विभागीय साहित्य संमलेन : साहित्यिकांनी देशाच्या एकसंधतेसाठी लिहावे

0

अध्यक्ष पठारेंचे आवाहन

अहमदनगर (प्रतिनिधी)- देश सध्या वेगळ्या मानसिकतेतून वाटचाल करीत आहे. काही गोष्टी भयानक घडत आहेत. या बाबी साहित्यिकांनी आपल्या लेखनातून प्रकट केल्या पाहिजेत. तसे झाले नाही तर भावी पिढ्यांचे फार मोठे नुकसान होईल. भारताची संस्कृती ही गंगा-यमुनेच्या काठावर वाढलेली आहे.
तिचा इतिहास एकसंधतेचा आहे. मात्र, आता ही संस्कृती दुभंगण्याच्या वाटेवर आहे. देशाची एकता टिकवण्याचे काम साहित्यिकांनी केले पाहिजे, असे आवाहन करतानाच देशातील राजकीय, साहित्यिक आणि सामाजिक स्थितीवर ज्येष्ठ साहित्यिक, पुणे मसापच्या विभागीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. रंगनाथ पठारे यांनी परखडपणे भाष्य केले.
नगर येथे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विभागीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन वात्रटीकाकार रामदास फुटाणे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी प्रा. पठारे बोलत होते. यावेळी पुणे मसापचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, निमंत्रक विनोद कुलकर्णी, सहनिमंत्रक राजन लाखे, स्वागताध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, संयोजक जयंत येलूलकर, प्रशांत गडाख आदी उपस्थित होते.

सामाजिक वातावरणावर भाष्य करताना प्रा. पठारे म्हणाले की, देशात काही औद्योगिक घराणी सांस्कृतिक चळवळी, माध्यमे ताब्यात घेत आहेत. या चार घराण्यांसाठीच देश चालतो की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. आताच्या सत्ताधार्‍यांच या गोष्टीला समर्थन आहे, ही खेदाची बाब आहे. देशाचे पंतप्रधान मोदी त्यावर गप्प बसत असतील तर त्यांचा निषेधच केला पाहिजे, असे स्पष्ट मत त्यांनी मांडले.

साहित्यिकांनी जेवढा खोलवर अनुभव घेतला आहे. तेवढीच खोली साहित्यात उतरेल. साहित्याचे प्रवाह बदलत आहेत. साहित्य संस्थांमधील सत्ताधार्‍यांनीही बदलले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. भारताची संस्कृती ही गंगा-यमुनेची संस्कृती आहे.

महाराष्ट्राचाही सांस्कृतिक इतिहास मोठा आहे. गाथा सप्तशती हा सर्वात पुरातन ग्रंथ मानला जातो. त्याच्या प्रती पाकिस्तानात पेशावरमध्येही सापडतात. त्यातील भाषिक सौंदर्य अप्रतीम आहे. गोदावरी खोर्‍यातील हा आपला ठेवा आहे. तो जपण्याचे काम साहित्यिकांसोबतच सर्वांनी केले पाहिजे, असे पठारे म्हणाले.
महाराष्ट्रातील लोकांच्या रक्तातच एकसंधतेचे गुण आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांपूर्वी निजामशाहीतील हबशी सरदार मलिक अंबरने त्याची सुरुवात नगरमधून केली आहे. हा इतिहास आहे. या संमेलनातून तो जपला जाईल, असे पठारे यांनी सांगितले.

नगरला मळीचा वास
नगर जिल्ह्याला उसाच्या मळीचा वास आहे. मात्र, साहित्यातील रंगनाथ पठारे हा तळमळीचा कार्यकर्ता आहे. हा माणूस अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होण्यास पात्र आहे, असे मत वात्रटीकाकार रामदास फुटाणे यांनी व्यक्त केले. साहित्यिकांनी आता छानछौकी कादंबर्‍या लिहायचे सोडून वास्तवावर भाष्य केले पाहिजे. कसदार साहित्य तयार झाले तरच देशभर मराठीचा डंका वाजेल. राज्यकर्त्यांच्या स्वार्थी वृत्तीवर लिहिले पाहिजे. राजकीय नेते माणसाची किंमत फक्त मतापुरतीच करतात. हे जोपर्यंत सुरू आहे, तोपर्यंत माणसाची पशुत्वाकडे चाललेली वाट खंडित होणार नाही.

अभिजात भाषेचा दर्जा दृष्टिक्षेपात
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विद्यमान संमेलनाध्यक्ष पठारे यांच्या समितीनेच त्याबाबत वस्तुनिष्ठ पुरावे सरकारकडे सादर केले आहेत. केंद्र सरकारकडे त्यासाठी लाखो पत्र पाठविली आहेत. न्यायालयीन अडचण असल्याने हा दर्जा मिळू शकला नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. मात्र, आता कोणताही अडथळा राहिलेला नाही. येत्या मराठी भाषा दिनापर्यंत तो दर्जा मिळेल अशी अपेक्षा मसापचे निमंत्रक विनोद कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

नगरला लवकरच अ. भा. साहित्य संमेलन
नगरचा कला, क्रीडा, शैक्षणिक, सहकार अशा सर्वच बाबतीत लौकिक आहे. यशवंतराव गडाख यांनी साहित्य संंमेलन भरवून संमेलन आयोजनाची परिभाषाच बदलली आहे. सतरा वर्षानंतर पहिल्यांदाच हा आयोजनाचा मान मिळाला आहे. नगरकरांनी असेच सहकार्य केल्यास अखिल भारतीय साहित्य संमेलनही सावेडी शाखा भरवील, असे आश्वासन स्वागताध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी व्यक्त केले.

 

 

LEAVE A REPLY

*