Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

महात्मा फुले कृषी विद्यापीठाला राज्यात प्रथम तर देशात 24 वे मानांकन

Share

राहुरी – नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने नुकतेच देशातील कृषी विद्यापीठांच्या प्रसिध्द केलेल्या मानांकन यादीमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठास 24 वा क्रमांक मिळाला आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये सर्वात वरचे मानांकन महात्मा फुले कृषी विद्यापीठाला मिळाले आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के.पी. विश्वनाथा यांच्या कुशल नेतृत्वाखाली आणि अधिष्ठाता (कृषि) डॉ. अशोक फरांदे, संशोधन संचालक व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख यांच्या मार्गदर्शनाने विद्यापीठाने सन 2018 सालासाठी मानांकनाचा अहवाल जून-2019 ला भारतीय कृषी अनुसंधान परिषदेला सादर केला होता. मागील वर्षाच्या शिक्षण, संशोधन आणि विस्ताराच्या कामगिरीवर अधारीत हे मानांकन विद्यापीठास मिळाले आहे.

विद्यापीठाचा कृषि शिक्षणाचा दर्जा उंचावत आहे. कृषि विद्यापीठाचे शेतकरीभिमुख अभुतपूर्व कार्यामुळे विद्यापीठास सरदार वल्लभभाई पटेल सर्वोकृष्ट कृषि विद्यापीठ पुरस्कार (2002), देशातील उत्कृष्ट संस्था म्हणुन 100 कोटी रुपयांचे विशेष पारीतोषिक (2008) आणि देशातील सर्वात पसंतीची संस्था (2009) या सारख्या विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. संशोधनात विद्यापीठाचे योगदान मोलाचे असून गेल्या 50 वर्षामध्ये अन्नधान्य, फळेफुले, चारापिके यांचे 263 हुन अधिक वाण विकसित केले असून मृद व जलसंधारण, पीक लागवड पध्दती, खते आणि पाणी व्यवस्थापन, रोग वकिडींचे नियंत्रण, औजारे, हरित गृहातील शेती, प्रक्रिया, दुग्धशास्त्र इ. याविषयी सखोल संशोधन करुन 1512 हुन अधिक महत्वपुर्ण शिफारशी प्रसारित करण्यात आल्या आहेत. विद्यापीठाने पेरणी, रोप लावणी, आंतर मशागत आणि काढणीसाठी विविध प्रकारचे 36 सुधारित यंत्रे व औजारे विकसित केले आहेत.

देशातून एकुण 60 कृषि विद्यापीठांनी मानांकनाचा अहवाल सादर केला होता. देशातील 60 कृषि विद्यापीठांमध्ये महात्मा फुले कृषि विद्यापीठाला 24 वे मानांकन मिळाले आहे. राज्यामध्ये महात्मा फुले कृषि विद्यापीठाला सर्वोच्च मानांकन आहे. यात दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठास 32 वे, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठास 45 वे, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठास 48 वे मानांकन मिळाले आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठास 2017 साली 34 वे मानांकन होते आता 2018 साली हे मानांकन 24 पर्यंत आले आहे.

महात्मा फुले कृषि विद्यापीठाला राज्यातील कृषि विद्यापीठांपैकी सर्वोच्च मानांकन मिळाल्यामुळे राज्यातुन व विद्यापीठातून विद्यापीठाला अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मानांकनाचा अहवाल बनविण्यामध्ये कुलसचिव श्री. सोपान कासार, नियंत्रक श्री. विजय कोते, विद्यापीठ अभियंता श्री. मिलिंद ढोके, विद्यापीठाचे नोडल ऑफिसर डॉ. मिलिंद अहिरे, सर्व सहयोगी अधिष्ठाता, सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

 

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!