Tuesday, April 23, 2024
Homeमहाराष्ट्रविधानपरिषदेसाठी शिवसेनेकडून उद्धव ठाकरे, निलम गोर्‍हे उमेदवार

विधानपरिषदेसाठी शिवसेनेकडून उद्धव ठाकरे, निलम गोर्‍हे उमेदवार

सार्वमत

मुंबई – विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी येत्या 21 मे रोजी निवडणूक होणार आहे. यासाठी शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि निलम गोर्‍हे यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसल्यामुळे त्यांना मुख्यमंत्री पदावर राहण्यासाठी आमदार म्हणून निवडून येणे गरजेचे आहे.

- Advertisement -

विधानसभेतील संख्याबळानुसार महाविकासआघाडीला पाच तर भाजपाला चार जागा मिळणार असल्याने ही निवडणूक बिनविरोधच पार पडेल, अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात आली आहे. भाजपाने तसे संकेत आधीच दिले आहेत. मात्र काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी महाविकासआघाडीच्या सहा जागा निवडून येतील, असा दावा केला आहे. आमच्याकडे असलेले संख्याबळ पाहता सहा जागा निवडून शकतात. त्यात कोणतीही अडचण येणार नाही. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे प्रत्येकी दोन उमेदवार निवडून येतील, असे थोरात म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेल्या विधान परिषद निवडणुकीची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बुधवारी किंवा शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत 11 तारखेपर्यंत आहे.
भाजपामध्ये चार जागांसाठी मोठी स्पर्धा आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे नवी दिल्लीतील नेत्यांशी चर्चा करून नावे निश्चित करणार आहेत. एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे हे माजी मंत्री भाजपामध्ये इच्छुक आहेत.

खडसे यांचं राजकीय पुनर्वसन होते का, याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. बावनकुळे यांना संधी दिली जाऊ शकते. काँग्रेसमध्ये एका जागेसाठी 100 हून जास्त इच्छुक आहेत. अल्पसंख्याक समाजाला प्रतिनिधित्व द्यावे, अशी मागणी केली जात आहे.
नऊ जागांसाठी होणार्‍या निवडणुकीत विजयाकरिता पहिल्या पसंतीच्या 29 मतांची आवश्यकता असेल. महाविकास आघाडीला विश्वासदर्शक ठरावावर 169 सदस्यांचा पाठिंबा मिळाला होता. काही छोटे पक्ष तेव्हा तटस्थ राहिले होते. भाजपाचे 105 आमदार असून, सात अपक्ष किंवा छोट्या पक्षाच्या सदस्यांचा पाठिंबा आहे. म्हणजेच भाजपाकडे 112 मते आहेत.

विधानसभेतील संख्याबळाच्या आधारे भाजपाचे चार उमेदवार निवडून येऊ शकतात. भाजपाला चौथी जागा निवडून आणण्याकरिता चार मतं कमी पडत असली तरी गुप्त मतदान असल्यानं ही मतं मिळण्यात काहीच अडचण येणार नाही, असं भाजपाचे नेते ठामपणे सांगत आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाविकास आघाडीला सहा उमेदवार निवडून आणण्यासाठी 174 मते लागतील. विश्वासदर्शक ठरावावर 169 मतं मिळाली होती. परिणामी महाविकास आघाडीनं जोर लावल्यास सहावी जागा निवडून आणणं शक्य आहे. पण त्यासाठी मतांची फाटाफूट होणार नाही याची खबरदारी घ्यावी लागेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या