Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रसुप्रिया सुळे होणार होत्या अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री

सुप्रिया सुळे होणार होत्या अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री

सार्वमत

चेकमेट पुस्तकातून अजित पवारांच्या बंडखोरीबाबत खुलासा
मुंबई – महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रिपदाच्या मुद्यावरून भाजपा-शिवसेनेतील युती तुटली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसची शिवसेनेसोबत वाटाघाटी सुरू असताना, सुप्रिया सुळे यांना अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री, तर जयंत पाटील यांना उपमुख्यमंत्री करण्याचे ठरले होते. यामुळे अजित पवारांच्या मनात चलबिचल सुरू झाली. नाराज झालेले पवार बैठकीतून निघून गेले. आपले राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी त्यांनी सर्वांना धक्का देण्याचे ठरवत भाजपशी हात मिळवण्याचा निर्णय घेतला असा खुलासा ज्येष्ठ राजकीय पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांनी लिहिलेल्या ‘चेकमेट : हाऊ दी बीजेपी वोन अँड लॉस्ट महाराष्ट्र’ या पुस्तकात करण्यात आला आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप-शिवसेना महायुतीला बहुमत असतानाही सत्तानाट्य चांगलेच रंगले होते. अनेक धक्कादायक घडामोडी घडल्या. यातील महत्त्वाची घडामोड म्हणजे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटे राजभवनात झालेला शपथविधी होय. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात सत्तेचे समीकरण जुळले असतानाही, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करून, भाजपाशी हातमिळवणी केली.

दरम्यान अजित पवार यांनी भाजपशी हात मिळवण्याचा निर्णयाबाबत त्यांचे अत्यंत विश्वासू धनंजय मुंडे यांना याबाबतचा संपूर्ण प्लॅन सांगितला. धनंजय मुंडे यांनी यासाठी नकार देत अजित पवारांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. मात्र अजित पवार यांनी मुंडे यांचे ऐकले नाही. या घडामोडीनंतर मुंडे यांनी अजित पवारांच्या 38 समर्थक आमदारांना रात्री 12.30 वाजता आपल्या बंगल्यावर बोलावून घेतले. शरद पवारांना की अजित पवारांना साथ द्यायचा हा प्रश्न मुंडे यांच्यापुढे पडला होता. या संपूर्ण टेंशनमध्ये आपल्या बंगल्यावर न राहता मुंडे यांनी कफ परेड येथील आपल्या मित्राच्या बंगल्यावर जाण्याचा निर्णय घेतला पण भविष्यात होणार्‍या घडामोडीमुळे त्यांना रात्रभर झोप लागली नाही असेही राजकीय पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रत्येक दिवस महत्त्वाचा होता. महाविकास आघाडीच्या बैठकांवर बैठका सुरू होत्या, पण अचानक सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला. त्यानंतर अजित पवारांचे मन वळविण्याचे प्रयत्न राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सुरू झाले.

दरम्यान 22 नोव्हेंबरच्या रात्री बैठकीतून अजित पवार बाहेर पडले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात सोफिटल हॉटेलमध्ये चर्चा झाली. अजित पवार 38 आमदार फोडण्याच्या तयारीत होते. महत्त्वाचे म्हणजे ही सर्व माहिती धनंजय मुंडे यांच्यासह सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांना देखील माहीत होती. 38 पैकी 20 जणांना मंत्रिपद देण्याची चर्चा झाली होती. मात्र, शरद पवारांना याबाबत काहीच माहिती नव्हते, पण हे सरकार जास्त काळ टिकू शकले नाही. बहुमत नसल्यामुळे दोघांनी राजीनामा दिला. अजित पवार यांची नाराजी दूर करणे, हाच एकमेव पर्याय राष्ट्रवादी नेत्यांपुढे विशेषत: पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यापुढे होता आणि त्यांनी अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपद देण्याचा निर्णय घेतला, असेही या पुस्तकात नमूद आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या