राज्य सरकारची जम्बो भरती, दोन वर्षात 72 हजार जागा भरणार

0
मुंबई : राज्यातील कृषी क्षेत्राचा विकास करून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासह ग्रामीण भागात अत्यावश्यक सेवा-सुविधा पुरविण्यासाठी संबंधित विभागांमधील रिक्त पदांची भरती करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. दोन वर्षांमध्ये राज्य शासनातील 72 हजार जागा भरणार आहेत.
त्यानुसार पहिल्या टप्प्यात 36 हजार पदांची भरती करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मान्यता दिली आहे. विशेष म्हणजे कृषी खाते आणि कृषी खात्याशी संबंधित पदे तातडीने भरण्यात येणार आहेत. हे आर्थिक वर्ष पूर्ण होण्याच्या आता ही पदे भरली जातील. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

यंदा पहिल्या टप्प्यात 36 हजार तर दुसऱ्या टप्प्यात पुढच्या वर्षी 36 हजार पदभरती करण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. या जागा भरताना ग्रामीण भागातील प्रशासकीय यंत्रणेचे सक्षमीकरण करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. विशेषत: कृषी आणि ग्रामविकासाशी संबंधित विविध विभागांतील रिक्त पदे अग्रक्रमाने भरण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील विविध पायाभूत आणि जीवनावश्यक सुविधा देण्यातही अडचणी येत असल्याने कृषी आणि ग्रामविकासाशी संबंधित रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विभागनिहाय पदसंख्या
यंदा पहिल्या टप्प्यात भरण्यात येणाऱ्या 36 हजार पदांमध्ये ग्रामविकास विभागातील 11 हजार 5 पदे, सार्वजनिक आरोग्य विभागातील 10 हजार 568 पदे, गृह विभागातील 7 हजार 111 पदे, कृषी विभागातील 2 हजार 572 पदे, पशुसंवर्धन विभागातील 1 हजार 47 पदे, सार्वजनिक बांधकाम विभागातील 837 पदे, जलसंपदा विभागातील 827 पदे, जलसंधारण विभागातील 423 पदे, मत्स्यव्यवसाय विकास विभागातील 90 या पदांसह नगरविकास विभागातील 1 हजार 664 पदांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

*