्हा नुकतेच देवेंद्र फडणवीस यांचे 80 तासांचे सरकार पायउतार झाले होते. त्यात सहभागी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या एकूणच भूमिकेवर प्रश्नचिन्ह लागले होते, काँग्रेस सत्तेत राहून की बाहेरून सरकारला पाठिंबा द्यायचा या द्विधा मन:स्थितीत होती, ज्यांना प्रशासनाचा अजिबातच अनुभव नाही असे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर यांच्या मार्गदर्शनात अजित पवार, अशोक चव्हाण अशा माजी मुख्यमंत्री आणि दिग्गज महत्त्वाकांक्षी नेत्यांना कसे काम करता येणार, असा प्रश्न होता. शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून ठाकरेंना आदेश देण्याची सवय! त्यात या नव्या नेत्यांशी त्यांचे कसे जमणार? पुन्हा शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या राजकीय बेचकीत त्यांना हिंदुत्वाचा अजेंडा बाजूला ठेवून किती आणि कसे काम करता येणार? अशा शंका, संभ्रमांच्या कोलाहलात राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एका नव्या डावाला सुरुवात झाली होती. मात्र आपल्या कारभारातून सगळ्या शंका-कुशंकांना योग्य उत्तर देऊन त्या बाजूला सारण्यात उद्धव ठाकरे यशस्वी झाले आहेत.

‘समोरच्या व्यक्तीला कधीही कमी लेखण्याची चूक करू नये’ असे म्हणतात. तसेच नव्या मुख्यमंत्र्याच्या कर्तृत्वाचा अंदाज आधी घ्यावा, मग बोलावे असे विरोधकांना वाटले असते तर बरे झाले असते, असेच आता म्हणावे लागत आहे. फडणवीस यांच्या 80 तासांच्या सरकारनंतर तीन पक्षांपैकी कोणाचे आमदार भाजप फोडणार? ‘ऑपरेशन लोटस’ कधी होणार? ही टांगती तलवार डोक्यावर ठेवून हे शंभर दिवस पार पडले आहेत. म्हणून त्याला ‘करून दाखवले’ असेच म्हणावे लागत आहे. नाक्या-नाक्यावर पैजा लावून ज्यांनी ‘हे सरकार केव्हा पडणार’ याची भाकिते केली होती त्यांना आता ‘मुह की’ पडली आहे. मुळात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे राजकीय मतभेद असलेले पक्ष एकत्र येऊच कसे शकतात? यावर भाजपने जे काहूर उठवले होते ते आजही गेल्या शंभर दिवसांत पूर्णत: शांत झाले नाही. ‘आमचा मित्र पळवला’ अशा प्रतिक्रिया आजही भाजपचे प्रदेशाध्यक्ष देतात. राजकारणात काहीच अशक्य नसते हे या सरकारने शंभर दिवसांचा पल्ला पूर्ण करताना दाखवून दिले आहे. हा आता इतिहास झाला. तीन चाकांची रिक्षा यावी आणि रस्त्यावरच्या भारीतल्या वाहनांना मागे टाकून निघून जावी तसा हा खेळ सुरू आहे.

गेल्या शंभर दिवसांत महाविकास आघाडीची महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना बावीस हजार कोटींची असून केवळ एक आदेश काढून घोळ न घालता निम्म्या शेतकर्‍यांच्या खात्यात पैसेदेखील देण्यात आल्याची उपलब्धी या सरकारने मिळवली आहे. शिवभोजन योजना ही जनसामान्यात प्रचंड लोकप्रिय ठरण्याच्या दिशेने जात असून आता एक लाख थाळी रोज अशा उद्दिष्टावर ही योजना पोहोचली आहे. आरोग्याच्या योजनेत तालुक्यात डायलिसीस केंद्र आणि महात्मा फुले आरोग्य जीवनदायी योजनेचे तालुक्यात किमान एक रुग्णालय अशी दिशा या सरकारने घेतली आहे. महिलांवरील अत्याचाराला पायबंद घालण्यासाठी याच अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिशा कायद्याच्या धर्तीवर कायदा आणण्याची पूर्वतयारी सुरू झाली आहे. ग्रामीण स्वच्छतेच्या क्षेत्रात स्व. आर. आर. आबा सुंदर गाव योजना पुन्हा नव्याने सुरू करण्यात आली आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी हरीत निधीची स्थापना आणि प्लॅस्टिकवर पूर्णत: नियंत्रण घालण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. रस्त्यावरच्या फेरीवाल्यांकडून खाद्यपदार्थ खाताना आता सुरक्षा मानके पाळली जाणार असून त्यांना ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. एसटी महामंडळाच्या नव्या गाड्या घेतल्या जात असून त्यांना नवा लूक देण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. सीमा भागात मराठी शाळांना विशेष मदत करण्याचे आणि वृत्तपत्रांना प्राधान्य देण्याची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. तृतीयपंथीयांना विकास महामंडळासाठी 50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कोकणात आणि मुंबईत पर्यटनासाठी ‘नाईट लाईफपासून मरिन लाईफ’पर्यंत निर्णय घेतले जात आहेत. अशा अनेक उपलब्धी या सरकारच्या नावाने गेल्या शंभर दिवसांचा लेखाजोखा करताना सांगता येत आहेत.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री सभागृहात फार कमी वेळ असतात किंवा त्यांचा काम करण्याचा उरक पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांच्या तुलनेत फारच कमी आहे अशा टिप्पण्या या काळात होत आहेत. पण समन्वयाने अजित पवार यांच्यासारख्या दांडग्या अनुभवाच्या नेत्यासोबत मेळ घालून कामे मार्गी लावताना मुख्यमंत्री आपला आवश्यक वेळ देत असतात, हेदेखील नाकारता येत नाही. विरोधकांना थेट दादा ढंगाने स्वातंत्र्यवीर सावरकर या मुद्यावर उत्तरे देणारे अजित पवार ही या सरकारची ढाल-तलवार आणि कवच कुंडले बनली आहे. जी व्यक्ती या सरकारमध्ये कितपत सामावेल अशी शंका सुरुवातीला घेतली जात होती. हीदेखील या शंभर दिवसांची मोठीच उपलब्धी आहे! भाजपच्या नेत्यांनी सावरकरांच्या माध्यमातून एनआरसी, सीएएच्या माध्यमातून या सरकारच्या घटक पक्षांतील मतभेद बाहेर यावेत म्हणून जोरदार प्रयत्न सुरू ठेवले आहेत. पण एकीकडे जनतेच्या भल्याची विकासाची कामे सुरू करताना या राजकीय हल्ल्यांना बचावात्मक पद्धतीने तोंड देण्याचा प्रयत्न या सरकारने गेल्या शंभर दिवसांत यशस्वी करून दाखवला आहे. भीमा-कोरेगावच्या तपासवरून राष्ट्रवादी आणि मुख्यमंत्री यांच्यात टोकाच्या भूमिका दिसल्या तेव्हा या अधिवेशनात सरकार पडणार म्हणून पुन्हा आवई देण्यात आली. पण नंतर त्याच गृहमंत्र्यांनी केंद्राला तपास देण्याचा ‘निर्णय कसा योग्य आहे आणि राज्याचा समांतर तपास कसा सुरू आहे’ तेदेखील सांगत समर्थन केल्याने ठाकरे सरकारची प्रकृती चांगली आहे, हे दिसून आले आहे.

विरोधी पक्षात बसलेल्या भाजपला आपण ‘उद्धव ठाकरे यांना गमावून बसलो’ याचा पश्चाताप होत असावा असे त्यांच्या ज्येष्ठ नेत्याच्या वक्तव्यातून सातत्याने दिसणे हीच या शंभर दिवसांच्या सरकारची उपलब्धी आहे! ‘शेवटी आमचाच भाऊ आहे,’ ‘जुना सहकारी आहे,’ ‘आज ना उद्या ते सोबत येतीलच’ अशी वक्तव्ये सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील सातत्याने करताना दिसत आहेत. शंभर दिवसांत सरकार स्थापन करून अद्यापही आम्ही हिंदुत्वाचा मुद्दा सोडला नाही हेच त्यातून अधोरेखित होणार आहे. नव्या सरकारच्या राजकीय भाष्यकारांना यातून खूप काही शिकण्यासारखे आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com