Type to search

Featured सार्वमत

महासभेकडे अर्थसंकल्प सुपूर्द

Share

आज दुपारी एक वाजता तहकूब सभा होणार

अहमदनगर (प्रतिनिधी) – महापालिका स्थायी समितीचे सभापती मुदस्सर शेख आणि त्यांच्या सहकारी सदस्यांनी मंगळवारी महासभेमध्ये महापौर बाबासाहेब वाकळे यांच्याकडे स्थायी समितीने मंजूर केलेला अर्थसंकल्प सादर केला. यावर अभ्यास करण्यासाठी एक दिवसाचा अवधी देत महापौरांनी सभा तहकूब केली. ही सभा आज 26 जूनला दुपारी एक वाजता होणार आहे. प्रशासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पात काही बदल करत स्थायी समितीने अर्थसंकल्पाला मंजुरी दिली होती. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अर्थसंकल्पास अंतिम मंजुरीस महासभा घेता येत नव्हती. ती मंगळवारी झाली. यामध्ये सभापती शेख यांनी स्थायी समितीने तयार केलेले 780 कोटी 55 लाख रुपये खर्चाचा अर्थसंकल्प महासभेला सादर केला. प्रशासनाने सादर केलेला अर्थसंकल्प 757 कोटी दोन लाख रुपयांचा होता.

सभापती शेख यांनी सादर करताना मनोगत दिले. ते यावेळी वाचून दाखविण्यात आले. त्यात त्यांनी म्हटले की, शहरात अनेक मालमत्ता अशा आहेत, ज्यांना दहा वर्षांपासून कर आकारणी होत नाही. त्यावर आकारणी करून त्याच्या वसुलीसाठी प्रयत्न व्हावेत. मालमत्ता नोंदणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या संस्थेचे जीआयएस प्रणालीचे काम संथगतीने सुरू आहे. उत्पन्न वाढीसाठी शहरात व्यापारी संकुलाचे खासगीकरणातून बांधकाम करण्यात यावे. यासाठी नेहरू मार्केटची जागा, प्रोफेसर कॉलनी चौकातील व्यापारी संकुल यासह इतर मोक्याच्या जागांचा विचार व्हावा. कचरा मुक्त शहर करण्यासाठी प्रभावीपणे योजना राबविण्यात यावी. तसेच खासगीकरणाच्या माध्यमातून चौक सुशोभिकरणास प्राधान्य देण्यात यावे. महापालिकेच्या कर्मचार्‍यांची कार्यक्षमता वाढविणे आवश्यक असून, त्यासाठी राज्य सरकारी कर्मचार्‍यांच्या धर्तीवर महापालिका कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा. तसेच घरकुल योजनेची अंमलबजावणीही प्रभावीपणे कण्यात यावी.

वादग्रस्त निधीची तरतूद
महापालिकेचे अर्थकारण कोलमडण्यास कारणीभूत असलेल्या अऩेक गोष्टींपैकी एक असलेली पदाधिकारी आणि नगरसेवक यांच्या नावाने विकास निधीची तरतूद ही होय. प्रशासनाने नियमानुसार वॉर्ड विकास निधीची तरतूद केलेली होती. त्यात सदस्य स्वेच्छा निधीची वाढ करत स्थायी समितीने दोन्ही मिळून तीन कोटी 93 लाखांची तरतूद केली. याशिवाय पदाधिकार्‍यांच्या नावाने केलेली तरतूद वेगळी आहे. नगरसेवकांना आपल्या प्रभागात आता 12 लाख रुपयांपर्यंतची कामे यामुळे सुचविता येणार आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!