Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रविधान परिषदेसाठी राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांचे नाव चर्चेत

विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांचे नाव चर्चेत

सार्वमत

पुणे (प्रतिनिधी) – विधान परिषदेच्या नऊ रिक्त जागांच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून संभावित उमेदवारांच्या नावाची चर्चा सुरु झाल्या आहेत. यात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांचही नाव चर्चेत असल्याची माहिती आहे. चाकणकर या गेली 13 वर्ष राष्ट्रवादीच्या संघटनेत विविध पदांवर काम करत आहेत. विधान परिषदेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नियुक्त करण्यास राज्यपालांनी नकार दिल्याने निर्माण झालेल्या तिढयावर अखेर निवडणूक आयोगाने मार्ग काढला आणि 21 मे रोजी विधान परिषदेच्या नऊ रिक्त जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्याने मुदतीत आमदार होण्याचा ठाकरे यांचा मार्ग मोकळा झाला.

- Advertisement -

महाराष्ट्र विधान परिषदेची निवडणूक घेण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी परवानगी दिली. करोनासंदर्भातील सर्व प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करून ही निवडणूक होत आहे.विधान परिषदेच्या नऊ जागा 24 एप्रिल रोजी रिक्त झाल्या होत्या. करोनाच्या आपत्तीमुळे राज्यसभा तसेच विधान परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला विधान परिषदेची निवडणूक घेण्याची विनंती केली. सध्या अमेरिकेत असलेले मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दूरचित्र संवादाद्वारे चर्चा करून 27 मेपूर्वी निवडणूक घेण्याचा निर्णय जाहीर केला.

विधान परिषदेतील संख्याबळ बघता 9 जागांपैकी भाजपचे सर्वाधिक 4 , शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी 2 तर काँग्रेसचा 1 सदस्य निवडून जाऊ शकतो. परंतु राज्यसभेच्या निवडणूकीत राष्ट्रवादीसाठी जागा सोडल्याने काँग्रेस राष्ट्रवादीच्या कोट्यातील आणखी एका जागेसाठी आग्रही असल्याचं बोललं जात आहे. शिवसेनेने या आधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधान परिषद उपाध्यक्ष नीलम गोर्‍हे यांची नावं निश्चित केल्याची माहिती आहे. दरम्यान आता राष्ट्रवादीकडून संभावित उमेदवारांच्या नावाची चर्चा सुरु झाल्या आहेत. यात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांचही नाव चर्चेत असल्याची माहिती आहे. चाकणकर या गेली 13 वर्ष राष्ट्रवादीच्या संघटनेत विविध पदांवर काम करत आहेत. चाकणकर यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीसोबतच प्रत्यक्ष राजकीय कारकिर्दीची सुरूवात केली, त्या अगोदर त्यांच्या सासुबाई रुक्मिणी नानी चाकणकर या नगरसेविका असताना त्यांच्या सोबत बचत गटातील महिलांसाठी उद्योग व्यवसाय व प्रशिक्षण शिबीराचे आयोजन अश्या सामाजिक कामात त्या सक्रीय होत्या. याच काळात त्यांना पुणे महानगरपालिकेचा 2005 चा उत्कृष्ट बचत गट व प्रभागातील सर्वाधिक बचत गटाचा म्हणून पुरस्कार देखील मिळाला होता.

पुढे पक्षाने त्यांच्यावर खडकवासला विधानसभा मतदार संघ अध्यक्षाची जबाबदारी दिली आणि नंतर त्यांनी पुणे शहराध्यक्षा म्हणून पाच वर्षे काम पाहिले. या कालावधीत पुणे शहरात त्यांनी पक्षासाठी महिलांची संघटना उभी केली. या काळात राज्यात पक्ष विरोधात असताना त्या वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून सक्रीय असल्याच्या दिसल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रा , हल्लाबोल आंदोलन, लोकसभा आणि विधानसभा निवडणुक प्रचारातही त्यांनी सक्रीय सहभाग घेतला होता. याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा पदाची जबाबदारीही दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या