Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यामोठी बातमी ! गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा

मोठी बातमी ! गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा

मुंबई | Mumbai

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहे.

- Advertisement -

मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर नैतिकदृष्ट्या या पदावर राहणे योग्य वाटत नाही, असं देशमुख यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ हा राजीनामा मंजूर केला आहे.

अनिल देशमुख यांनी राजीनाम्यात काय म्हटलं आहे?

मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्याकडे अॅड. जयश्री पाटील यांच्याद्वारे दाखल केलेल्या याचिकेमध्ये आज ५ एप्रिल २०२१ रोजी पारित केलेल्या आदेशान्वये त्यांच्या तक्रार अर्जावर सीबीआय मार्फत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश पारित केलेले आहेत. त्यानुषंगाने मी, मंत्री (गृह) या पदावर राहणे मला नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही, म्हणून मी स्वतःहून या पदापासून दूर राहण्याचा निर्णय घेत आहे. सबब मला मंत्री (गृह) या पदावरून कार्यमुक्त करावे, ही नम्र विनंती, असं अनिल देशमुख यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटलं आहे.

दरम्यान, ठाकरे सरकारसाठी हा मोठा धक्का मानला जात असून सव्वा महिन्याच्या कालावधीतच दोन मंत्र्यांनी राजीनामा दिल्याचं पाहायला मिळत आहे. याआधी एका युवतीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात अडकलेले शिवसेना नेते संजय राठोड यांनी २८ फेब्रुवारी २०२१ रोजी वनमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.

मागील काही दिवसांपासून सचिन वाझे प्रकरण, परमबीर सिंह लेटर बॉम्ब यांच्यामुळे राज्यात राजकीय शिमगा सुरू होता. विरोधकांनी आक्रमक होत यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मनसुख हिरेन आणि सचिन वाझे प्रकरणावरून गृहमंत्र्यांवर हल्लाबोल केला होता. त्यानंतर गृहमंत्र्यांनी परमबीर सिंहावर अक्षम्य चूका झाल्याने बदली केल्याचं वक्तव्य केल्यानंतर त्यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवत देशमुखांनी अचिन वाझेला १०० कोटीच्या वसुलीचे आदेश दिल्याचा खळबळजनक आरोप केला. यानंतर सुरूवातीला सर्वोच्च न्यायालय आणि नंतर उच्च न्यायालयात सिंह यांनी सीबीआय चौकशी साठी याचिका दाखल केली. सिंह यांची याचिका फेटाळली गेली असली तरीही आज डॉ. जयश्री पाटील यांची याचिका मान्य करत सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या