Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

मॅरेथॉनद्वारे ‘फिट इंडिया मुव्हमेंट’ला चालना – पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल

Share
Maharashtra police Fit India Movement subodh jaiswal announced today

मुंबई | प्रतिनिधी 

महाराष्ट्र पोलिसांतर्फे येत्या ९ फेब्रुवारी २०२० रोजी आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन आयोजित करण्यात आली असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्ण प्रकाश यांनी दिली.

देशात प्रथमच पोलिसांतर्फे आयोजित होणाऱ्या या मॅरेथॉनच्या वेबसाईटचे उद्घाटन पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांच्या हस्ते आज करण्यात आले. पोलीस आणि जनतेमध्ये जवळीक वाढावी, त्यांच्यामध्ये संवाद वाढावा यादृष्टीने या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले असून वेबसाईटवर नोंदणी करुन लोकांनी यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पोलीस महासंचालक श्री. सुबोध जयस्वाल यांनी यावेळी केले.

पोलीस मुख्यालयात आज या मॅरेथॉनसंदर्भातील जनजागृती मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर पोलीस महासंचालक प्रशासक संजीव सिंघल, ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला, नवभारत टाइम्सचे संपादक सुंदरचंद ठाकूर, अलाईड डिजीटलच्या संचालक शुभदा जहागिरदार आदी मान्यवर उपस्थित होते.

गेट वे ऑफ इंडिया ते वांद्रे सी लिंक अशी ही मॅरेथॉन असेल. स्वास्थ्यदायी दौड अशी या मॅरेथॉनची संकल्पना आहे. ही मॅरेथॉन ४२ किलोमीटर, एकवीस किलोमीटर, १० मैल व ५ किलोमीटर या प्रकारांमध्ये होणार आहे. धावपटूंना आकर्षक बक्षिसेही देण्यात येणार आहेत. या मॅरेथॉनमध्ये भारतभरातून तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरून सुमारे १५ हजार धावपटू सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे. मॅरेथॉनमध्ये ५ हजार पोलीस सहभागी होणार आहेत.

मॅरेथॉनसंदर्भात जनजागृती करण्यासाठी २ फेब्रुवारी रोजी १८ वर्षांवरील ३०० सायकलपटूंच्या सहभागाने पनवेल, कल्याण, मीरा-भाईंदर येथून कुलाबा येथील पोलिस मुख्यालयापर्यंत सायकलफेरी काढण्यात येणार आहे. तसेच ३१ जानेवारी रोजी मध्यरात्री १२ वाजता महिलांची शक्ती आणि सुरक्षितता याचा संदेश देत महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये महिला दौडचेही आयोजन करण्यात येणार आहे.

स्वस्थ पोलीस, सशक्त पोलिस, सक्षम पोलिस, सुदृढ पोलीस या दृष्टीने मॅरेथोनचे आयोजन करण्यात आले असून यातून जनतेला निरोगी आरोग्यासाठी मॅरेथॉनचे महत्त्व पटवून देता येणार आहे, असे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यावेळी म्हणाले.

आपला देश फक्त एक खेळ प्रेमीच नको तर खेळ खेळणारा असावा, असे आयर्नमॅन व अल्ट्रामॅन हे जागतिक किर्तीचा किताब मिळविलेले विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्ण प्रकाश यावेळी म्हणाले.

पोलिस आणि जनतेमध्ये संवाद वाढावा, तरुणांच्या ऊर्जेचा विधायक कामासाठी सकारात्मक उपयोग व्हावा, राष्ट्रनिर्माणात तरुणांना अधिकाधिक सहभागी करून घेता यावे व त्यादवारे समाजात एकता, सौहार्द वाढावे हे या मॅरेथॉनमागचे उद्दिष्ट आहे, असे ते म्हणाले.

मॅरेथॉन पूर्वी तंदुरुस्तीचे व्यायाम, सराव वा क्रीडाप्रकार करताना कुणालाही इजा, दुखापत होऊ नये, यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी देशभरातील २ हजार फिजिओथेरपिस्ट तसेच ३०० होमिओपॅथीस्ट, आहारतज्ज्ञ यांची सेवा मॅरेथॉनमधील सहभागींना उपलब्ध करून दिली आहे.

‘तंदुरुस्त भारत – फिट इंडिया ‘ या देशभर सुरू झालेल्या चळवळीचा भाग म्हणून हा उपक्रम आयोजित करण्यात येत आहे . पोलिस दलांची आरोग्य सुधारणा तसेच युवा पिढीचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने मॅरेथॉनचे आयोजन करण्यात यावे, असा निर्णय देशातील सर्व राज्यांच्या पोलिस महासंचालकांच्या परिषदेत नुकताच घेण्यात आला होता. त्यानुसार महाराष्ट्र पोलिस दल देशात प्रथमच हा उपक्रम राबवित आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!