Type to search

Featured maharashtra देश विदेश मुख्य बातम्या सार्वमत

महाराष्ट्रात आता ठाकरे सरकार !

Share

उपमुख्यमंत्री जयंत पाटील, विधानसभा अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण

मुंबई- शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज सायंकाळी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. तर उपमुख्यमंत्रिपद हे केवळ एकच असणार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच उपमुख्यमंत्री असणार आहे. हे पद जयंत पाटलांकडे तर काँग्रेसला विधानसभेचे अध्यक्षपद देण्यात आले असून त्या पदावर पृथ्वीराज चव्हाणांची वर्णी लागणार आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत तिन्ही पक्षांचे प्रत्येकी दोन आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. हा शपथविधी सोहळा ऐतिहासिक बनवण्यासाठी शिवाजी पार्क म्हणजेच शिवतीर्थावर जय्यत तयारी सुरू आहे.

मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांची बैठक काल पार पडली. ही बैठक जवळपास चार तास सुरू होती. यात मंत्रिपदे आणि महामंडळांच्या पदांबाबत खलबतं झाली. या बैठकीत उद्धव ठाकरे, अहमद पटेल, शरद पवार, अजित पवार यांच्यासह तिन्ही पक्षांचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर सुरुवातीला कोणत्याच नेत्याने आपली प्रतिक्रिया दिली नाही मात्र, नंतर प्रफुल्ल पटेल यांनी प्रसारमाध्यमांना सविस्तर माहिती दिली. प्रफुल्ल पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्रिपद हे केवळ एकच असणार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच उपमुख्यमंत्री असणार आहे.

प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले की, विधानसभेचं अध्यक्षपद हे काँग्रेस पक्षाला दिलं जाणार आहे तर विधानसभेचं उपाध्यक्षपद हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला असणार आहे. मात्र कोण असेल हे सांगणं त्यांनी टाळलं आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत जयंत पाटील यांचं नाव पुढे असल्याची जोरदार चर्चा असून जयंत पाटील यांनाच उपमुख्यमंत्रिपद दिलं जाणार असल्याची चर्चा आहे.

3 डिसेंबरला विश्‍वासदर्शक ठराव
राज्यपालांनी महाआघाडीस 3 डिसेंबरपर्यंत विश्‍वासदर्शक ठराव मंजूर करण्यास सांगितलेले आहे. त्यामुळे त्याच्याआत हा ठराव मंजूर करून घ्यावा लागणार आहे. 3 डिसेंबर रोजी विश्‍वासदर्शक ठराव मंजूर करून घेतला जाईल. त्यानंतर इतर मंत्रिपदांबाबत चर्चा होईल व नावे निश्‍चित केली जातील असे राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.

हे नेते घेणार मंत्रिपदाची शपथ ?

आजच्या सोहळ्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे मुख्यमंत्री पदाची तर शिवसेनेचे एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, काँगे्रसचे बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्रिपदी जयंत पाटील तसेच छगन भुजबळ अथवा अजित पवार यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल खात्याची जबाबदारी येण्याची शक्यता आहे.

400 शेतकर्‍यांनाही निमंत्रण
या शपथविधी सोहळ्यासाठी शिवसेनेसह महाविकास आघाडीकडून जय्यत तयारी सुरू आहे. देशभरातील सर्वच पक्षांच्या दिग्गज नेत्यांबरोबरच राज्यभरातील विविध जिल्ह्यांमधील 400 शेतकर्‍याना तसेच, आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबातील सदस्यांना देखील या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे, अशी माहिती शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे.

मंत्रिपदासाठी या नेत्यांची नावे आघाडीवर

शिवसेना – एकनाथ शिंदे, दिवाकर रावते, सुभाष देसाई, अब्दुल सत्तार, रामदास कदम, तानाजी सावंत, दीपक केसरकर आणि गुलाबराव पाटील.
राष्ट्रवादी – धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख, दिलीप वळसे-पाटील, मकरंद पाटील आणि राजेश टोपे.
काँग्रेस – अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, के.सी. पडवी, विश्वजित कदम, यशोमती ठाकूर, सतेज पाटील आणि सुनील केदार.

देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते

राज्यात महाविकासआघाडीचं सरकार येत असल्यामुळे आता भाजप विरोधी पक्षात बसणार आहे. याच पार्श्वभूमिवर आता महाविकासआघाडीला धारेवर धरण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेते म्हणून निवड करण्यात आली आहे. यावर केंद्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे केंद्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडूनही शिक्कामोर्तब झाले असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

बंड नव्हतेच! मी राष्ट्रवादीत होतो, आहे आणि राहणार –  अजित पवार

शिवसेना, राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीने सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर काल विधानसभेच्या 286 नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामतीचे आमदार अजित पवार हेदेखील उपस्थित राहिले. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना, मी राष्ट्रवादीत होतो, आहे आणि राहणार, असे त्यांनी म्हटले. तर राष्ट्रवादीशी बंडखोरी करत भाजपाशी हातमिळवणी केल्याबद्दल त्यांना विचारण्यात आले असता त्यांनी आपण राष्ट्रवादीमध्येच असल्याचे सांगत बंड नव्हतेच, असे सांगितले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांवर नाराजी व्यक्त करत आपल्यासंबंधी अनेक चुकीच्या बातम्या देण्यात आल्याची खंत बोलून दाखवली. दरम्यान, मला सध्या काही बोलायचे नाही. योग्यवेळी बोलेन. मी आधीही बोललो होतो की, मी राष्ट्रवादीत होतो, राष्ट्रवादीतच आहे आणि राष्ट्रवादीतच राहणार. पवारसाहेब माझे नेते आहेत. राजकारण वेगळ्या ठिकाणी, कुटुंब वेगळ्या ठिकाणी, असे अजित पवार म्हणाले.

सोनियांसह अनेक नेत्यांना निमंत्रण

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधीना देखील आज शपथ ग्रहण सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी शिवसेनेच्यावतीने आदित्य ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांनी त्यांना नवी दिल्लीत जाऊन निमंत्रण दिले आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचीही त्यांनी भेट घेतली. राज्य मंत्रिमंडळ शपथ सोहळ्याचे निमंत्रण दिले. देशभरातील सर्व काँग्रेसचे मुख्यमंत्री, एम. के. स्टॅलिन, ममता बॅनर्जी, तसेच अरविंद केजरीवाल यांना देखील शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याचे नियंत्रण पाठविण्यात आले आहे.

नगर जिल्ह्यातून असंख्य कार्यकर्ते मुंबईला रवाना

नाट्यमय घडामोडीनंतर प्रचंड संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहेत. त्यामुळे शिवसैनिकांच्या उत्साहाला उधाण आले आहे. आमच्यादृष्टीने हा शपथविधी म्हणजे दिवाळी असल्याचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी सांगितले. शहर आणि गावागावांतून शिवसैनिक मिळेल त्या वाहनाने मुंबईला रवाना होत असल्याचे ते म्हणाले. या शानदार सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी नगर जिल्ह्यातील नगर, श्रीरामपूर, संगमनेर, अकोले, कोपरगाव, राहाता, राहुरी, नेवासा, शेवगाव, कर्जत, जामखेड, पाथर्डी, पारनेर, श्रीगोंदा तालुक्यातील अनेक पदाधिकारी आणि शिवसैनिक रवाना झाले आहेत. श्रीरामपूर तालुक्यातून राजेंद्र देवकर, ज्ञानेश्वर वडितके, सुधीर वायखिंडे, बापू शेरकर, पांडुरंग शिंदे, संदीप दातीर, गोरख औताडे, अंनत डाके, अतुल शेटे, संजय शिंदे, पंडित बोरकर, गोरख औताडे, राजेंद्र गायकवाड, अशोक पवार, अण्णा कांबळे, सुखदेव माळी, ज्ञानेश्वर गुलदगड, अरुण भारसाकळ, संजय राशिनकर, दीपक भापकर, अरुण घुले, अशोक पारखे, सचिन गायकवाड यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक मुंबईच्या दिशेने निघाले होते. तसेच राष्ट्रवादी आणि काँग्रेसचेही कार्यकर्ते मुंबईत दाखल होत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना महत्वाचे पद निश्‍चित मानले जात असल्याने संगमनेर तालुक्यातून त्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात मुंबईला जात आहेत.

‘मी रोहित सुनंदा राजेंद्र पवार..’ ‘हटके स्टाईल’मध्ये शपथविधी

विधानभवनात आज नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. ज्येष्ठ, अनुभवी आमदारांसोबत यावेळी युवा आमदारांनी देखील शपथ घेतली. यामध्ये कर्जत-जामखेडचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांचा देखील समावेश होता. या शपथविधी सोहळ्यात सगळ्यांनी एकाच पद्धतीने शपथ घेतली मात्र रोहित पवारांनी अनोख्या अंदाजात शपथ घेतली. शपथ घेताना सर्व आमदारांनी आपलं नाव-वडिलांच नाव- आडनाव यापद्धतीने सुरूवात केली. मात्र रोहित पवारांनी आपलं नाव ‘मी रोहित सुनंदा राजेंद्र पवार ’ असं घेतलं. शपथविधी सुरू होताच रोहित पवारांनी जी सुरूवात केली त्यामुळे सभागृहातील सगळ्यांच्याच नजरा त्यांच्यावर खिळल्या. रोहित पवारांनी आपल्या आईच्या नावाचा उल्लेख केल्यामुळे आपलं वेगळपण अधोरेखित केलं आहे. आपल्या नावात आईच्या नावाचा उल्लेख करत त्यांनी त्यांची आई सुनंदा पवार यांची कृतज्ञता व्यक्त केली आहे.

 

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!